अभिनेत्री प्रियंका चोप्रा एस. एस. राजामौली यांच्या आगामी चित्रपट ‘वाराणसी’मध्ये सुपरस्टार महेश बाबूसोबत झळकणार आहे. गेल्या महिन्यात चित्रपटाच्या टीमने भव्य लॉन्च इव्हेंट आयोजित केला होता. या कार्यक्रमात चित्रपटातील प्रमुख पात्रांचा फर्स्ट लूकही सादर करण्यात आला. आता मात्र असं दिसतंय की प्रियंकाने नकळतपणे या चित्रपटाच्या प्रचंड बजेटची पुष्टीच केली आहे.
अलीकडेच प्रियंका चोप्रा ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या चौथ्या सीझनच्या पहिल्या भागात सहभागी झाली होती. या संवादादरम्यान कपिल शर्माने थेट चित्रपटाच्या १३०० कोटी रुपयांच्या बजेटबद्दल प्रश्न विचारला. कपिलच्या या प्रश्नावर प्रियंकाने मान डोलावली, मात्र तिने थेट दुजोरा किंवा नकार दिला नाही.
कपिल शर्माने गंमतीशीर शैलीत म्हटलं, “प्रियंका (Priyanka)जे काही करते ते लहान नसतं, सगळंच भव्य असतं. तिचा पुढचा चित्रपट एस. एस. राजामौलींसोबत आहे आणि ते मोठ्या बजेटचे चित्रपट बनवतात. ऐकिवात आहे की या चित्रपटाचं बजेट तब्बल १३०० कोटी रुपये आहे.” प्रियंकाने होकारार्थी प्रतिक्रिया दिल्यानंतर कपिलने पुन्हा विचारलं, “इतक्या मोठ्या बजेटचा चित्रपट बनतोय का, की वाराणसीत लोकांना कामावर ठेवणार आहात?”
या प्रश्नावर प्रियंकाने हसत उत्तर दिलं, “तुमचं असं म्हणणं आहे का की बजेटचा अर्धा भाग माझ्या बँक अकाउंटमध्ये गेला?” यावर कपिलने “अर्थ तसाच निघतो” असं म्हटलं. पुढे प्रियंकानेही गंमतीत उत्तर देत वातावरण आणखी हलकंफुलकं केलं.यानंतर नवजोत सिंग सिद्धूंनी चित्रपटाच्या कथेबद्दल प्रश्न विचारला, तेव्हा कपिलने लगेच सांगितलं, “राजामौली सरांनी ‘बाहुबली’मध्ये कटप्पाने बाहुबलीला का मारलं हे शेवटपर्यंत गुपित ठेवलं होतं. मग ते या चित्रपटाची कथा कशी उघड करतील?”
२०१५ मध्ये हॉलीवूडमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रियंका चोप्राने भारतात फार कमी चित्रपट केले. तिचा शेवटचा हिंदी चित्रपट ‘द स्काय इज पिंक’ (२०१९) होता. आता तब्बल ६ वर्षांनंतर प्रियंका बॉलिवूडमध्ये पुनरागमन करत आहे. चित्रपटाच्या फर्स्ट लूकमध्ये साडी नेसलेली आणि हातात बंदूक असलेली प्रियंका पाहून चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. महेश बाबू आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्यासोबत तिची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, प्रियंकाने नुकतीच हैदराबादमध्ये चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
थायलंडपासून लद्दाखपर्यंत ‘धुरंधर’ची शूटिंग; मुंबईच्या टोबेको फॅक्ट्रीत शूट झाला खास गाण्याचा सीन


