×

ऐसा यूगे यूगे स्मरणीय सर्वदा’, ‘शेर शिवराज’ चित्रपटाचा अंगावर काटे आणणारा ट्रेलर झाला रिलीज

जगभरातील शिवप्रेमींना ज्याची दिर्घकाळापासून प्रतिक्षा लागली होती. ज्यासाठी शिवप्रेमी आतुर झाले होते तो दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘शेर शिवराज‘ चित्रपटाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. छत्रपती शिवरायांच्या स्मरणीय कारकिर्दिचा दैदीप्यमान इतिहास सांगणारा हा चित्रपट २२ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याआधी चित्रपटाचा दमदार ट्रेलर समोर आला आहे ज्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या अतुलनीय पराक्रमाची झलक पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावरुन याआधीच चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी ट्रेलर समोर येणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे शिवप्रेमींची ही प्रतिक्षा आता संपली आहे. 

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, मराठी चित्रपट जगतात सध्या ऐतिहासिक चित्रपटांची मालिकाच पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. याआधी ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ सारख्या ऐतिहासिक चित्रपटांनी सिनेमागृहे भरुन गेली होती. जगभरातील शिवप्रेमींनी या चित्रपटांना जबरदस्त प्रतिसाद दिला.या चित्रपटांच्या यशाने मराठी चित्रपट जगताला आणि शिवरायांच्या स्वराज्यातील अनेक मावळ्यांना नव्याने ओळख मिळवून दिली होती. आता पून्हा एकदा दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा शेर शिवराज चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आधीच समोर आली होती. आता नुकताच चित्रपटाचा भव्यदिव्य ट्रेलर रिलीज झाला आहे. जो पाहून प्रेक्षकांच्या अंगावर काटा उभा राहत आहे.

रिलीज झालेल्या या ट्रेलरमध्ये शिवरायांच्या भूमिकेत अभिनेता चिन्मय मांडलेकरने दमदार अभिनय केलेला दिसत आहे. भारदस्त व्यक्तिमत्व आणि पहाडी आवाज यामुळे शिवरायांच्या भूमिकेत चिन्मय मांडलेकरने थक्क करणारा अभिनय केला आहे. भवानी मातेच्या प्रतिमेने आणि क्रुर अफजल खानाच्या अन्यायी जुलमी वृत्तीने सुरू होणाऱ्या या ट्रेलरमध्ये शिवरायांच्या दमदार एंट्रीने सगळ्यांच्याच अंगावर काटा उभा राहतो. आता प्रेक्षकांना आणि जगभरातील शिवप्रेमींना या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. चित्रपटाच्या संपूर्ण टीमने काही दिवसांपूर्वी प्रतापगडावर जात भवानी मातेचे दर्शन घेतले होते. त्यावेळी जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता. आता पून्हा एकदा या घोषणा चित्रपटगृहांमध्ये गरजणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Latest Post