सध्या महाराष्ट्रात सर्वत्र गणेशोत्सवाचा जल्लोश पाहायला मिळत आहे. कोरोना काळानंतर दोन वर्षांनी गणपती बाप्पाचे आगमन होत असल्याने सर्वत्रच धामधुम आणि उत्साह पाहायला मिळत आहे. यामध्ये सिनेसृष्टीमधील कलाकारही मागे नाहीत. सोशल मीडियावर मराठी कलाकारांचे फोटो आणि व्हिडिओ चांगलेच व्हायरल होत आहेत. यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच दिग्दर्शक विजू माने यांच्या घरच्या गणपतीचे दर्शन घेतले. याबद्दलची विजू माने यांची पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.
विजू माने हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या दिग्दर्शनाप्रमाणेच ते दिलखुलास व्यक्तिमत्वासाठी आणि रोखठोक वक्तव्यांसाठीही ओळखले जातात. नुकतीच विजू माने यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. जी सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. ही पोस्ट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या घरी भेट दिल्यानंतर शेअर केली आहे.
या पोस्टमध्ये ते म्हणतात की, “खरंतर माझ्या घरच्या बाप्पाच्या दर्शनाला दरवर्षी ते येतात. पण यावर्षी मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले होते त्यामुळे मनात कितीही वाटत असलं तरी ते येतील का याबद्दल शंका होती. पण अचानक पोलीस स्टेशन मधून फोन आला मुख्यमंत्री तुमच्या घरी येत असल्यामुळे सुरक्षा लक्षात घेता काही पोलीस तपासणी करता तुमच्या घरी येतील… आणि खरंच मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे माझ्या घरी आले. मनमोकळ्या गप्पा मारल्या. सोबत खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे आणि माजी महापौर, शिवसेना प्रवक्ते, आमचे मित्र नरेश म्हस्के हेसुद्धा होते.”
“खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी देखील कितीही उशीर झाला तरी माझ्या घरच्या बापाचं दर्शन घेण्याची आपली सवय मोडली नाही. ( मला चांगलं आठवतंय गेल्यावर्षी रात्री दीड वाजता खासदार माझ्या घरी आले होते. राजकारणातील उलथापालथ हा प्रत्येकाच्या चर्चेचा आवडीनिवडीचा विषय असतो. पण आपल्यासाठी तो माणूस महत्त्वाचा असतो जो आपल्या अत्यंत महत्त्वाच्या वेळेला धावून आलेला असतो. माझ्या बाबतीत मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांचे ते स्थान आहे. आणि मी कृतज्ञता (मराठीत gratitude) व्यक्त करण्याला कायम प्राधान्य देणारा माणूस आहे. मला शक्य तेव्हा, शक्य तिथे, शक्य त्या कार्यक्रमात मी त्यांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानत असतोच.”
या पोस्टमध्ये शेवटी ते म्हणतात की, “तसं पाहिलं तर आपल्याला सगळेच राजकारणी सारखेच. अनेक पक्षातल्या अनेक नेत्यांशी छान संबंध आहेत. राजकारण त्यांच्या त्यांच्या ठिकाणी असावं पण सन्मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब ह्या माणसात अशी काहीतरी जादू आहे की त्यांच्यासाठी आपण ‘काहीही’ करू शकतो.” सध्या त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
हेही वाचा – ‘सगळा चित्रपटचं खोटा…’ ‘लालसिंग चड्ढा’ फ्लॉप ठरल्यांनंतर विवेक अग्निहोत्रींनी आमिर खानची उडवली खिल्ली
‘मी मुले दत्तक घेऊ शकतो नाहीतर…’ नंदिता मेहतानीसोबत लग्न ठरल्यानंतर विद्युत जामवालने केला मोठा खुलासा
बॉलिवूड कलाकारांमुळे दुखावली लोकप्रिय पाकिस्तानी अभिनेत्री; म्हणाली, ‘माणुसकी धर्म आणि प्रांतापेक्षा मोठी…’