‘व्वा! काय जोडी आहे’, सोनाली कुलकर्णीने पती कुणालसोबत अनोख्या अंदाजात साजरी केली ‘वन मंथ वेडिंग ऍनिव्हर्सरी’

this is how sonalee kulkarni celebrating her one month wedding anniversary


गेल्या काही दिवसांपासून मराठमोळी ‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत येत आहे. तिने अचानकपणे दुबईत लग्न करून, चाहत्यांना आश्चर्याचा आणि आनंदाचा धक्का सोबतच दिला होता. सोनाली ७ मे २०२१ रोजी, कुणाल बेनोडेकरसह रेशीमगाठीत अडकली आहे. या जोडप्याने दुबईमध्ये अगदी साध्या पद्धतीने लग्न उरकून घेतले. केवळ २ साक्षीदारांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला होता. या लग्नाला त्यांच्या घरचे एकही सदस्य उपस्थित नव्हते. लग्नानंतर या जोडप्याचे सुंदर फोटो समोर आले होते. नुकताच या गोड दाम्पत्याच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला आहे. या निमित्ताने सोनालीने एक व्हिडिओ शेअर करून सांगितले आहे की, हा खास दिवस त्यांनी कसा साजरा केला.

सोनालीने नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती आणि तिचा पती कुणाल एकत्र मिळून व्यायाम करताना दिसत आहेत. यात दोघांनीही वर्कआऊट ड्रेस घातला आहे. तसेच एका गाण्याच्या धूनवर दोघेही अतिशय उत्कृष्टरित्या व्यायामाचे स्टेप्स करत आहेत. यातील दोघांच्या हालचाली अगदी पाहण्यासारख्या आहेत.

हा व्हिडिओ शेअर करत सोनालीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “आम्ही अशा प्रकारे साजरा करतो…
आणि कमीतकमी आयुष्यभर तरी आम्हाला हेच सुरू ठेवायचे आहे.” चाहत्यांसोबतच यावर कलाकारांच्या देखील प्रतिक्रिया उमटत आहेत. हा व्हिडिओ शेअर करून या नवविवाहित दाम्पत्याने अनेक जोडप्यांसमोर ‘कपल गोल्स’चं एक उत्तम उदाहरण सादर केलं आहे. नेटकरी व्हिडिओखाली कमेंट करून या दोघांचेही कौतुक करत आहे. एका युजरने कमेंट करत लिहिले आहे की, “काय जोडी आहे, एकच नंबर.” तर दुसरा म्हणतोय, “आदर्श जोडपे.”

सोनालीने लग्नाला एक महिना पूर्ण झाल्याच्या खास निमित्ताने, या अगोदर एक खास फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये ती पती कुणालसोबत दिसली होती. हा फोटो शेअर करून सोनालीने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “अधिकृतरित्या पती पत्नी होऊन १ महिना पूर्ण झाला.” या फोटोवर चाहत्यांनी शुभेच्छांचा पाऊस पाडल्याचे दिसून आले.

सोनालीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर सोनाली अखेरच्या वेळेस ‘युवा डान्सिंग क्वीन’ या टीव्ही शोमध्ये, नृत्यदिग्दर्शक मयूर वैद्यसोबत जज म्हणून दिसली होती. ती ‘झिम्मा’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे. त्याचबरोबर, ‘छत्रपती ताराराणी’ आणि ‘फ्रेश लाईम सोडा’ हे आगामी चित्रपटही तिच्या खात्यात आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.