Thursday, March 28, 2024

राज कुमारांचे असे किस्से, जे ऐकल्यानंतर म्हणाल, ‘काय दरारा होता’

सनकी, बिनधास्त, बेधडक असे शब्द वापरायचं म्हटलं, तर ते फक्त आणि फक्त बॉलिवूडमधले लिजंड अभिनेते राज कुमार (Raj Kumar) यांच्यासाठीच वापरले जातात. आपल्याला कितीही राग आला, तरीही आपण एखाद्याला वाईट वाटेल म्हणून त्याला बोलून दाखवत नाहीत. मात्र, राज कुमारांचा दराराच वेगळा होता. ते को-ऍक्टरला तर सोडाच, प्रोड्यूसर आणि डिरेक्टरवरही चांगलेच बरसायचे. ते आपल्या काळातील असे अभिनेते होते, जे आपल्या दमदार डायलॉग्ज, अभिनयाव्यतिरिक्त चेष्टा-मस्करीसाठी प्रसिद्ध होते. आज आपण त्यांच्या आयुष्यातील अशाच काही किस्स्यांबद्दल जाणून घेणार आहोत.

घाणेरड्या वासामुळे सोडला मूव्ही
‘जंजीर’ या मूव्हीने अमिताभ बच्चन यांना रातोरात स्टार बनवले होते. पण अमिताभ तेव्हा डिरेक्टर प्रकाश मेहरांची पहिली पसंत नव्हते. त्यांना या चित्रपटात घ्यायचं होतं ते, डायलॉग्जचे बादशाह राज कुमारांना. ते स्क्रिप्ट घेऊन त्यांच्याकडे पोहोचले. त्यांना आपल्या मनातील गोष्टही सांगितली. पण मंडळी राज कुमारांनी जे उत्तर दिले, त्यावरून त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले की, त्यांच्यासारखा कुणी असूच शकत नाही. राज कुमारांनी म्हटले की, “तुझ्यातून बिजनोरी म्हणजेच पाम तेलाचा वास येतोय. चित्रपट तर लय लांब राहिला. मी तुझ्यासोबत एक मिनिटही थांबणं सहन करू शकत नाही.” अशाप्रकारे अमिताभ यांच्या झोळीत हा चित्रपट पडला.

‘नावात काय ठेवलंय?’
आजकाल आपण आपल्या मित्राला त्याच्या आडनावावरून, वडिलांच्या नावावरून, किंवा इतर कोणत्यातरी नावावरून बोलवत असतो. पण मंडळी राज कुमार म्हणजे कहरच होते. ते आपल्या सहकलाकाराला त्याच्या नावावरून बोलवतच नव्हते. जसे की, धर्मेंद्र यांना जितेंद्र आणि जितेंद्र यांना धर्मेंद्र नावाने बोलवायचे. यावर एकाने त्यांना विचारले की, राजकुमार असं का करतात?  तर असे म्हटले जाते की, त्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं की, “काय फरक पडतो… धर्मेंद्र, राजेंद्र, जितेंद्र किंवा बंदर… हे सर्व राज कुमारसाठी एकसारखेच आहेत.”

‘जानी नाकातोंडाने तर माशाअल्लाह दिसतेस’
राज कुमारांच्या या किस्स्यांमध्ये फक्त ऍक्टर्सचाच नाही, तर ऍक्ट्रेसचाही समावेश आहे. असाच एक किस्सा झीनत अमान यांच्यासोबत झालेला. त्या टॉप ऍक्ट्रेसेसच्या कॅटेगरीत होत्या. एका फंक्शनमध्ये राज कुमार त्यांना भेटले होते. असे म्हणतात की, राज कुमारांनी त्यांच्याकडे पाहून म्हटले होते की, “जानी नाकातोंडाने तर माशाअल्लाह दिसतेस. चित्रपटात काम का नाही करत?” यावर झीनत यांनी दिलेलं उत्तर आजपर्यंत समजलंच नाही.

‘फक्त मंगळसूत्राची कमी आहे’
बप्पी लहरींना ओळखत नाही, असा व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. सोन्याच्या दागिन्यांनी मढलेला व्यक्ती कोण, असे विचारताच बप्पी दांची प्रतिमा डोळ्यापुढं आल्याशिवाय राहत नाही. त्यांनीदेखील राज कुमारांचा सामना केलाय. एका पार्टीत राज कुमार आणि बप्पी दांची भेट झालेली. त्यावेळी बप्पी दांना पाहून राज कुमार म्हणाले, “व्वा एकापेक्षा एक दागिणे. फक्त मंगळसूत्राची कमी आहे.” आता एवढ्या मोठ्या पार्टीत बप्पी दांना कसं वाटलं असेल, याची कल्पनाच केलेली बरी.

‘गोविंदाच्या शर्टचा बनवला रुमाल’
राज कुमार आणि गोविंदा ‘जंगबाज’ मूव्हीच्या सेटवर होते. गोविंदा जो शर्ट घालून आला होता, तो पाहून राज कुमारांनी त्याचे तोंडभरून कौतुक केलं. हे ऐकून गोविंदाही भलताच खुश झाला. तो म्हणाला, सर, शर्ट तुम्हाला एवढा आवडला आहेच, तर मग तुमच्यापाशी ठेवून घ्या. त्यांनी तो शर्ट त्यांच्याकडे ठेवून घेतला. त्यानंतर दोन दिवसांनी गोविंदानं पाहिलं की, राज कुमारांनी त्याच्या शर्टचा रुमाल बनवून आपल्या खिशात ठेवलाय. हाच तर राज कुमार यांचा अंदाज होता. त्यांना तो शर्ट रुमालासाठीच आवडला होता.

‘हा रोल तर माझ्या कुत्र्यालाही करायचा नाही’
१९६८ मध्ये ‘आँखे’ नावाचा एक मूव्ही आला होता. याचे डिरेक्टर होते रामानंद सागर. तर हिरो होते ‘ही मॅन’ धर्मेंद्र. या मूव्हीत रामानंद यांना राज कुमारांना घ्यायचं होतं. ते त्यांच्या घरी गेले, त्यांनी राज कुमारांना मूव्हीची स्टोरी सांगितली. यानंतर राज कुमारांनी त्यांच्या कुत्र्याला बोलावलं. त्यांनी त्याला या मूव्हीत काम करणार का असं विचारलं. असं म्हटलं जातं की, जेव्हा कुत्र्याचे काही रिऍक्शन आले नाही, तेव्हा ते रामानंद यांना म्हणाले की, “पाहिलं… हा रोल तर माझ्या कुत्र्यालाही करायचा नाही, माझं तर लांबच राहिलं.” यानंतर रामानंदही हैराण होऊन तिथून निघून गेले.

हा पाहा व्हिडिओ: राज कुमारांचे असे किस्से, जे पाहिल्यानंतर म्हणाल, ‘काय दरारा होता’

हे देखील वाचा