राजेश खन्ना यांना पाहताच सेटवर आलेल्या तरुणींनी केला एकच कल्ला, फाडले होते काकांचे कपडे


फॅन्स आणि कलाकार यांचे नातेच खूप अनोखे असते. फॅन्सशिवाय कलाकार नाही तर कलाकारांशिवाय फॅन्स नाही. दोन्ही एकमेकांवर अवलंबून आहेत. फॅन्स आपल्या आवडत्या कलाकारांसाठी आणि त्यांच्यावरील आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी नेहमीच वेगवेगळ्या युक्त्या शोधून काढतात. आजच्या काळात तर असे क्रेझी फॅन्स आणि त्यांच्या क्रेझी हरकती सोशल मीडियावर लगेचच व्हायरल होत असतात. असे क्रेझी फॅन्स फक्त आताच पाहायला मिळतात असे नाही, पूर्वीच्या काळी देखील वेडे फॅन्स असायचे. या फॅन्सचे आणि त्यांच्या कलाकाकारांबद्दल असलेले प्रेमाचे किस्से आजही बॉलिवूडमध्ये आणि मीडियामध्ये ऐकायला मिळतात. बॉलिवूडच्या पहिले सुपरस्टार असलेल्या राजेश खन्ना यांच्या फॅन्सचे किस्से ऐकाल तर डोळे पांढरे होतील. तरुणींच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या राजेश खन्ना यांच्यासाठी त्याकाळातील तरुणी वेडेच होत्या. रक्ताने पत्र लिहिले, त्यांच्या गाडीला किस करणे आदी अनेक गोष्टी त्या राजेश खन्ना यांच्यासाठी करायच्या. उद्या (२९ डिसेंबर) राजेश खन्ना यांचा स्मृतिदिन यानिमित्ताने जाणून घेऊया राजेश खन्ना आणि त्यांच्या फिमेल फॅन्सचे काही किस्से.

चाहत्यांचे न भूतो न भविष्यती असे प्रेम आजपर्यंत सर्वात जास्त अनुभवायला मिळाले ते अभिनेते म्हणजे राजेश खन्ना. बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार हा ताज मिळवणारे अभिनेते म्हणजे राजेश खन्ना अर्थात आपल्या सर्वांचे काका. राजेश खन्ना यांनी जे स्टारडम, फॅन्सचे प्रेम अनुभवले ते आजपर्यंत क्वचितच कोणाच्या वाटेला आले असेल. फॅन्सकडून राजेश खन्ना यांच्या रील आणि रियल या दोन्ही व्यक्तिमत्वांची हुबेहूब कॉपी केली जायची. त्यांची चालायची, नाचायची, खायची, बोलायची आदी सर्व स्टाइल तरुण मंडळी त्यांच्या आयुष्यात कॉपी करायचे. इतकेच नव्हते त्याकाळात जन्मलेल्या मुलांची नावे देखील ‘राजेश’ ठेवली जायची. राजेश खन्ना हे जेवढे तरुणांमध्ये प्रसिद्ध आणि लोकप्रिय होते तेवढेच किंबहुना जास्तच ते तरुणींमध्ये लोकप्रिय होते.

राजेश खन्ना यांच्या फॅन्स असलेल्या तरुणींबद्दलचे अनेक किस्से आजही इतक्या वर्षांनी ऐकवले जातात. मुली राजेश खन्ना यांना रक्ताने पत्र लिहायच्या, त्यांच्या पांढऱ्या रंगाच्या गाडीला मुली किस करायच्या. मुलींच्या लिपस्टिकमुळे ती गाडी लाल रंगाची दिसायची. शिवाय अनेक मुलींनी राजेश खन्ना यांच्या फोटोसोबत लग्न केले होते. असे अनेक किस्से राजेश खन्ना यांच्याबद्दल सांगितले जातात. आज आम्ही असाच एक जास्त कोणाला माहित नसलेला किस्सा तुम्हाला सांगणार आहोत.

राजेश खन्ना यांचा हा किस्सा जुनिअर मेहमूद यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितला होता. ते म्हणाले होते की, ” एकदा राजेश खन्ना यांच्या एका सिनेमाचे शूटिंग सुरु होते आणि ते शूटिंग पाहायला कॉलेजच्या काही मुली आल्या होत्या. काही वेळानंतर राजेश खन्ना सेटवर आले. ते आलेले पाहून त्या मुली वेड्या झाल्या आणि त्या काकांवर तुटून पडल्या. यादरम्यान झालेल्या ओढाताणीमध्ये काकांचे कपडे फाटले होते. काकांनी असे प्रेम अनेकदा अनुभवले होते, यावेळेस तर तरुणींनी चक्क काकांचे कपडे फाडले होते. हा अनुभव त्यांच्यासाठी देखील नवीनच होता. मात्र तरीही त्यांनी मुलींना सह्या दिल्या होत्या.”

जुनियर महमूद काकांच्या स्टारडमबद्दल पुढे म्हणाले, “मी त्यांच्यासोबत जवळपास १० चित्रपटांमध्ये काम केले मात्र जे स्टारडम राजेश खन्ना यांनी अनुभवले, माझ्या माहितीनुसार ते स्टारडम अजून कोणालाच मिळाले नाहीये. शुक्रवारी त्यांचा सिनेमा प्रदर्शित होणार असेल, तर शाळा कॉलेजमधून मुली त्यादिवशी गायब असायच्या.”

राजेश खन्ना यांनी त्यांच्या काळातल्या सर्वच अभिनेत्रींसोबत काम केले होते, मात्र शर्मिला टागोर आणि मुमताज यांच्यासोबत त्यांची जोडी विशेष गाजली. काही काळाने जेव्हा अमिताभ यांची एन्ट्री चित्रपटांमध्ये झाली तेव्हा राजेश खन्ना यांचं चार्म कमी होत गेला आणि त्यांचे सिनेमे फ्लॉप होऊ लागले होते.

हेही वाचा :

स्पृहा जोशीचा नवीन चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला, सिद्धार्थ चांदेकरसोबत दिसणार जबरदस्त केमिस्ट्री

अपयश पचनी पडत नसल्याने राजेश खन्ना यांनी एकदा दारूच्या नशेत केला होता आत्महत्येचा प्रयत्न

‘शेवटच्या क्षणापर्यंत राजासारखे जगले’, प्रकाश मेहरांनी दिला राजेश खन्ना यांच्या स्मृतींना उजाळा


Latest Post

error: Content is protected !!