याला म्हणतात खरे प्रेम! ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने चाहत्याने उभारले ‘या’ अभिनेत्रीचे मंदिर, घातला दुधाने अभिषेक


कलाकार हे नेहमीच समाजाचा एक मोठा आणि महत्त्वाचा भाग राहिले आहेत. ते त्यांच्या चित्रपटातून अनेक सामाजिक संदेश देण्याचे काम देखील करत असतात. चित्रपट, कलाकार यांच्यासाठी प्रेक्षक हा राजा असतो. मात्र, काही कलाकार त्यांच्या अभिनयाने, त्यांच्या कार्याने याच राजा असणाऱ्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला लागतात, आणि हेच कलाकार त्या राजासाठी देव बनतात.

यापूर्वी काही कलाकारांना रसिकांनी देवाची उपाधी तर दिलीच आहे. मात्र, काही कलाकारांचे रसिकांनी मंदिर सुद्धा बांधले आहे. यात रजनीकांत, सोनू सूद अशा काही कलाकारांचा समावेश आहे. जनतेने या कलाकारांना देव म्हणत मंदिरात स्थान दिले आहे. अशा घटना कलाकारांसाठी खूपच भावनिक आणि जबाबदारी वाढवणाऱ्या ठरतात.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रीचे देखील असेच एक मंदिर तयार करण्यात आले आहे. या आधी MGR, खुशबू सुंदर, हंसिका मोटवानी आणि नयनतारा या अभिनेत्रींचे देखील मंदिर तयार करण्यात आले आहे. आता या यादीत निधी अग्रवाल या अभिनेत्रीची सुद्धा भर पडली आहे. निधीने आतापर्यंत फक्त दोनच सिनेमात काम केले. मात्र, याच दोन सिनेमातून तिने प्रेक्षकांच्या मनातच काय मंदिरात देखील जागा मिळवली आहे. फॅन्सने तिच्याबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी ही कृती केली आहे.

मंदिराबद्दल जेव्हा निधीला समजले, तेव्हा तिला आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. रविवारी ‘व्हॅलेंटाईन डे’ चा मुहूर्त साधत फॅन्सने तिच्या या मंदिराचे अनावरण केले. या प्रेमाच्या दिवशी त्यांनी तिला भेट स्वरूपात हे मंदिर दिले आहे. चेन्नईमधील या मंदिराच्या अनावरण सोहळ्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

फॅन्सने तिच्या फोटोंची मदत घेत निधीची एक मूर्ती तयार केली आहे. रविवारी या मूर्तीची यथाशक्ती एक पूजा करण्यात आली. तिच्या या मूर्तीवर दुधाने अभिषेक सुद्धा करण्यात आल्याचे आपण फोटोमध्ये पाहू शकतो. सोबतच तिथे अनेक लोक हाथ जोडून उभे असल्याचे देखील आपल्याला दिसत आहे.

निधीने या बद्दल एका मुलाखती दरम्यान सांगितले की, “फॅन्सने मला ‘व्हॅलेंटाईन डे’ चे खास आणि संस्मरणीय असे हे गिफ्ट दिले आहे. मला अशा कोणत्याही गोष्टीबद्दल किंचितही कल्पना नव्हती. मात्र, मला एवढे प्रेम दिल्याबद्दल मी खूप खुश आणि आभारी आहे. मी आतापर्यंत फक्त दोनच सिनेमे केले आहेत. या दोनच चित्रपटांमधून प्रेक्षकांनी मला एवढे भरभरुन प्रेम दिले आहे की, ते मी शब्दात व्यक्त करूच शकत नाही.”

पुढे निधी म्हणते, “मी माझ्या एका अधिकृत फॅन्स क्लबसोबत जोडली गेली आहे. मागच्यावर्षी कोरोनामुळे माझे कोणतेच सिनेमे प्रदर्शित झाले नाही. यावर्षी एक/दोन सिनेमे प्रदर्शित होणार असून, काही चित्रपटाचे चित्रीकरण चालू आहे. मी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, मला गरीब जनता आणि बेवारस कुत्र्यांसाठी काहीतरी चांगले काम करायचे आहे. यावरून अनेक फॅन्स गरिबांसाठी आणि कुत्र्यांसाठी चांगले काम करत आहेत. खरंच तुमच्या सर्वांच्या प्रेमासाठी आणि माझे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याच्या मला आलेल्या मदतीसाठी खूप आभार.”

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.