महाराष्ट्राचे लाडके सुपरस्टार सुबोध भावे यांच्या हस्ते नुकताच ‘टकाटक २’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. यावेळी सुबोध भावे यांनी ‘टकाटक’च्या आठवणींना उजाळा देत संपूर्ण टीमचं कौतुक केलं. ‘टकाटक २’ला बॅाक्स ऑफिसवर भरघोस यश मिळावं यासाठी सुबोध भावे यांनी शुभेच्छाही दिल्या. १८ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणारा ‘टकाटक २’ हा चित्रपट प्रेक्षकांचं टकाटक मनोरंजन करणार आहे. ‘घे टकाटक दे टकाटक…’ आणि ‘लगीन घाई…’सारख्या ताल धरायला लावणार्या धम्माल गाण्यानंतर आता ‘टकाटक २’च्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळत असून, त्यातील संवादांसोबतच कलाकारांचा अभिनय आणि गीतांवर तरुणाईपासून सर्वच वयोगटातील प्रेक्षक खुश झाले आहेत.
नेहमीच प्रवाहापेक्षा वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करणारे दिग्दर्शक मिलिंद कवडे यांच्या संकल्पनेतून ‘टकाटक २’ हा चित्रपट बनला आहे. याची कथा आणि पटकथाही मिलिंद कवडे यांनीच लिहिली आहे. मित्रांचा ग्रुप, त्यांची धमाल-मस्ती, त्यांच्यातील मिश्किल संवाद, विनोदी आणि भावूक प्रसंग, मनोरंजक गाणी, पंचेस असलेली डायलॅागबाजी आणि या जोडीला पुन्हा काहीतरी वेगळा विचार घेऊन आल्याची चाहूल हा ‘टकाटक २’च्या ट्रेलरचा प्लस पॅाईंट आहे.
नयनरम्य लोकेशन्सवर चित्रीत करण्यात आलेली गाणी, तरुण कलाकारांचा दमदार अभिनय, सामाजिक जाणिवेचं भान राखून विनोदाची किनार जोडून केलेलं दिग्दर्शन आणि साथीला असलेलं आशयघन कथानक ही ‘टकाटक २’ची बलस्थानं असल्याचं ट्रेलर पाहिल्यावर जाणवतं. ‘मैत्रीसाठी काय पण…’ असं म्हणत जीवाला जीव देणाऱ्या मित्रांची कथा मांडताना अॅडल्ट-कॅामेडी असली तरी समतोल राखून बनवलेला चित्रपट ‘टकाटक २’च्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘टकाटक २’च्या ट्रेलरला अल्पावधीतच प्रेक्षकांकडून तूफान प्रतिसाद मिळत आहे.
‘टकाटक २’चं संवादलेखन किरण बेरड आणि संजय नवगिरे यांनी केलं आहे. या चित्रपटात प्रथमेश परब, अजिंक्य राऊत, प्रणाली भालेराव, अक्षय केळकर, भूमिका कदम, कोमल बोडखे, सुशांत दिवेकर, स्वप्नील राजशेखर, किरण माने, पंकज विष्णू, किरण बेरड, आरजे महेश काळे, स्मिता डोंगरे आदी कलाकार आहेत. गीतकार जय अत्रे यांनी गीतलेखन केलं असून, संगीतकार वरुण लिखते यांनी संगीत दिलं आहे.
सिनेमॅटोग्राफर हजरत शेख वली यांनी सुंदर केलेलं छायालेखन खिळवून ठेवणारं असून, निलेश गुंडाळे यांनी कार्यकारी निर्मात्याचं काम सांभाळलं आहे. पार्श्वसंगीत अभिनय जगताप यांनी दिलं आहे. नरेश चौधरी, आदित्य जोशी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. मिलिंद कवडे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. १८ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा –
सोनी मराठी वाहिनीवरील ‘गाथा नवनाथांची’ मालिकेतील कलाकारांची सासवडच्या कानिफनाथ मंदिराला भेट!
गझलकार राहत इंदौरी पुण्यतिथी, वाचा राहत कुरेशी वरुन राहत इंदौरी होण्याचा रंजक किस्सा
वाढदिवस विशेष: ६१ वर्षाचा झाला सुनिल शेट्टी, वाचा कोट्यवधींचा मालक असलेल्या अभिनेत्याचा सिनेप्रवास