छोट्या पडद्यावरील ‘लागिरं झालं जी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री कल्याणी नंदकिशोरने नवरात्रीच्या निमित्ताने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने आपल्या आयुष्यात आलेल्या एका कठीण प्रसंगाबद्दल भाष्य केले आहे. कल्याणी सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे चाहते तिच्या पोस्टवर लाईक आणि कमेंट करत असतात.
कल्याणीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “मी कल्याणी नंदकिशोर म्हणजेच झी मराठी वरील “लागिरं झालं जी” मधली आज्या ची मामी, “मन झालं बाजिंदं”. मधली गुली मावशी, कलर्स मराठी वरील “राजा राणी ची गं जोडी” मधली पंजाबराव ची बायको कल्याणीबाई, सन मराठी वरील “शाब्बास सूनबाई” मधली ईश्वरी.
27 नोव्हेंबर 2014 ला खुशी चा जन्म झाला आणि साधारण 15 दिवसातच तिच्या हृदयाला छिद्र असल्याचं आम्हाला समजलं. अनेक तज्ञ डॉक्टरांनी सांगितल्या प्रमाणे तिच्या अनेक तपासण्या झाल्यानंतर आणखी एक निदान समोर आलं. तिच्या हृदयापासून फुप्फुसापर्यंत अशुद्ध रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्या बंद आहेत हे त्या तपासण्या मधुन समजलं.
अनेकदा डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा प्रयत्न केले पण तिच्या शरीराची अंतर्गत रचना या प्रकारे आहे की तिला भूल देणं सुद्धा शक्य होत नव्हतं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार खुशी जास्तीत जास्त सहा महिने जगू शकणार होती. पण मला विश्वास होता की स्वामी आई माझ्या पोटी जन्माला आलेली आहे आणि तीच या संकटातून मला आणि माझ्या लेकीला बाहेर काढेल.
आज खुशी 10 वर्षांची झाली आहे. या 10 वर्षांत अनेकदा तिच्यावर संकटं आली. पण माझा विश्वास आणि आम्ही सगळे मिळून तिची घेत असलेली काळजी याच्या जोरावर ती प्रत्येक संकटातून बाहेर पडलेली आहे आणि पुढे सुद्धा ती हा लढा सुरुच ठेवेल अशी मला खात्री आहे.
आजचा रंग निळा. निळा रंग म्हणजे पाण्याचं आणि आकाशाचं प्रतीक. निळा रंग व्यापकता दाखवतो. तीच व्यापकता खेळाडू वृत्तीने घेत मी आणि खुशी अगदी खुशीत हसत खेळत आयुष्य भरभरुन जगत आहोत.”
View this post on Instagram
कल्याणी नंदकिशोर ही मराठीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने ‘लागिरं झालं जी’, ‘मन झालं बाजिंद’, ‘राजा राणीची गं जोडी’, ‘शाब्बास सूनबाई’ यासारख्या अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे. लवकरच ती ‘खुर्ची’ या चित्रपटातही दिसणार आहे. (kalyani nandakishor sonone post on the occasion of Navratri has become viral)
आधिक वाचा-
–सनी देओलच्या दुश्मनांच्या यादीत आमिर, शाहरुखसह 5 अभिनेते सामील; ‘या’ अभिनेत्याचा तर दाबला होता गळा
–तब्बल 20 वर्षांपूर्वी ‘गदर’मध्ये हॅन्डपंप उखाडून सनी देओलने घातला होता राडा; दिग्दर्शकाने सांगितले कसा लिहिला होता सीन