Friday, March 29, 2024

‘ट्रॅजेडी किंग’ दिलीप कुमार यांची तब्येत बिघडली; श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल

चित्रपटसृष्टीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. बॉलिवूडचे ‘ट्रॅजेडी किंग’ दिलीप कुमार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ९८ वर्षीय दिलीप साहेबांना श्वास घेण्यात त्रास होत होता. त्यानंतर त्यांना रविवारी (६ जून) तातडीने मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात नेण्यात आले. सध्या दिलीप कुमार हे दोन डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. याआधीही श्वास घेण्यात अडचण आल्यामुळे, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

सायरा बानो यांनी या वृत्ताची पुष्टी केली आणि म्हणाल्या, “ते ठीक नव्हते, त्यांना श्वासोच्छवासाची समस्या होत होती. त्यामुळे त्यांना आज खारमधील एका नॉन- कोव्हिड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. असे अचानक का घडले, हे जाणून घेण्यासाठी रक्त तपासणी व इतर तपासण्या केल्या जाणार आहेत.” तसेच डॉक्टर त्यांच्या प्रत्येक हालचालीवर बारीक नजर ठेवून आहेत.

दिलीप साहेबांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून देखील ट्विट करण्यात आले आहे. या ट्वीटमध्ये लिहिले आहे, “दिलीप साहेबांना तपासणीसाठी नॉन कोव्हिड हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना श्वास घेण्यात त्रास होत आहे. डॉ. नितीन गोखले यांच्या हाताखालील आरोग्य सेवेचे एक पथक तिथे उपस्थित आहे. कृपया साहेबांसाठी प्रार्थना करा आणि सुरक्षित रहा.”

https://twitter.com/TheDilipKumar/status/1401417347592691715?s=20

कोरोनाची भयंकर परिस्थिती पाहता, दिलीप कुमार गेल्या बऱ्याच दिवसांपासून कोणालाही भेटले नव्हते. सायरा बानो यांनी सांगितले होते की, त्यांची रोग प्रतिकारशक्ती कमकुवत असल्याकारणाने ते बाहेरील लोकांशी संपर्क साधण्याचे टाळत होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा