Wednesday, February 11, 2026
Home मराठी चित्रपटेतर संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचा सन्मान

चित्रपटेतर संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचा सन्मान

प्रसिद्ध गायक संगीतकार अवधूत गुप्ते, वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर, कवी सौमित्र, मिलिंद इंगळे, संदीप-सलील यांचाही होणार सन्मान ​मराठी संगीताचा समृद्ध वारसा साजरा करण्याच्या उद्देशाने प्रसिद्ध संगीतकार अजय नाईक यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र कलामंच व जस्ट कोलॅब यांच्या वतीने मराठी इंडी म्युझिक अवॉर्ड्स सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पुरस्कार सोहळ्यात चित्रपटेतर (नॉन फिल्म) संगीत क्षेत्रात गेली काही दशके उल्लेखनीय कामगिरी करणारे ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचा ‘संगीतरत्न’ या जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात येईल. याबरोबरच प्रसिद्ध गायक-संगीतकार अवधूत गुप्ते, वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर यांना मराठी इंडी म्युझिक आयकॉन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती आयोजक अजय नाईक यांनी कळविली आहे. मराठी इंडी म्युझिक अवॉर्डस् (मिमा) सोहळा हा रविवार दि. ९ मार्च रोजी सायं ४.३० वाजल्यापासून एरंडवणे येथील गणेशनगर भागातील शकुंतला शेट्टी सभागृहात संपन्न होणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर त्यासाठी प्रवेश देण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.

पुरस्कार सोहळ्याच्या संकल्पनेबद्दल अधिक माहिती देताना अजय नाईक म्हणाले, “महाराष्ट्राला कित्येक शतकांची थोर संगीत परंपरा आहे. यामध्ये चित्रपटेतर (नॉन फिल्म) संगीत आणि स्वतंत्र (इंडी) कलाकारांनी सादर केलेली गाणी हे महत्त्वाचा भाग आहेत. गेल्या काही दशकात या संगीताला अपेक्षित असे प्रोत्साहन आणि मुख्य पुरस्कार सोहळ्यांमध्ये स्थान मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर संगीत परंपरेतील या नवनवीन प्रयोगांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने आम्ही मराठी इंडी म्युझिक अवॉर्डस् अर्थात मिमा या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्याचे ठरविले. सदर वर्ष हे या सोहळ्याचे — वर्ष असून यावर्षी चित्रपटेतर संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचा ‘संगीतरत्न’ या जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात येईल. राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री असलेले आशिष शेलार आणि भाजपचे आमदार प्रसाद लाड हे कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील.”

याबरोबरच प्रसिद्ध गायक संगीतकार अवधूत गुप्ते, वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर यांना ‘मराठी इंडी म्युझिक आयकॉन’ विभागातील पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. याशिवाय पहिले आयकॉनिक मराठी इंडी सॉंग म्हणून ‘गारवा’ या गाण्यासाठी कवी सौमित्र आणि संगीतकार मिलिंद इंगळे यांचा तर पहिला आयकॉनिक इंडी मराठी शो म्हणून ‘आयुष्यावर बोलू काही’ या कार्यक्रमासाठी संगीतकार-गायक जोडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संदीप खरे व सलील कुलकर्णी यांना सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी नाईक यांनी कळविली आहे. या पुरस्कार सोहळ्यात सांगली जिल्ह्यातील विटा येथील गायक असलेल्या अर्जुन वाघमोडे यांना दिव्यांग विभागातील पुरस्काराने गौरविले जाईल असेही नाईक यांनी सांगितले.

महाराष्ट्रात जशा मराठी भाषेच्या अनेक उपजाती आहेत, तसंच संगीताच्या बाबतीतही प्रचंड विविधता आहे हे लक्षात घेत खानदेशी, अहिराणी, आगरी, कोळी, कोकणी, मालवणी या सर्व भाषांतील गाण्यांसोबतच मराठी मधील ‘पॉप’ संगीत भावगीते, भक्तिगीते, लोकगीते, शास्त्रीय, उपशास्त्रीय अशा अनेक शैलींमध्ये गाण्यांना देखील विविध विभागांमध्ये मराठी इंडी म्युझिक अवॉर्डस् (मिमा) सोहळ्यामध्ये गौरविण्यात येईल.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

चालताना कंगना शर्माचा गेला तोल; कॅमेऱ्यात घटना झाली कैद
MIMA पुरस्कार सोहळ्यात या गायकांना मिळाले नामांकन; वाचा संपूर्ण यादी

हे देखील वाचा