Friday, April 19, 2024

उत्कृष्ट वादक आणि सुरेल गायक असणाऱ्या पंडित शिवकुमार शर्मा यांनी सतराव्या वर्षीच केला होता संतूर वादनाचा पहिला शो

संतूरसम्राट म्हणून संपूर्ण जगात नावलौकिक कमवणाऱ्या पंडित शिवकुमार शर्मा यांचे आज (१० मे) रोजी मुंबईत दुःखद निधन झाले. वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारतीय संगीत विश्वातील अतिशय मोठे आणि नावाजलेले व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायचे. भारतीय शास्त्रीय संगीतातील मोठे नाव असणाऱ्या पंडित शिवकुमार शर्मा यांनी संतूर वाद्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली.

पंडित शिवकुमार शर्मा यांचा जन्म १३ जानेवारी १९३८ मध्ये झाला. मूळचे जम्मू येथील रहिवाशी असणाऱ्या पंडित शिवकुमार शर्मा यांना त्यांच्या वडिलांनी वयाच्या पाचव्या वर्षापासूनच शास्त्रीय गायन आणि तबल्याची शिकवणी दिली. संतूर वाद्याचे वादन करण्याची प्रेरणा पंडितजींना त्यांच्या आईकडून मिळाली. आईच्या इच्छेखातर, त्यांनी संतूर वादनास वयाच्या तेराव्या वर्षापासून सुरुवात केली. त्यांनी १९५५ मध्ये वयाच्या सतराव्या वर्षी पहिल्यांदा मुंबईत सार्वजनिक ठिकाणी या संतूर वाद्याचे वादन केले. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही आणि संतूरच्या तारांनी संपूर्ण जगाला एका नवीन वाद्याची ओळख करून दिली. मूळच्या काश्मीरच्या असणाऱ्या या वाद्याला पंडित शिवकुमार शर्मा यांनी जागतिक स्तरावर ओळख मिळवून दिली आणि संगीत वाद्यांमध्ये मनाचे स्थान उपलब्ध करून दिले.

उत्तम संतूर वादक असण्यासोबतच शिवकुमार शर्मा सुरेल गायक देखील होते. भारतीय शास्त्रीय संगीत संतूरवर वाजवणारे ते पाहिले वादक होते. १९६० रोजी पंडित शिव कुमार शर्मा यांचा पहिला अल्बम आला. त्यानंतर १९६५ साली त्यांनी व्ही शांताराम यांच्या ‘झनक झनक पायल बाजे’ सिनेमाला संगीत दिले. हरिप्रसाद चौरसिया यांच्याबरोबरची त्यांची जोडी खूप गाजली. ‘शिव-हरी’ या नावाने त्यांची जोडी ओळखली जायची. १९६७ मध्ये ‘कॉल ऑफ द व्हॅली’ हा अल्बम तुफान लोकप्रिय झाला होता. या अल्बममध्ये पंडित हरिप्रसाद चौरसिया आणि गिटारवादक ब्रिजभूषण काबरा यांच्याबरोबर त्यांनी वादन केलं होतं.

शिव हरी या जोडीने सिलसिला, फसले, डर, विजय, चांदणी, लम्हे, परंपरा आदी बॉलिवूड चित्रपटांना संगीत दिले. त्यांनी दिलेले संगीत हे प्रेक्षकांमध्ये तुफान गाजले. त्यांना बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक यश चोप्रा यांनी दिला. संतूर वादनाचे पंडित शिवकुमार शर्मा यांनी अनेक राष्ट्रे अंतरराष्ट्रीय कॉन्सर्ट केले. संपूर्ण जगभर फिरून त्यांनी संतूर लोकांपर्यंत पोचवले.

पंडित शिवकुमार शर्मा यांना अनेक राष्ट्रीय तसेच, आंतरराष्ट्रीय सन्मान आणि पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहेत. त्यांना १९८५ मध्ये बाल्टीमोर, संयुक्त राज्यची मानद नागरिकता मिळाली. पंडित शिवकुमार शर्मा यांना सन १९८६ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला, सन १९९१ साली त्यांना सर्वोच्च अशा पद्मश्री आणि २००१ साली पद्म विभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले.

पंडित शिव कुमार शर्मा यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झाल्यास त्यांच्या पत्नीचे नाव मनोरमा शर्मा असून त्यांना दोन मुलं. राहुल या त्यांच्या मुलाने वडिलांचे शिष्यत्व पत्करले आणि त्यांच्याकडून संतीर वादनाचे धडे घेतले. या पिता पुत्राच्या जोडीला अनेकदा स्टेजवर एकत्र संतूर वंदन करताना पाहण्यात आले. त्यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेते मंडळाची, कलाकार आदी विविध क्षेत्रातील दिग्गज लोकांनी शोक व्यक्त केला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा