Thursday, April 25, 2024

‘वेदनेपासून लांब नाही…’ म्हणत सोना मोहापात्राने आर्थिक अडचणींबद्दल केले खुलासे!

कोरोना महामारीने लागलेल्या लॉकडाऊनमुळे बर्‍याच लोकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. केवळ सामान्य माणसेच नव्हे, तर काम बंद पडल्यामुळे काही सेलेब्रिटीही पैशाच्या अडचणींसह झगडत आहेत. अलीकडेच अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट्सद्वारे, ते सामोरे जात असलेल्या समस्यांविषयी खुलासा केला होता. तर त्याचवेळी आता प्रसिद्ध गायिका सोना मोहापात्राने सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे की, ती कोणत्या स्थितीत आहे आणि कशाप्रकारे आर्थिक संकटाला सामोरे जात आहे.

गायिकेच्या म्हणण्यानुसार, तिची सर्व बचत एका चित्रपटात गेली आहे आणि आता तिचे कामही लॉकडाऊनमुळे थांबले आहे. हे सर्व सोना मोहापात्राने एका पोस्टद्वारे चाहत्यांना सांगितले आहे आणि स्वत: चा एक फोटोही शेअर केला आहे.

सोना मोहापात्राने तिच्या ट्विटर हँडलवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तीने तिचा हसतानाचा एक फोटो शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “वेदनेतून पळून नाही जाऊ शकत, त्याचा ताण घ्यायचा का नाही ही आपली निवड आहे. मी जमेल तेव्हा स्वत: ला हसवते.”

तिने तिच्या आर्थिक स्थितीबद्दल लिहिले की, “माझा चित्रपट ‘शट अप सोना’ हा आजही जगभर प्रवास करत असून, अनेक फिल्म फेस्टिव्हल जिंकत आहे. माझी सर्व बचत महामारीच्या काही काळ आधीच या चित्रपटामध्ये गेली,  आणि आम्हाला अशा स्थितीत आणले जिथे उत्पन्नाचा काहीही स्रोत उपलब्ध नाही.”

सोना मोहापात्राचे ट्वीट बघता बघताच व्हायरल झाले. चाहते तिच्या पोस्टवर कमेंट करून, तिला धैर्य राखण्याचा सल्ला देत आहेत. काही जणांनी लिहिले की, ही वाईट वेळ देखील निघून जाईल. मी तुमच्यासाठी प्रार्थना करीन. तर या व्यतिरिक्त काही युजर्सने तिच्या चित्रपटाच्या यशाबद्दल तिचे अभिनंदन केले.

सोना मोहापात्रा तिच्या गाण्यांबसोबतच तिच्या नि:पक्ष मतांसाठी प्रसिद्ध आहे. गेल्या वर्षी ती एका मुलाखतीत म्हणाली होती की, “गेल्या अनेक दिवसांपासून मला कोरोना विषाणूवर आधारित गाणी बनवण्याच्या ऑफर येत आहेत, पण मी सर्व ऑफर नाकारल्या आहेत. कारण माझा असा विश्वास आहे की संगीत स्वतः मध्येच खूप आरामदायक आहे आणि मला वाटते की कोरोनावर आधारित गाणी बनवण्याची गरज नाही.” सोनाच्या या निर्णयाचे चाहत्यांकडून खूप कौतुक झाले.

हे देखील वाचा