Friday, April 19, 2024

निळू फुले ते राजशेखर, ‘या’ कलाकारांनी आपल्या खलनायकी भूमिकेने गाजवली मराठी सिनेसृष्टी

चित्रपट म्हटलं की नायक आला आणि नायकाला भिडायला खलनायकंही आलाच. चित्रपटात खलनायक नसेल तर तो चित्रपट सहसा प्रेक्षकांना आवडत नाही. हिरोला त्रास देणारा, हिरोईनचा रस्ता अडवणारा, कधीकधी त्या दोघांच्या लव्हस्टोरीला सुरुंग लावणारा खलनायक म्हणजे चित्रपटाचा आत्माच असतो. त्यामुळे खलनायकी भूमिका साकारणे म्हणजे एक शिवधनुष्य पेलण्यासारखंच असते. थोडक्यात चित्रपटात खलनायक जितका बेरकी, क्रूर तितकाच चित्रपट भन्नाट ठरतो.

मराठी सिने जगतात सुद्धा अनेक अभिनेते होऊन गेलेत, ज्यांच्या खलनायकी भूमिका चित्रपटातील नायकाच्या भूमिकेपेक्षाही जास्त भाव खावून जायच्या. या खलनायकांनी रुपेरी पडद्यावर या भूमिका इतक्या प्रभावीपणे साकारल्या की त्यांच्या पात्राला अक्षरशः लोक शिव्या घालायचे, शाप द्यायचे अन् त्यांच्या नावाने कडाकडा बोटं मोडायचे, पण प्रेक्षकांच्या या रिएक्शन म्हणजे त्यांच्या जिवंत अभिनयाची पोचपावतीचं होती. मराठी सिनेसृष्टीलाही अशा खलनायकी कलाकारांचा समृद्ध वारसा लाभला आहे. कोण कोण आहेत हे गाजलेले मराठी खलनायक आणि काय होत्या त्यांच्या भूमिका, याबद्दल आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

राजशेखर
खलनायकी भूमिका साकारुन प्रसिद्धी मिळवणाऱ्या कलाकारांमध्ये राजशेखर यांचे नाव प्रथम घेतले जाते. ६० आणि ७० च्या दशकात त्यांच्या रंगेल कावेबाज आणि क्रूर भूमिकांनी प्रेक्षकांना चांगलेच हादरवून सोडले होते. त्यांच्या खलनायकी भूमिकेत ते इतके दंग व्हायचे की प्रेक्षकांना त्यांचा मूळ स्वभावा, असाच रंगेल आहे की काय असे वाटू लागायचे. मोहित्यांची मंजुळा, पाठलाग, साधी माणंस, दरोडेखोर असे अनेक चित्रपट त्यांच्या खलनायकी भूमिकांमुळे चांगलेच गाजले. या चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या जिवंत अभिनयाची अशी काही छाप पाडली की पाहणारा थक्कच व्हायचा.

निळू फुले
मराठी सिनेजगतातील खलनायकांच्या मांदियाळीत निळू फुले हे नाव घेतले नाही तर ही यादी अपूर्णच राहील. अस्सल मराठी ग्रामीण बाज, करारी नजर, भेदक डोळे आणि त्या जोडीला खलनायकाला साजेसे अस्सल संवादफेक कौशल्य. निळू फुले यांच्या भूमिका इतक्या क्रुर आणि भयंकर वाटायच्या की ग्रामीण भागातील आयाबाया त्यांना शिव्यांची लाखोली वाहायच्या. सिंहासन, सामना, पिंजरा, एक गाव बारा भानगडी, चटक चांदणी अशा चित्रपटांमधून निळू फुलेंनी खलनायक म्हणून ओळख मिळवली. त्यांच्या या भूमिकेतील अस्सलखित अभिनयासाठी हे चित्रपट आजही ओळखले जातात.

सदाशिव अमरापूरकर
यानंतर खलनायकांच्या या यादीमध्ये सदाशिव अमरापूरकर यांचेही नाव घ्यावेच लागेल. त्यांच्या कौटुंबिक सुखामध्ये कपट कारस्थानाच्या भूमिका घराघरात गाजल्या. १९८० ते ९०च्या दशकात त्यांच्या भूमिकांनी क्रूर खलनायक अत्यंत प्रभावीपणे साकारपणे साकारले. सदाशिव अमरापुरकर यांनी फक्त मराठी सिनेमांमध्येच नव्हेतर बॉलिवूडमध्येही या खलनायकी भूमिकांमध्ये छाप पाडली. सडक या हिंदी चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ठ खलनायकाचा पुरस्कारही मिळाला होता. हीच त्यांच्या जिवंत अभिनयाची पोहोचपावती होती. सदाशिव अमरापूरकर यांनी अर्धसत्य, दोघी, कदाचित, आखरी रास्ता, हुकूमत तेरी मेहरबानिया या चित्रपटात काम केले.

सयाजी शिंदे
अगदी अलीकडच्या काळात सयाजी शिंदे यांनी मराठी सिने जगतातील खलनायक म्हणून चांगलीच लोकप्रियता मिळवली. आपला भारदस्त आवाज आणि रांगड्या भाषेत त्यांनी अभिनेत्रींना छळलेल्या भूमिका चांगल्याच गाजल्या. बापू बिरु वाटेगावकर चित्रपटांतील त्यांच्या रंगा शिंदेच्या भूमिकेने त्यांची क्रूर खलनायक अशीच ओळख मिळवून दिली. त्याचप्रमाणे त्यांची गोष्ट छोटी डोंगराएवढी, भिकारी या चित्रपटातील भूमिका चांगल्याच गाजल्या. अनेक सामाजिक कार्यात भाग घेणारे सयाजी शिंदे अशा क्रुर खलनायकी भूमिका इतक्या प्रखरपणे साकारतात, हेच त्यांच्या अभिनयाचे यशंच म्हणावं लागेल.

नागेश भोसले
प्रेक्षकांनो ९० च्या दशकात खलनायक म्हणून गाजलेलं आणखी एक नाव म्हणजे नागेश भोसले. त्यांचे करारी डोळे, रागीट चेहरा हे त्यांच्या खलनायकी भूमिकांचे प्लस पॉइंट, पण पडद्यावर खलनायक साकारताना ते अधिकच क्रूर वाटतात. ९०च्या दशकात आलेल्या चिमणी पाखरं चित्रपटातील त्यांची खलनायकी भूमिका प्रचंड गाजली. त्यांच्या या भूमिकेने त्यांना खलनायक म्हणून वेगळी ओळख मिळवून दिली. नागेश भोसले यांनी चिमणी पाखरू प्रमाणेच शासन, योद्धा या चित्रपटांतील रांगड्या खलनायकी भूमिकांनी सिनेजगतावर सत्ता गाजवली. फक्त सिनेमातचं नव्हे तर अनेक मालिकांमध्येही त्यांनी खलनायकी भूमिका साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

मंडळी, या अभिनेत्यांनी जरी खलनायकी भूमिका साकारल्या असल्या, तरी त्यांच्या जिवंत अभिनयाने ते प्रेक्षकांसाठी नेहमीच सन्माननीय ठरलेत. शेवटी प्रत्येक चित्रपटाचे यश हे त्यामधील नायक आणि नायकावर जरी अवलंबून असले तरी खलनायकाविना चित्रपट म्हणजे मिठाशिवाय जेवण, नाही का?

हेही पाहा- नायकावर भारी पडलेले मराठीतले खलनायक

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा