पदार्पणातच पुरस्कार पटकवणारी मुग्धा ‘या’ खलनायकाच्या प्रेमात झालीय वेडी; तर त्यांच्या वयात आहे १४ वर्षांचे अंतर


सिनेसृष्टीमधे येणे आणि इथे स्वतःला स्थावर करणे वाटते तितके सोपे अजिबात नाही. या ग्लॅमर जगात काम करण्यासाठी अनेक लोकं रोज मुंबईत येतात आणि या क्षेत्रात करिअर करण्यासाठी येतात. मात्र चिकाटी, मेहनत आणि संघर्ष करण्याचीही तयारी खूपच कमी लोकांमध्ये असते. त्यामुळे अगदी मोजकेच जणं मुंबईत टिकतात आणि येथे यश मिळवण्यासाठी धडपड करतात. काहींना या क्षेत्रात यशस्वी आणि धमाकेदार एन्ट्री मिळते, मात्र नंतर पुढे करिअरमध्ये काहीच घडत नाही. मात्र तरीही त्यांचे नाव सर्वांना माहित होते. म्हणजेच काय तर लोकांना त्यांची ओळख तर होते, पण करिअर थंडावते. असे अनेक कलाकार आहेत, जे काही सिनेमांमध्ये दिसले तर खरे, मात्र त्यांना यश काही मिळाले नाही. अशीच एक अभिनेत्री म्हणजे मुग्धा गोडसे. मुग्धाने बॉलिवूडमध्ये दमदार एन्ट्री तर केली, मात्र नंतर तिच्या करिअरमध्ये काही खास घडले नाही, तरीही ती प्रेक्षकांच्या लक्षात आहे. आज मुग्धा तिचा ३५ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्या आयुष्यातील काही महत्वाच्या गोष्टी. (mugdha godse birthday special know her movie journey and also her love life)

मुग्धाचा जन्म २६ जुलै १९८६ रोजी पुण्यात एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. तिने तिचे शालेय शिक्षण नूतन मराठी विद्यालयातून पूर्ण केले तर कॉमर्समध्ये पदवी संपादन केली. मुग्धाने महाविद्यालयीन काळापासूनच छोट्या छोट्या स्वरूपाच्या सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. तिचा खर्च भागवण्यासाठी पेट्रोल पंपावर काम करण्यास सुरुवात केली. या कामाचे तिला दिवसाला १०० रुपये मिळायचे.

अभिनयात येण्यापूर्वी मुग्धा प्रसिद्ध आणि मोठी मॉडेल होती. २००२ साली तिने ‘ग्लॅडरग्स मेगा मॉडेल हंट’ जिंकलं. या स्पर्धेतील विजयानंतर मुग्धा खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली. याच वर्षी तिने ‘फेमिना मिस इंडिया’ सौंदर्यस्पर्धेत उपांत्य फेरी गाठली होती. मुग्धाने अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय शोमध्ये मॉडेलिंग केले आहे.

मॉडेलिंग करिअरमध्ये यशाची शिखरे गाठत असतांना सोबतच मुग्धा अनेक जाहिरातींमध्ये देखील झळकू लागली. ती एअरटेलच्या जाहिरातीमध्ये किंग खान शाहरुख खानसोबत झळकली होती. त्यानंतर तिने बऱ्याच जाहिराती केल्या. मॉडेलिंग आणि जाहिरात इंडस्ट्रीमध्ये मुग्धाने जवळपास पाच वर्ष काम केले. अभिनयात जाण्याच्या विचारात असतानाच, २००८ साली मुग्धाच्या नशिबाने अनपेक्षित आणि सुखद वळण घेतले.

मुग्धाला मधुर भांडारकर यांच्या ‘फॅशन’ या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. एवढ्या मोठ्या संधीचे तिने सोने केले आणि या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. हा सिनेमा तुफान गाजला. अगदी राष्ट्रीय पुरस्कारावर देखील या चित्रपटाने मोहर उमटवली. या सिनेमात मुग्धाने सहायक भूमिका जरी केली असली, तरी तिच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले. चित्रपटातील तिच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले आणि तिला फिल्मफेअरचा ‘सर्वोत्कृष्ट पदार्पण’ पुरस्कारही मिळाला. या चित्रपटानंतर मुग्धा ‘ऑल द बेस्ट’, ‘जेल’, ‘हेल्प’, ‘बेजुबान इश्क’, ‘हिरोइन’ आदी अनेक सिनेमांमध्ये झळकली.

मात्र दुर्दैवाने तिला अपेक्षित यश मिळत नव्हते. पुढे ती मराठी इंडस्ट्रीमध्ये देखील दिसली. तिने झी मराठीवरील ‘महारथी पाऊल पडते पुढे’ या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका निभावली होती. त्यानंतर तिने २०१४ साली ‘थानी ओरुवन’ या चित्रपटातून तामिळ इंडस्ट्रीमध्ये देखील पदार्पण केले.

मुग्धा तिच्या फिल्म्समुळे चर्चेत तर नक्कीच आली, मात्र यासोबत ती सर्वात जास्त प्रकाशझोतात आली, जेव्हा तिने तिचे रिलेशनशिप स्टेटस जाहीर केले. मुग्धा अभिनेता राहुल देवसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. अनेक हिंदी, साऊथ चित्रपटांमध्ये काम करणारा राहुल आणि मुग्धा मागील अनेक वर्षांपासून नात्यात आहे. या दोघांची लव्हस्टोरी देखील सिंपल आणि छान आहे.

मुग्धा आणि राहुल यांची पहिली भेट २०१३ साली एका कॉमन मित्राच्या लग्नात झाली. या लग्नात हे दोघं एकमेकांकडे आकर्षित झाले. लग्नानंतर राहुल त्याच्या गुरूंना भेटायला गेला, योगायोगाने मुग्धा देखील तिथे आली होती. ज्या गुरूंना राहुल फॉलो करायचा, त्याच गुरूंना मुग्धा देखील फॉलो करायची. या दोघांमध्ये एक उत्तम बॉन्ड तयार होण्यासाठी ही बाब खूप महत्वाची ठरली.

एका मुलाखतीमध्ये राहुल म्हणाला होता की, ‘आमच्या उद्देशासोबतच आमचे गुरूसुद्धा एक होते. ही गोष्ट आम्हाला एकमेकांना समजून घ्यायला खूपच उपयोगी पडली. सोबतच मला गोष्ट कळून चुकली की, जीवन आपल्याला एकापेक्षा अधिक संधी देत असते, फक्त त्या आपल्याला समजायला पाहिजे.” तर मुग्धा म्हणाली होती, “राहुल असा व्यक्ती आहे, ज्यावर मी डोळे मिटून विश्वास ठेऊ शकते. तो नेहमीच माझ्यासाठी एका मित्रापेक्षा अधिक असतो.” मुख्य म्हणजे राहुल आणि मुग्धामध्ये १४ वर्षांचे मोठे अंतर आहे.

राहुलबद्दल सांगायचे झाले तर तो विवाहित असून, त्याला एक मुलगा देखील आहे. मात्र त्याच्या पत्नीचे काही वर्षांपूर्वी कॅन्सरने निधन झाले. त्यानंतर तो या सर्व गोष्टींपासून दूर गेला होता. मात्र मुग्धा त्याच्या जीवनात आली आणि त्याचे सर्व विचार बदलले. मुग्धाला राहुलच्या मुलाने देखील स्वीकारले असून, त्या दोगांची बॉण्डिंग देखील चांगली आहे. राहुल आणि मुग्धा अनेक पार्टी, इव्हेंट्सला सोबतच दिसतात. शिवाय सोशल मीडियावरही त्यांचे असंख्य फोटो आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-राज कुंद्रा प्रकरणाबाबत राखी सावंत झाली व्यक्त; म्हणाली, ‘त्यांनी मला…’

राहुल- दिशाला आशीर्वाद देण्यासाठी किन्नर पोहचले त्यांच्या घरी; नवदाम्पत्यासह डान्स करून केली ‘ईतकी’ मोठी मागणी

-शोएब इब्राहिमचे वडील ब्रेन स्ट्रोकमुळे रूग्णालयात दाखल; दीपिका कक्करने केली सासऱ्यांच्या तब्येतीसाठी प्रार्थना


Leave A Reply

Your email address will not be published.