Friday, March 29, 2024

भारीच ना! सोनू निगमच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘या’ सर्वोच्च पुरस्कारासाठी झाली निवड

बॉलिवूडमधून आनंदाची बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध गायक सोनू निगमच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवण्यात आला आहे. म्हणजेच यावर्षीच्या पद्मश्री पुरस्कारासाठी सोनूची निवड करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधीच सोनूला या पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा करण्यात आली. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला प्रतिष्ठित पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. एकूण १२८ व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. नुकतेच भारत सरकारने पद्म पुरस्कार २०२२ साठी निवडण्यात आलेल्या नावांची घोषणा केली. यादरम्यान कला क्षेत्रात बॉलिवूडच्या प्रसिद्ध व्यक्तींना पद्मश्रीने सन्मानित केले जाईल. यामध्ये अक्षय कुमार अभिनित ‘पृथ्वीराज’ सिनेमाचे दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी यांनाही पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले जाईल.

सोनू निगमबद्दल (Sonu Nigam) बोलायचं झालं, तर ४८ वर्षीय सोनू भारतीय गायक असण्यासोबतच संगीत दिग्दर्शक आणि सेलिब्रिटी परीक्षकही आहे. बॉलिवूडचा दिग्गज गायक सोनूच्या सुरेल आवाजावर प्रत्येकजण फिदा आहे. ३० जुलै, १९७३ रोजी फरीदाबाद येथे जन्मलेल्या सोनूने कठोर मेहनत घेत स्वत:ला या शिखरापर्यंत पोहोचवले आहे.

सोनूने हिंदीसोबतच इतर भाषांमधील गाण्यांनाही आपला आवाज दिला आहे. त्यामध्ये कन्नड, उडिया, बंगाली, गुजराती, तमिळ, तेलुगू, मराठी, नेपाळी, मल्याळम, कन्नड, भोजपुरी यांसोबतच अनेक भाषांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, सोनूने फक्त सिनेमातील गाण्यांनाच नाही, तर म्युझिक अल्बमलाही आपला आवाज दिला आहे.

याशिवाय त्याने काही हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे. त्यात ‘जानी दुश्मन’, ‘काश आप हमारे होते’, ‘लव्ह इन नेपाल’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. सिनेविश्वातील ५००० हून अधिक गाण्यांना आपला आवाज देणाऱ्या सोनू निगमला ‘मॉडर्न रफी’ आणि ‘द लॉर्ड ऑफ रेकॉर्ड्स’ सोबत ‘मेलडी मास्टर’ म्हणूनही ओळखले जाते.

सोनू निगमने आपल्या ३ दशकांच्या कारकिर्दीत जवळपास ३२० चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. त्याला आतापर्यंत दोन वेळा फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ‘कल हो ना हो’ या चित्रपटाच्या टायटल ट्रॅकसाठी सोनूला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला आहे.

याशिवाय २०१२ साली आलेल्या ‘अग्निपथ’ चित्रपटातील सोनू निगमच्या आवाजातील ‘अभी मुझे में कहीं’ हे गाणे प्रचंड हिट ठरले. या गाण्यासाठी सोनूला ‘आयफा’ आणि ‘फिल्मफेअर’ पुरस्कारही मिळाले.

हेही पाहा- सुपरस्टार्ससोबत काम करणारी आंचल सिंग एका वेबसीरिजमुळे आली चर्चेत

सोनू निगम सध्या त्याच्या कुटुंबासह दुबईत आहे. अलीकडेच त्याच्या कुटुंबासोबत त्यालाही कोरोनाची लागण झाली होती. याची माहिती त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती.

विशेष म्हणजे, यापूर्वी सुरेश वाडकर आणि अदनान सामी या प्रसिद्ध गायकांनाही पद्मश्री पुरस्कार पटकावलाय.

हेही वाचा-

हे देखील वाचा