आजही स्मरणात आहे मांढरे बंधूनी उभे केलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे अजरामर व्यक्तिमत्व


महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९१ वी जयंती शुक्रवारी राज्यासह संपूर्ण जगभरात साजरी करण्यात आली. ह्या व्यक्तिमत्वाला सांगण्यासाठी शब्द देखील अपुरे पडावे असे हे अनाकलनीय, भव्य, हुशार, शूर छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्रासाठी किंबहुना संपूर्ण देशासाठी आण, बाण आणि शान आहेत. त्यांच्याशिवाय या देशाचा इतिहास हा अपूर्णच. महाराजांच्या असंख्य शौर्यगाथा आपल्याला ऐकायला, वाचायला आणि पाहायला मिळतात.

त्यांचे आभाळालाही लाजवणारे एवढे मोठे कर्तृत्व पाहून मनोरंजन सृष्टीलाही त्यांच्यावर कलाकृती बनवण्याचा मोह आवरला नाही. अगदी ब्लॅक अँड व्हाईट सिनेमांपासून ते आजच्या अनिमेशन, व्हीएफएक्सच्या काळातही महाराजांवर सिनेमे बनत आहेत. आता महाराजांवर तयार होणाऱ्या सिनेमांमध्ये अनेक कलाकारांना आपण ह्या जाणता राजाची भूमिका पडद्यावर साकारावी अशी प्रचंड इच्छा असते. आजवर अनेक मोठ्या कलाकारांनी महाराजांच्या भूमिकेला योग्य न्याय देण्याचा १०० टक्के प्रयत्न केला आहे. ते कलाकार काही स्वरूपात यशस्वी देखील झाले. मात्र आज जर जुना जमान्यातील प्रेक्षकांना विचारले की महाराजांची भूमिका कोण उत्तम साकारू शकते? तर त्यांचे एकच उत्तर असेल, आणि ते म्हणजे मांढरे बंधू.

आपल्याकडे भालजी पेंढारकरांनी छत्रपतींवर अनेक चित्रपट बनवले. त्या प्रत्येक सिनेमात सूर्यकांत मांढरे आणि चंद्रकांत मांढरे यांच्यापैकी एक जण शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार हे ठरलेले असायचे. मांढरे बंधूंनी जुन्या काळात अनेक ऐतिहासिक सिनेमांमध्ये काम केले. त्यांच्या शिवाजी महाराजांच्या भूमिका विशेष गाजल्या. महाराजांच्या भूमिका अजरामर करण्यामागे या बंधूंचा मोलाचा वाटा आहे. पिळदार आणि रांगडी शरीरयष्टी आणि त्यांच्या डोळ्यात असणारा कणखरपणा त्यांना ही भूमिका मिळवून देण्यात महत्वाचे ठरले.

महाराज म्हटल्यावर अजूनही जुन्या प्रेक्षकांच्या मनात चंद्रकांत-सूर्यकांत मांढरे यांचाच चेहरा येतो. महाराजांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाने या कलाकारांना एक वेगळीच आणि कधीही पुसली न जाणारी लोकप्रियता मिळवून दिली. भालजी पेंढारकरांनी यांच्या चित्रपटांमधून या दोघांनी आलटून-पालटून महाराजांच्या भूमिका करण्याची संधी दिली.


Leave A Reply

Your email address will not be published.