वयाच्या 66व्या वर्षीही दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या अभिनेत्री नीना गुप्ता आज बॉलिवूडमधील एक सशक्त नाव आहेत. आज सिनेमागृहात प्रदर्शित होत असलेल्या त्यांच्या नव्या चित्रपट ‘वध 2’ मधील भूमिकेमुळे त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. मात्र, आजच्या यशामागे त्यांच्या आयुष्यातील अतिशय वेदनादायी आणि संघर्षमय काळ दडलेला आहे.
लग्न न करता आई बनल्यानंतर नीना गुप्तांच्या (Neena Gupta)आयुष्यात वादळ आलं होतं. मुलगी मसाबाच्या जन्मानंतर त्यांना अनेक सामाजिक अडचणींना सामोरं जावं लागलं. अलीकडेच एका मुलाखतीत नीना यांनी 80च्या दशकातील तो काळ उघड केला, जेव्हा त्यांचं आयुष्य अक्षरशः नरकासारखं झालं होतं.
नीना यांनी मुंबईतील स्वतःचं अपार्टमेंट विकून तीन बीएचके फ्लॅट खरेदी केला होता. काही काळ त्या आपल्या काका-काकूंकडे राहायला गेल्या होत्या. मसाबा लहान असल्याने काकू तिची काळजी घ्यायच्या. मात्र, एका रात्री अचानक काकूंनी नीना यांना मध्यरात्री घराबाहेर काढलं. त्या क्षणी नीना यांच्याकडे ना पैसे होते, ना डोक्यावर छप्पर. लहान बाळासह रात्र काढण्यासाठी त्यांच्याकडे कोणताही पर्याय नव्हता.
यानंतर नीना यांच्या काकांना त्यांची दया आली आणि त्यांनी जुहूतील गेली 20 वर्षे बंद असलेलं एक अपार्टमेंट राहण्यासाठी दिलं. जाळ्यांनी भरलेलं, जीर्ण झालेलं घर नीना यांनी आपल्या लहान मुलीसोबत मध्यरात्री स्वच्छ केलं. मात्र, काही काळातच ते घरही सोडण्यास सांगण्यात आलं.
अखेर पूर्णपणे बेघर झाल्यावर नीना बिल्डरकडे गेल्या, आपली परिस्थिती सांगितली आणि पैसे परत मागितले. बिल्डरने माणुसकी दाखवत एकही पैसा न कापता संपूर्ण रक्कम परत केली. इतक्या अडचणी असूनही नीना यांनी कधीही हार मानली नाही. आज त्या कोणत्याही ओळखीच्या मोहताज नाहीत आणि ‘वध 2’सारख्या चित्रपटातून पुन्हा एकदा आपली अभिनयाची ताकद सिद्ध करत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
द केरळ स्टोरी 2: सुरांच्या ओघात विरहाची वेदना आणि प्रेमाची गोडी अनुभवायला लावणारं हे गाणं










