Saturday, May 18, 2024

मुलीच्या मारेकऱ्यांना पकडण्याच्या ‘माई’च्या संघर्षाची कहाणी, नेटफ्लिक्सच्या थ्रिलर सिरीजचा ट्रेलर प्रदर्शित

सध्या ओटीटी फ्लॅटफॉर्मवर अनेक नवनवीन वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. कधी रहस्यमय कथा तर कधी भयानक भूतांच्या कथा त्याचप्रमाणे अनेक सत्य कथांवर आधारित अनेक वेबसिरीज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या होत्या. या सिरीजला प्रेक्षकांनीही प्रचंड प्रतिसाद दिला आहे. त्यामुळेच प्रेक्षकांचा आता ओटीटी प्लॅटफॉर्मकडे चांगलाच कल वाढला आहे. हाच विचार लक्षात घेऊन नेटफ्लिक्सवर आणखी एक नवीन वेबसिरीज प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे ज्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.

नेटफ्लिक्सने आपल्या आगामी ‘माई’ वेब सिरीजचा ट्रेलर रिलीज केला आहे. ही एक सस्पेन्स थ्रिलर वेब सीरिज आहे, ज्याची निर्मिती अनुष्का शर्माचा भाऊ कर्णेश शर्माची निर्मिती कंपनी क्लीन स्लॅट्झने केली आहे. अनुष्काने काही दिवसांपूर्वीच या प्रॉडक्शन कंपनीपासून वेगळे होण्याची घोषणा केली होती. माईची मुख्य भूमिका साक्षी तन्वर साकारणार आहे, तर राइमा सेन आणि वामिका गब्बी यांच्यासह अनेक प्रसिद्ध चेहरे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

यामध्ये साक्षीने एका आईची भूमिका साकारली आहे जी आपल्या मुलीच्या खुन्याच्या शोधात निघते. आपल्या मुलीची हत्या का झाली, या प्रश्नाचे उत्तर तिला हवे आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला साक्षीच्या डोळ्यांसमोर  वामिका गब्बीला ट्रकने उडवल्याचे दाखवण्यात आले आहे. आपल्या मुलीच्या मारेकऱ्याचा शोध घेत असताना साक्षीला धमक्या येतात. तिला थांबवण्याचे प्रयत्न केले जातात. तिच्यावर प्राण घातक हल्ले केले जातात. ट्रेलर कथेबद्दल उत्सुकता निर्माण करतो आणि सिरीजचा उत्साह वाढवतो.

ट्रेलरमध्ये साक्षी पूर्णपणे वेगळ्या स्टाईलमध्ये दिसत आहे. तिची व्यक्तिरेखा खूपच रहस्यमय वाटत आहे. साक्षीने आतापर्यंत जितक्या भूमिका साकारल्या आहेत, त्या भूमिकांपेक्षा ही भूमिका आव्हानात्मक आहे. साक्षी यापूर्वी अल्ट बालाजी च्या ‘कर ले तू भी मोहब्बत’, ZEE5 च्या द फायनल कॉल आणि अल्ट बालाजी ZEE5 च्या ‘मिशन ओव्हर मार्स’ वेब सीरिजमध्ये दिसली होती.

दरम्यान साक्षी आता डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांच्या ‘पृथ्वीराज’ या चित्रपटात भूमिका साकारणार आहे, ज्यामध्ये अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे. यापूर्वी द्विवेदीच्या ‘मोहल्ला अस्सी’ या चित्रपटात साक्षीने सनी देओलच्या पत्नीची भूमिका साकारली होती. त्याच वेळी, वामिका डिस्ने हॉटस्टारच्या ग्रहणमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली होती. आणि ती नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ’83’ चित्रपटातील एक प्रमुख भूमिका साकारताना दिसली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा