Friday, March 29, 2024

भवानी मातेचे आशिर्वाद घ्यायला ‘शेर शिवराज’ची टीम गेली प्रतापगडावर, शिवरायांच्या घोषणांनी गरजला सह्याद्री

सध्या मराठी चित्रपट जगतात अनेक नाविण्यपूर्ण विषयांवरील चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या चित्रपटांच्या कथा प्रेक्षकांना खूपच भावत आहेत. त्याचबरोबर सध्या शिवकालीन ऐतिहासिक चित्रपट मोठ्या प्रमाणावर तयार केले जात आहेत. त्यामुळे या चित्रपटांना प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद पाहायला मिळत आहे. नुकताच प्रदर्शित झालेला ‘पावनखिंड’ चित्रपटही सिनेमागृहात प्रचंड यशस्वी ठरला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा अभूतपुर्व प्रतिसाद पाहायला मिळाला. याआधी ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटांनी शिवकालीन शौर्यगाथा पडद्यावर मांडल्या होत्या. आता पून्हा एकदा दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांचा ‘शेर शिवराज’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी संपूर्ण टीमने प्रतापगडाला भेट दिल्याची माहिती समोर आली आहे.

सध्या छत्रपती शिवरायांची शौर्यगाथा सांगणारा ‘शेर शिवराज’ चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. या चित्रपटात हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग दाखवण्यात येणार आहेत. चित्रपटाचा दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरने चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करण्यास सुरूवात केली आहे. त्याआधी या चित्रपटाच्या संपूर्ण टीमने प्रतापगडावर जात भवानीमातेचे आशिर्वाद घेतले आहेत. हिंदवी स्वराज्यातील महत्वाचा किल्ला समजल्या जाणाऱ्या पवित्र भूमीवर पाऊल ठेवले, त्यावेळी सातारकरांनीही त्यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी ढोल ताशांचा गजर, पोवाडे, डफ आणि शिवरायांच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.

दरम्यान, ‘शेर शिवराज’ हा चित्रपट २२ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या बहुचर्चित चित्रपटात छत्रपती शिवरायांची भूमिका अभिनेता चिन्मय मांडलेकरने साकारली आहे. या चित्रपटात अफजल खान वधाचा ऐतिहासिक प्रसंगही दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे चित्रपटगृहात पून्हा एकदा शिवरायांच्या घोषणा गरजणार असल्याचे चित्र दिसत आहे. या चित्रपटाची आता जगभरातील शिवप्रेमींना आतुरता लागली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा- 

हे देखील वाचा