Thursday, April 18, 2024

‘बाबा चमत्कार’ काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांचं निधन; सिनेसृष्टीवर शोककळा

साधारण वीस वर्षांपूर्वी आलेल्या ‘झपाटलेला’ चित्रपटाने सर्व प्रेक्षकांना आनंदाने झपाटलेच होते. जेव्हा जेव्हा या चित्रपटाचा उल्लेख निघतो, तेव्हा तेव्हा तात्या विंचू तर आठवतच. मात्र, अजून एक कलाकार आठवतो तो म्हणजे तात्या विंचूला ‘ओम फट् स्वाहा’ हा मृत्युंजय मंत्र देणारा बाबा चमत्कार. आज त्याच अभिनेत्याचे निधन झाल्याने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

बाबा चमत्कार ही दरारा निर्माण करणारी अजरानर भुमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांचे आज (४ फेब्रुवारी २०२१) पुण्यात दुःखद निधन झाले आहे. राघवेंद्र कडकोळ यांनी ‘झपाटलेला’ आणि ‘झपाटलेला २’ या चित्रपटांमध्ये छोटी तरीही कायम लक्षात राहणारी भूमिका निभावली.

baba Chamatkar Zapatlela

राघवेंद्र कडकोळ यांनी या सिनेमा सोबतच अनेक नाटकं आणि मालिकांमध्ये देखील काम केले होते. त्यांनी कृष्णधवल चित्रपटापासून त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. शाळेत असताना त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे प्रचंड लिखाण वाचले. त्या लिखाणाने प्रेरित होऊन त्यांनी नौदलात जाऊन देशसेवा करण्याचे ठरवले होते.

नौदलात भरतीच्या सर्व परीक्षा पास करून ते नौदलात भरती झाले. ते पहिल्यांदाच भारतीय आयएनएस विभागात एका टीम सोबत गेले. तिथले संपूर्ण वातावरण पाहून ते भारावून गेले. मात्र त्यांच्या काही कारणाने पुन्हा मेडिकल टेस्ट झाल्या, आणि दुर्दैवाने त्यांच्या कानात थोडा दोष असल्याचे समोर आले, आणि ते पुन्हा घरी आले.

पुढे त्यांनी जंगल खात्यात टायपिस्ट म्हणून सरकारी नोकरी सुरु केली ते करत असतानाच त्यांनी रंगभूमीवर पडद्यामागे अनेक छोटी छोटी कामे केली. यातूनच त्यांना त्यांचे पहिले नाटक ‘करायला गेलो एक’ मिळाले. महिन्यातून २०-२२ दिवस नाटकांचे दौरे असल्याने त्यांच्या नोकरीवर परिणाम होऊ लागला. म्हणूनच त्यांना त्यांची नोकरी सोडावी लागली

त्यांनी ‘अश्रूंची झाली फुले’ ह्या नाटकातील “धर्माप्पा” जबरदस्त गाजवली. मूळचे कानडी असलेले राघवेंद्र अस्खलित मराठी बोलायचे, त्यामुळे प्रेक्षकांना त्यांचे विशेष कौतुक वाटायचे. त्यांनी धोंडी, देवदासी, हसुया पण कायद्याच्या कचाट्यात, रायगडाला जेव्हा जाग येते आदी चित्रपट नाटकांमध्ये काम केले.

राघवेंद्र कडकोळ यांनी काशीनाथ घाणेकर, शरद तळवळकर यासारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम केले. त्यांना ‘बालगंधर्व जीवन पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. सोबतच त्यांना ‘नटवर्य केशवराव दाते पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले होते. त्यांनी गोल्ड मेडल नावाचे पुस्तक लिहिले आहे.

राघवेंद्र यांचे शेवटचे दिवस अत्यंत हलाखीचे गेले. त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने, त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने पुण्याच्या बावधन येथील पालाश एल्डरली केअर अँड रिकव्हरी सेंटरमध्ये राहायला सुरुवात केली होती.

हे देखील वाचा