Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’चा बोलबाला, ठरला २०२१ मध्ये पहिल्याच आठवड्यात सर्वाधिक कमाई करणारा तिसरा सिनेमा

सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा‘ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने हिंदी बॉक्स ऑफिसवरही कमाल करत पहिल्याच आठवड्यात ‘पुष्पा’ने २६ कोटींपेक्षाही अधिक रुपयांची कमाई केली आहे. पहिल्या आठवड्यामध्ये ‘स्पायडरमॅन-नो वे होम’ सारखे अनेक बहुप्रतीक्षित चित्रपट प्रदर्शित होऊनदेखील ‘पुष्पा’ हा चित्रपट त्या चित्रपटांना टक्कर देत आहे.

आता दुसऱ्या आठवड्यामध्ये अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांच्या ‘पुष्पा’ला रणवीर सिंगच्या ‘८३’ चित्रपटाचे आव्हान आहे. ‘पुष्पा’ हा चित्रपट हिंदीसोबतच तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये २डी आणि ३डी मध्ये प्रदर्शित झाला आहे.

‘पुष्पा’चा हिंदी भाषेतील बॉक्स ऑफिसवरील प्रवास पाहिला, तर चित्रपटाने चांगला वेग पकडला आहे. कामाच्या दिवशीही पुष्पाच्या कमाईमध्ये वाढ होताना दिसत आहे. हा चित्रपट १७ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला होता आणि ३.३३ कोटी रुपयांची ओपनिंग झाली होती. त्यानंतर चित्रपटाने शनिवारी ३.७९ आणि रविवारी ५.५६ कोटींची कमाई केली होती.

कामाच्या दिवशी (Working Day) या चित्रपटाने पहिल्या सोमवारी ३.७० कोटी, तर मंगळवारी ३.६० कोटी, बुधवारी ३.६० कोटी आणि गुरुवारी ३.३८ कोटी इतकी कमाई केली. हिंदी भाषेतील बॉक्स ऑफिसवर पुष्पा चित्रपटाने सात दिवसात २६.८९ इतकी कमाल केली. ‘पुष्पा’ हा या वर्षातील तिसऱ्या क्रमांकाच सर्वात जास्त कमाई केलेला चित्रपट आहे.

पहिल्या क्रमांकावर अक्षय कुमारचा (Akshay Kumar) सूर्यवंशी चित्रपट आणि दुसऱ्या क्रमांकावर सलमान खानचा (Salman Khan) ‘अंतिम’ हा चित्रपट आहे. ‘सूर्यवंशी’ या चित्रपटाने पहिल्या आठवड्यामध्ये १२० करोड इतकी कमाई केली. ‘अंतिम’ चित्रपटाने २९.३५ करोडची कमाई केली होती. वर्ल्ड वाइड कलेक्शनबद्दल बोलायचं झालं, तर ‘पुष्पा’ या चित्रपटाने २२९ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

अल्लू अर्जुनचा हा पहिला चित्रपट आहे, जो तेलुगू भाषेसोबत हिंदीमध्ये देखील रिलीज झाला आहे. सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा’ हा क्राईम ऍक्शन चित्रपट आहे. हा चित्रपट आंध्र प्रदेशातील जंगलातील चंदनाच्या लाकडाची तस्करी करणाऱ्या लोकांवर आधारित आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानासोबतच फहाद फासिल हे देखील मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटात समंथा रुथ प्रभूचे (Samantha Ruth Prabhu) आइटम सॉन्ग देखील आहे, जे खूप गाजले आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा