×

लता मंगेशकर यांच्या गाण्याबद्दल चुकीची माहिती दिल्यामुळे तारक मेहता…शो झाला ट्रोल, मेकर्सने मागितली माफी

तारक मेहता का उलटा चश्मा या शोने मागील १३ वर्षांपासून लोकांच्या मनावर राज्य केले आहे. या १३ वर्षांमध्ये या शो ने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत त्यांना खळखळून हसवले. जसजसा काळ पुढे सरकला तसतशी या शोची लोकप्रियता अधिकच वाढली. आज एवढ्या वर्षांनी देखील हा शो टीआरपीच्या रेसमध्ये टॉपवर आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणाऱ्या या शोमध्ये एक मोठी चूक झाली आहे. या चुकीमुळे शोच्या निर्मात्यांना माफी देखील मागावी लागली.

सध्या शोमध्ये चालू असलेल्या ट्रॅक नुसार मागील दोन भागांमध्ये जुन्या गाण्यांवर सर्वच गोकुलधाम वासी एन्जॉय करताना दिसत आहे. यासोबतच जुनी गाणी वाजवत त्यावर चर्चा देखील होताना दाखवले गेले. यातच लता मंगेशकर यांचे अजरामर असे ‘ए मेरे वतन के लोगों’ हे गाणे वाजवण्यात आले. या गाण्यावर सर्वच गोकुलधाम वासी चर्चा करतात. या गाण्याबद्दल माहिती देताना गोकुलधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी असणारा मास्टर भिडे म्हणतो, “हे गाणे १९६५ साली प्रदर्शित झाले. जेव्हा तत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांनी लता मंगेशकर यांना हे गाणे गाताना ऐकले तेव्हा ते भावुक झाले आणि त्यांच्या डोळ्यातही अश्रू आले.”

या भागामध्ये भिडेने सांगितलेली गाण्याच्या प्रदर्शनाची तारीख चुकीची होती. हे लोकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर शोला ट्रोल करण्यास सुरुवात केली. अनेकांनी शोला टॅग करत त्यांची झालेली चूक लक्षात आणून दिली. हा वाद वाढत आहे हे पाहून शोच्या निर्मात्यांनी या शोच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून माफी मागत एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी लिहिले, “आम्ही आमच्या शुभचिंतकांची, फॅन्स आणि दर्शकांची माफी मागत आहोत. आजच्या भागात आमच्याकडून ‘ए मेरे वतन के लोगों’ या गाण्याच्या प्रदर्शनाच्या तारखेबद्दल चुकीची माहिती देण्यात आली. आम्ही शोमध्ये १९६५ साल सांगितले. मात्र हे गाणे २६ जानेवारी १९६३ साली आले होते. आम्ही आमची चूक सुधारत असून, भविष्यात अशी चूक होणार नाही याची काळजी घेऊ. असित कुमार मोदी आणि संपूर्ण टीम”

तत्पूर्वी शोमध्ये नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर मजेशीर पद्धतीने भाष्य केले जाते. या शोमध्ये दाखवले जाणारे सर्वच भाग प्रेक्षकांना खूपच आवडतात.

हेही वाचा-

Latest Post