Tuesday, September 26, 2023

प्रसाद ओकच्या आगामी दिग्दर्शकीय सिनेमाची घोषणा, प्रेक्षक अनुभवणार ‘गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी’

मराठी मनोरंजनविश्वातील आघाडीचा अभिनेता म्हणून प्रसाद ओकला ओळखले जाते. प्रसादने त्याच्या अभिनयाच्या जोरावर त्याने त्याची एक वेगळी आणि मोठी ओळख निर्माण केली. पुढे जात प्रसादने दिग्दर्शनात देखील हात आजमावत तिथे देखील घवघवीत यश मिळवले. आज प्रसाद अभिनेत्यासोबतच दिग्दर्शक म्हणून देखील ओळखला जातो. ‘हिरकणी’ आणि ‘चंद्रमुखी’ या दोन चित्रपटांच्या अभूतपूर्व यशानंतर आता पुन्हा एकदा प्रसाद ओक दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे.

नुकतेच प्रसाद ओकने त्याच्या आगामी नवीन सिनेमाचे नवीन पोस्टर शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. मुख्य म्हणजे या सिनेमात तो महत्वाची भूमिका देखील साकारणार आहे. प्रसादच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘वडापाव’ असे असून, यामध्ये ‘एका गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी’ दाखवण्यात येणार असल्याचे त्याने सांगितले. पोस्टरच्या बॅकग्राऊंडला वाजणाऱ्या “प्रेमाच्या कोटींगला लाख भाव रे… घमघमीत जसा आपला वडापाव रे” या हटके गाण्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

‘वडापाव’ चित्रपटात प्रसाद ओकसह गौरी नलावडे, अभिनय बेर्डे, रितिका श्रोत्री, रसिका वेंगुर्लेकर, सिद्धार्थ साळवी, शाल्व किंजवडेकर, सविता प्रभुणे हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. प्रसादच्या या सिनेमाचे शूटिंग सुरु झाल्याची माहिती देखील त्याने या पोस्टमधून दिली आहे. आता ‘वडापाव’मधून गोड कुटुंबाची तिखट गोष्ट कशी उलगडणार याकडे सर्वांचे लक्ष असणार हे नक्की. नावावरूनच सिनेमा भन्नाट असणार हे नक्की.

दरम्यान प्रसाद ओकने याआधी देखील हिरकणी आणि चंद्रमुखी या चित्रपटांचे दिग्दर्शन केले असून, काही नाटकांना देखील त्यांनी दिग्दर्शित केले आहे. सध्या तो महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात परीक्षकाच्या भूमिकेत झळकत आहे.

अधिक वाचा-
शोएब इब्राहिम पत्नी अन् चिमुरड्याला घेऊन रुग्णालयातून आला बाहेर, फोटो व्हायरल
‘बाईपण भाई देवा’ फेम अभिनेत्री वंदना गुप्ते यांना अटक? प्रसिद्ध दिग्दर्शकाची पोस्ट व्हायरल

हे देखील वाचा