Wednesday, October 9, 2024
Home मराठी कॅन्सर…त्याचा विश्वास खूप महत्त्वाचा! ‘बाईपण भारी देवा’ सिनेमातील भूमिकेबद्दल शरद पोंक्षे यांनी व्यक्त केल्या भावना

कॅन्सर…त्याचा विश्वास खूप महत्त्वाचा! ‘बाईपण भारी देवा’ सिनेमातील भूमिकेबद्दल शरद पोंक्षे यांनी व्यक्त केल्या भावना

मराठी इंडस्ट्रीमधील सर्वात मोठा सिनेमा म्हणून बाईपण भारी देवा या सिनेमाची ओळख निर्माण झाली आहे. केदार शिंदे दिग्दर्शित या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तर बक्कळ कमाई केलीच आहे, सोबतच प्रेक्षकांची मने जिंकण्यातही सिनेमा यशस्वी झाला आहे. रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी-मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब या अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहे. या सहा अभिनेत्रींसोबत लहानात लहान भूमिका देखील प्रेक्षकांच्या लक्षात राहत आहे. या लहान लहान भूमिका आणि त्या साकारणाऱ्या कलाकारांची सध्या खूपच चर्चा होताना दिसत आहे.

बाईपण भारी देवा सिनेमात मराठी, हिंदी इंडस्ट्रीमधील अतिशय प्रतिभावान अभिनेते शरद पोंक्षे यांनी देखील एक लहान आणि महत्वाची भूमिका साकारली आहे. सध्या त्यांच्या या भूमिकेची आणि त्यामागे असणाऱ्या एका किस्स्याची खूपच चर्चा रंगली आहे. या सिनेमात शरद पोंक्षे यांनी सुकन्या मोने यांच्या सासऱ्यांची भूमिका साकारली आहे. भूमिका छोटी असली तरी लक्षात राहणारी आणि महत्वाची आहे. या भूमिकेबद्दल शरद यांनी एक आठवण सांगितली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jio Marathi (@jiostudiosmarathi)

शरद पोंक्षे यांनी या सिनेमाबद्दल आणि त्यांच्या भूमिकेबद्दल म्हटले, “प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अनेकदा विविध चढ उतार येतात. माझ्या आयुष्यातील २०१९ हे वर्ष खूपच कठीण होते. त्याचवर्षी मला कॅन्सरने ग्रासले. या काळात मला अनेक सिनेसृष्टीतील माझ्या मित्र कलाकारांनी फोन केला. यातले एक नाव म्हणजे केदार शिंदे. मी आजारात होतो. तेव्हा केदार मला म्हणाला, “अरे लवकर बरा हो, तुझ्यासाठी एक भूमिका राखून ठेवली आहे. जेव्हा एखादा दिग्दर्शक आपल्याला आपल्या कठीण काळात असे काही म्हणतो, तेव्हा हा त्याचा तो विश्वास खूप महत्त्वाचा असतो”.

पुढे शरद पोंक्षे म्हणाले, “मी आजारातून बरा झालो. मात्र त्याला एक महिना देखील झाला नसेल तेव्हा मी हा चित्रपट शूट केला. त्यामुळे या चित्रपटात मी जो दिसतोय, त्यासाठी मी खूप मेहनत घेतली असेल असे जर कोणाला वाटत असले तर तसे अजिबातच नाही.”

दरम्यान बाईपण भारी देवा या सिनेमाने ५० कोटींची बक्कळ कमाई करत ‘वेड’ या सिनेमाला मागे टाकत नवीन रेकॉर्ड बनवले आहे. अजूनही सिनेमाची यशस्वी घोडदौड सुरूच असून आगामी काही दिवसात सिनेमा अजून दणदणीत कमाई करत असल्याचे जाणकारांनी सांगितले आहे.

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा