Thursday, March 28, 2024

संगीतविश्वाला ‘या’ सिनेमामुळे मिळाली विशाल- शेखर जोडी, आयपीएलचं अँथम साँग बनवण्यात उचलला मोलाचा वाटा

बॉलिवूड शब्द ऐकला तरी एक ग्लॅमरस जग डोळ्यासमोर उभं राहातं. रोज काहीतरी या जगात घडत राहातं. दररोज काही नाती बनतात, मैत्री होते तसेच ही नाती, मैत्री कधी आयुष्यभरासाठी जोडली जातात, तर कधी अल्पकाळातच मोडतात. प्रत्येकाची वेगवेगळी मतं, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या गरजा, प्रत्येकाच्या नवीन कल्पना, दृष्टीकोन. अशा सातत्याने व्यस्त जगातही एक जोडी आहे जिने जवळपास दोन दशके एकत्र काम करताना आपली एक वेगळी ओळख आणि छाप पाडली. त्यांचं नाव जरी घेतलं तरी अनेकांना ती एकच व्यक्ती पटकन वाटून जाते. अगदी ते दोघेही म्हणतात की, एकमेकांशिवाय ते पूर्ण होऊ शकत नाही. ती जोडी म्हणजेच विशाल- शेखर यांची. एक कम्प्लिट पॅकेज असं त्यांना म्हणता येईल. गीतकार, संगीतकार, गायक असं सगळंच ते करतात. आजपर्यंत शेकडो गाण्यांसाठी त्यांनी कामं केलीये. त्यांची अनेक गाणी इतकी हिट ठरलीत की युट्यूबवर रेकॉर्ड्ही त्यांच्या नावावर झालेत. नक्की काय आहे या जोडीची कहाणी. कशी झाली सुरूवात त्यांच्या करियरची चला जाणून घेऊया.

विशाल ददलानी, जन्म मुंबईतला. एका सिंधी कुटुंबात २८ जून, १९७३ रोजी त्याचा जन्म झाला. घरात तसा काही संगीताचा वारसा नव्हता, पण त्याच्या वडिलांना गाणी ऐकण्याची प्रचंड आवड होती. ते वेगवेगळ्या प्रकारची गाणी ऐकायचे, अगदी डिस्को-पॉप पासून गजलपर्यंत. त्यामुळे विशालचा कल आपोआपच संगीताकडे जास्त वाढत गेला. त्याने १९९४ साली कॉमर्समध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि त्याचवर्षी मुंबईतील इंडि रॉक बँड पेंटाग्राम जॉईन केला. या बँडसाठी तो गायचा.

दुसरीकडे, शेखर रावजियानीचा जन्म विशालनंतर ३ वर्षांनी म्हणजे २९ नोव्हेंबर, १९७६ रोजी कच्छी, गुजराती कुटुंबात झाला. त्याचं कुटुंब व्यावसाय करणारं होतं. मात्र, त्याच्याही वडिलांना संगीताची आवड होती. त्यांनी ऍकॉर्डियन शिकलं होतं. तसेच त्यांच्याघरी काही संगीताशी निगडीत मान्यवर मंडळी यायची. तिथूनच शेखरने संगीतात रस घेण्यास सुरुवात केली. त्याने वडिलांकडून ऍकॉर्डियन शिकलं. तसेच तो उत्साद नियाज अहमद खान यांच्याकडून जवळपास ५-६ वर्षे शास्त्रीय संगीतही शिकला. यानंतर तो हळूहळू स्वत:ची गाणी कंपोज करू लागला. त्याने जाहिरातींसाठीही कामं करायला सुरुवात केली. १९९७ मध्ये तो ‘सा रे ग म प’ या रिऍलिटी शोचा स्पर्धकही होता. त्यामुळे त्याला स्टेजवर परफॉर्मन्सची सवय होतीच.

अशात एकदा त्याच्या मित्राने त्याची टेप मुकुंद आनंद यांना ऐकवली आणि त्यांनी लगेचच शेखरला फोन करून बोलावून घेतलं. त्यानंतर त्याने दस चित्रपटासाठी २ गाणी गायली. त्याचबरोबर मुकुंद आनंद यांच्या प्रोडक्शनच्या जाहिरातींसाठीही काम केलं. त्याचवेळी त्याला १९९९ साली रिलीज झालेल्या ‘प्यार में कभी कभी’ या चित्रपटातील गाण्यांसाठी काम मिळालं. आणि हाच चित्रपट विशाल- शेखर जोडी तयार होण्यासाठी कारण बनला. कसं असा प्रश्न पडला असेलच, तर झालं असं की, याच चित्रपटातील गाण्यांसाठी विशालही काम करत होता. मात्र, शेखर आणि विशाल या दोघांच्या शिफ्ट वेगळ्या असल्याने ते लवकर भेटले नव्हते. तसे ते लहानपणापासून एकमेकांना ओळखायचे. त्यामुळे वेगळी ओळख होण्याची गरज नव्हती, पण दोघांनाही माहित नव्हतं की, ते एकाच चित्रपटासाठी काम करत आहेत. एकदिवस त्यांनी एकमेकांना पाहिलं आणि थोडी विचारपूस केल्यावर त्यांना समजलं अरेच्छा आपण एकाच चित्रपटासाठी काम करतोय. मग काय नव्याने या इंडस्ट्रीत दाखल होत असताना त्यांनी एकमेकांना गाणी ऐकवायला वैगरे सुरुवात केली आणि मग इथेच त्यांची जोडी जमली आणि मग या जोडीने पुढे इतिहास रचला.

तसं संगीतकार जोडीचा इतिहास भारतात पूर्वीपासूनच चालत आलेला. त्यामुळे एखादी संगीतकार जोडी पुढे येणे काही नवीन नव्हतं. तरीही विशाल-शेखर जोडीने आपली वेगळी छाप पाडण्यात यश मिळवलं. त्यांची ताकद होती की, ते स्टोरी नीट समजून घेत, परिस्थितीत समजून घेत आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांची एखाद्या प्रोजेक्टशी जोडलेल्या लोकांशी ऍडजेस्ट करण्याची सवय. एखादी ट्यून कशी होऊ शकेल, ती त्या चित्रपटाच्या कथेत कशी बसेल या सर्वच गोष्टींचा बारीक अभ्यास त्यांच्याकडून होतो. मग कधी गीतकाराकडून तसं गाणं लिहून घेतलं जातं, किंवा ते स्वत: गाणी लिहितातही, कधी गीतकाराबरोबर बसून स्वत: गाणी तयार करतात. असं करत त्यांची गाणी तयार होतात. प्रत्येक गाण्यातून काहीतरी वेगळं देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

त्यांना सर्वात पहिला पुरस्कार मिळाला तो म्हणजे झंकार बिट्स या चित्रपटासाठी. अगदी नवीनच त्यांची जोडी बनलेली असताना त्यांना २००३ साली रिलीज झालेल्या झंकार बीट्ससाठी काम मिळालं. या चित्रपटातील गाणी विशालनेच लिहिली. तर विशाल- शेखर जोडीने संगीत दिग्दर्शन केलं होतं. त्यासाठी त्यांना फिल्मफेअरचा आरडी बर्मन पुरस्कार मिळाला होता, जो संगीतात नवीन प्रतिभा दाखवणाऱ्यांना दिला जातो. या चित्रपटातील त्यांची ‘मुसू मुसू हासी’, ‘सुनो ना’, ‘तू आशिकी है’ अशी गाणी चांगलीच प्रसिद्ध झाली. यानंतर मात्र या जोडीने मागे वळून पाहिलं नाही. अनेक दिग्दर्शकांबरोबर त्यांनी कामं केली. मग फराह खान असो, सिद्धार्थ आनंद असो, करण जोहर असो, रोहित शेट्टी असो. त्यांनी पुढे ब्लफमास्टर, दोस्ताना, तीस मार खान, टशन, बचना ए हसिनो, आय हेट लव्ह स्टोरीज, अंजाना अंजानी, स्टुडंट ऑफ द इयर, बेफिक्रे, हॅप्पी न्यू इयर, बँग बँग, रावण अशा अनेक हिट चित्रपटांच्या गाण्यांसाठी कामं केली. त्यातही त्यांनी कधीही एकाचप्रकारची गाणी केली नाही, अगदी दस बहाणे, बिन तेरे, राधा ते शिला की जवानी, गुलाबो अशा वेगवेगळ्या धाटणीची गाणी त्यांनी तयार केली.

त्यांनी वेगवेगळ्या मुलाखतींमध्येच असेच सांगितलेले काही किस्से म्हणजे, द डर्टी चित्रपटासाठी त्यांना नव्वद, ऐंशीच्या दशकाप्रमाणे त्यांनी ट्यून्स दिल्यात. एकदा तर आय हेट लव्ह स्टोरी चित्रपटाच्या वेळी सुनिधी चौहान आणि शफाकत अमानत अली यांनी बिन तेरे या गाण्याचे रेकॉर्डिंग केल्यानंतर एक नवी ट्यून शेखरला सुचली होती. ती त्याने दिग्दर्शक पुनित मल्होत्राला ऐकवली, आणि पुनितने त्याच्याकडून बिन तेरे हे केवळ गिटारचा बॅकग्राऊंड आवाज असलेलं गाणं रेकॉर्ड करून घेतलं होतं. अंजाना अंजानी चित्रपटातील ‘तुझे भुला दियां’ गाणं जर नीट ऐकलं तर लक्षात येईल, त्यातील प्रत्येक कडव्याला वेगवेगळ्या प्रकारे सादर करण्यात आलंय. त्यात कव्वालीचीही एक झलक दिसून येते. आणखी एक किस्सा असा की देसी गर्ल गाण्यावेळी विशाल- शेखर यांना दुसऱ्या दिवशी २ महिन्यांसाठी बाहेर जायचं होतं, पण त्यावेळी त्यांना गाण्याचा ट्यून सुचत नव्हती. पुढे अचानक त्यांना रात्री त्यासाठी ट्यून सापडली. त्यांनी गीतकार कुमारकडून गाणं लिहून घेतलं शंकर महादेवन, सुनिधी चौहान आणि विशाल यांनी हे गाणं रेकॉर्डही केलं. त्यानंतर ते २ महिन्यांसाठी टूरवर जाण्यासाठी वेळेत प्लेनमध्येही बसले होते.

बरं त्यांनी काही फक्त हिंदी चित्रपटांसाठी कामं केली का तर नाही, त्यांनी मराठी, दाक्षिणात्य गाण्यांसाठीही कामं केली. बालक-पालक त्यांचा पहिला मराठी चित्रपट ठरला. या चित्रपटातील ‘कल्ला’ गाणं विशालने गायलं होतं, तर ‘हरवली पाखरं’ शेखरने गायलं. तसेच या चित्रपटातील सर्व गाण्यांसाठी त्यांनी संगीत दिग्दर्शकाचंही काम केलं. इतकंच नाही, तर अगदी एकमेकांबरोबर जोडी तयार करण्याआधीपासूनच या दोघांनाही स्टेज परफॉर्मन्सचीही सवय होतीच, त्यामुळे त्यांनी भारतातच नाही, तर आंतररास्ट्रीय स्तरावरही अनेक स्टेज परफॉर्मन्स केले. त्यांनी सारेगमप, इंडियन आयडल अशा विविध रिऍलिटी शो साठी जज म्हणूनही काम केलं. त्यांनी आयपीएलच्या तिसऱ्या, सहाव्या आणि सातव्या हंगामांसाठी अँथम साँगही केली. इतकंच नाही, तर कोलकाता नाईट रायडर्सचं अँथम साँगही त्यांनी केलंय. त्यांनी ब्रिटिश रॉक बँड द व्हॅम्पबरोबर कोलॅबोरेशनही केले. अनेकदा संगीतकार, गीतकार हे पडद्याच्या मागे राहातात. विशाल- शेखर स्टेज शो, रिऍलिटी शो आशा गोष्टींमुळे सर्वांसमोर आलेही आणि लोकांना संगीतकार म्हणून माहितही झाले. आज ते सिनेसृष्टीतील प्रसिद्ध चेहरा देखील आहेत. त्यांच्या यशाचे कारण जेव्हा त्यांना विचारले जोते, त्यावेळी ते एक गोष्ट सांगतात की ते नेहमी शिकत राहातात. कारण संगीत अशी गोष्ट आहे, ज्यात रोज काहीतरी नवीन यायला हवे. त्यामुळे ते जगभरातील विविध गाणी ऐकत असतात, त्यातून शिकत असतात, वेगवेगळ्या टेक्नोलॉजी शिकतात. कदाचित याच गोष्टीमुळे आज दोन दशकांनंतरही त्यांची जोडी यशाच्या शिखरावर आहे. या दोघांची आणखी एक विशेष गोष्ट अशी की या दोघांनी काही चित्रपटात पाहुणे कलाकार म्हणूनही काम केलंय. शेखरने नीरजा चित्रपटात, तर विशालने ओम शांती ओम, तिस मार खान, हॅप्पी न्यू इयर या चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका निभावल्या आहेत.

पण एक जोडी म्हणून काम करत असतानाही दोघांचीही व्यक्तिमत्त्व वेगळी आहेत आणि याचा त्यांनी नेहमीच आदर राखला. विशाल अनेकदा वेगवेगळ्या गोष्टींवर मतं मांडताना दिसला, त्यामुळे अनेकदा तो वादातही अडकला. त्याने आम आदमी पार्टी पक्षाला खुलेपणाने समर्थनही दिले होते, तर शेखर फारसा अशा गोष्टीत पुढे आला नाही. दोघांनी आपापली वैयक्तिक कामंही केली. शेखरने साजणी, सावली ही मराठी गाणीही गायली, तर विशाल त्याच्या बँडबरोबरही काम करत राहिला. असं असतानी त्यांनी एकमेकांची साथ कधी सोडली नाही, हा पण भांडणं कधी झाली नाहीत असंही नाही, दोन व्यक्ती जेव्हा एकमेकांबरोबर काम करतात, तेव्हा त्यांच्यात वाद होतात, तसं त्यांच्यातही झाली, पण त्यांचं म्हणणं असं आहे की, ही भांडणं नेहमीच काम चांगलं होण्यासाठीच होत राहतात. यामुळे त्यांनी कधी वेगळे होण्याचा निर्णय घेतला नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by VISHAL (@vishaldadlani)

त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही कधी त्यांनी फारशी चर्चा केलेली नाही, पण जेव्हा विशालने त्याच्या पत्नीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतलेला, तेव्हा तो पहिल्यांदा एक स्टेटमेंट जाहीर केले होते. प्रियालीबरोबर त्याने १९९९ साली लग्न केले होते, पण १८ वर्षांच्या संसारानंतर त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय २०१७ मध्ये घेतला. त्यावेळी विशालने सांगितलेले की, जरी त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला असला, तरी ते पुढे चांगले मित्र म्हणून राहतील. शेखरबद्दल सांगायचे झाले, तर तो छायाबरोबर सुखाने संसार करत असून त्यांना बिपाशा नावाची मुलगी देखील आहे. शेखरने अनेकदा असेही बोलून दाखवले आहे की, त्याला म्युझिकल स्कूलही चालू करायचे आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by VISHAL (@vishaldadlani)

विशाल- शेखर अनेकांसाठी हे एकाच व्यक्तीचं नाव वाटतंही, दोन दिग्गज कलाकारांची जोडी असणाऱ्या त्यांच नाव भारतीय संगीत क्षेत्राच्या इतिहासात सुवर्णक्षरांनी लिहिलं गेलंय हे मात्र नक्की. त्यांची अनेक गाणी आजही अनेकांच्या प्लेलिस्टमध्ये वाजत असतात. आजही ही जोडी संगीत क्षेत्रात सक्रिय असून त्यांना अजूनही पुढे खूप काम करण्याची अपेक्षा आहे. त्यांनी पुढेही असंच संगीतात दमदार काम करत राहावं आणि नेहमीच एकत्र राहावं हीच अपेक्षा आता आपण करू शकतो.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

‘सख्खे भाऊ, पक्के वैरी’ म्हणीला फाट्यावर मारणारे साजिद-वाजिद, ज्यांनी सलमानलाही बनवले सुपरस्टार

किशोरदांच्या चित्रपटात रफीसाहेबांना गाणं गायला लावणारी शंकर-जयकिशन संगीतकार जोडी, का पडली नात्यात फूट?

बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करणारे ५ मराठी सिनेमे तुम्हाला माहितीयेत का? एका क्लिकवर घ्या जाणून

हे देखील वाचा