Friday, March 29, 2024

अबब! २०२० मध्ये देखील अक्षय कुमारने केली इतक्या कोटींची कमाई! फोर्ब्जच्या यादीत नावाचा सिलसिला कायम

बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षय हा एक वर्षात सर्वाधिक सिनेमे करण्यासाठी प्रसिद्ध आहे. या सिनेमांमध्ये बहुतांशी सिनेमे तो समाज सुधारणेवर आधारित करतो. कुणाचाही हात डोक्यावर नसताना बॉलिवूड मध्ये येणं आणि तिन्ही खान मंडळींच्या खांद्याला खांदा लावून काम करणं ही काही सोपी बाब नाहीये आणि नेमकं हेच अक्षय कुमार ने करून दाखवलं आहे.

गेली तीस ते पस्तीस वर्षांची त्याची कारकीर्द आहे. या इतक्या वर्षांमध्ये त्याने शेकडो सिनेमे केले. इतक्या सिनेमांमध्ये त्याने आतापर्यंत नायक, खलनायक, सहायक अभिनेता, विनोदी अभिनेता अशा अनेक प्रकारच्या भूमिका साकारून आपलं अष्टपैलुत्व त्याने सिद्ध केलं आहे. अशा या अक्षय ने या वर्षी आणखीन एक विक्रम स्वतःच्या नावावर केला आहे. यावर्षी २०२० मध्ये जगभरातील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत अक्षय ५२ व्या स्थानावर पोहोचला आहे सोबतच भारतात सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता देखील अक्षय कुमार ठरला आहे.

जगप्रसिद्ध मासिक फोर्ब्सने यंदा देखील सर्वाधिक कमाई करणार्‍या सेलिब्रिटींची यादीही जाहीर केली आहे. या यादीत अक्षय कुमार ५२ व्या स्थानावर आहे. अक्षय कुमारने यावर्षी सुमारे ४८.५ मिलियन अमेरिकन डॉलर्स म्हणजेच ३५६ कोटी रुपये कमावले आहेत. तर या यादीत पहिल्या क्रमांकावर अमेरिकन स्टार काइली जेनर आहे. आपण म्हणाल हे कसं शक्य आहे या वर्षी तर अधिक तर काळ सगळं बंद होतं. अक्षयचा जेमतेम एकच सिनेमा या वर्षी प्रदर्शित झाला आहे लक्ष्मी तो देखील ओटीटी प्लॅटफॉर्मवर मग त्याने एक सेलिब्रिटी म्हणून इतके पैसे कसे कमावले?

हा खिलाडी कुमार आता फक्त काही अभिनेता राहिलेला नाही त्याची स्वतःचं एक ग्रेझिंग गॉट पिक्चर्स नावाचं प्रॉडक्शन हाऊस आहे. गेल्या काही वर्षांपासून तो स्वतः सिनेमे बनवतो. सिनेमांच्या निर्मितीसाठी पैसे लावतो. खिलाडी कुमारचा सिनेमा आणि तो चालला नाही असं कधी झालंय का? त्यामुळे एका सिनेमातून तो फक्त अभिनेता म्हणूनच नाही तर निर्माता म्हणून देखील पैसे कमावतो. लक्ष्मी हा चित्रपट तर पूर्णतः त्याच्याच प्रॉडक्शन हाऊसमध्ये बनला होता. ओटीटी प्लॅटफॉर्म वर हा सिनेमा शंभर कोटींच्या वर विकला गेला. जर हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला असता तर विचार करा या सिनेमाने किती पैसे कमावले असते. २०२० च्या या लॉकडाऊनचा अक्षयच्या व्यवसायावर जास्त नाही पण परिणाम तर झालाच. परंतु त्याला याचा तिळमात्र देखील फरक पडला नाही.

यावर्षी अक्षयचा सूर्यवंशी हा सिनेमा देखील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार होता. परंतु लॉकडाऊनमुळे हा सिनेमा आता पुढच्या वर्षी जानेवारी मध्ये प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमारचे अनेक सिनेमे हे रांगेत प्रदर्शित होण्यासाठी वाट पाहत आहेत. यात बच्चन पांडे, अतरंगी रे, बेल बॉटम, पृथ्वीराज, हाऊसफुल ५ या सिनेमांचा समावेश आहे. याशिवाय यावर्षी दिवाळीमध्ये अक्षय कुमार ने रामसेतू या आणखी एका सिनेमाची घोषणा केली आहे. आता हे त्याचे इतके सारे चित्रपट केव्हा प्रदर्शित होणार याची वाट पाहण्यापलिकडे आपल्या हातात काही नाही.

हे देखील वाचा