[rank_math_breadcrumb]

२५ एप्रिलला होणार ‘पुढच्या शुक्रवारी ७ वाजता’चा शुभारंभ प्रयोग, सतीश राजवाडे – चैत्राली गुप्ते यांचे रंगभूमीवर दमदार पुनरागमन

मराठी रंगभूमीवर एक वेगळा, भावनिक आणि मनाच्या आत खोलवर स्पर्श करणारा अनुभव घेऊन येणारे ‘पुढच्या शुक्रवारी ७ वाजता’ हे नवे नाटक येत्या २५ एप्रिल रोजी आपल्या पहिल्या प्रयोगासह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. जीवनातील नात्यांची गुंतागुंत, चढ-उतार आणि आशेचा नाजूक धागा यांची सांगड घालत हे नाटक प्रेक्षकांच्या आयुष्याशी जोडणारं एक भावविश्व निर्माण करणार आहे.

आजच्या धकाधकीच्या आयुष्यात माणूस अनेकदा हरतो, खचतो, तुटतो… परंतु त्या सगळ्या अवस्थांमधून पुन्हा उभं राहाण्याची ताकद कुठून येते? नात्यांमध्ये अपेक्षा असाव्यात का, की निःस्वार्थ प्रेमच खरं असतं? हरवलेली मैत्री पुन्हा नव्याने सुरू होऊ शकते का? अशा अनेक प्रश्नांना भिडत हे नाटक प्रेक्षकांसमोर एक प्रामाणिक आणि वास्तववादी कथा मांडणार आहे. त्यामुळे हे नाटक मनोरंजनासोबतच, प्रत्येकाला स्वतःच्या आयुष्याचा आरसा दाखवणारा अनुभव ठरणार आहे.

या नाटकाची आणखी एक मोठी जमेची बाजू म्हणजे सतीश राजवाडे आणि चैत्राली गुप्ते यांचे रंगभूमीवर होणारे पुनरागमन. दीर्घ काळानंतर हे दोघे पुन्हा रंगमंचावर एकत्र दिसणार असल्याने नाट्यरसिकांमध्ये विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यांच्यासोबतच या नाटकाचे लेखक सुदीप मोडक हे एका विशेष भूमिकेत दिसणार असून त्यांनी लेखक आणि अभिनेता अशी दुहेरी जबाबदारी पेलली आहे. जाहिराती, हिंदी चित्रपट आणि वेब सिरीजमधून आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या सुदीप मोडक यांची ही रंगभूमीवरील उपस्थिती नाटकाला आणखी बळकटी देणारी ठरणार आहे.

चौरंगी एंटरटेन्मेंट निर्मित या नाटकाचे दिग्दर्शन नीरज शिरवईकर यांनी केले आहे. ‘आमने सामने’, ‘दोन वाजून बावीस मिनिटांनी’ आणि ‘अ परफेक्ट मर्डर’ यांसारख्या नाटकांमुळे ओळख निर्माण केलेल्या नीरज शिरवईकर यांनी या कथेला अत्यंत संवेदनशील आणि वास्तववादी स्पर्श दिला आहे. नाटकाच्या नेपथ्याची जबाबदारी संदेश बेंद्रे यांनी सांभाळली असून, संगीत राहुल रानडे यांचे आहे. प्रकाशयोजना शीतल तळपदे यांनी केली आहे, तर वेशभूषा शाल्मली टोळ्ये यांची आहे. नितीन नाईक हे या नाटकाचे सूत्रधार आहेत.

दिग्दर्शक नीरज (niraj)शिरवईकर म्हणतात, ” ‘पुढच्या शुक्रवारी ७ वाजता’ हे नाटक म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात शांतपणे चालणाऱ्या भावनिक प्रवासाची कहाणी आहे. कधी आपण खूप लोकांमध्ये असूनही एकटे असतो, तर कधी एखादी व्यक्ती आपल्या आयुष्याला नव्याने अर्थ देऊन जाते. हे नाटक त्या न बोलल्या जाणाऱ्या भावनांना आवाज देण्याचा प्रयत्न आहे. प्रेक्षकांनी नाट्यगृहातून बाहेर पडताना स्वतःकडे थोडं वेगळ्या नजरेने पाहावं, नात्यांना पुन्हा एकदा जपावं आणि आयुष्याला नव्या आशेने सुरुवात करावी, हीच आमची अपेक्षा आहे.”

भावना, नाती आणि आयुष्याला नव्याने उभं राहाण्याची प्रेरणा देणारा हा नाट्यप्रवास २५ एप्रिलला रंगभूमीवर खास ठरणार आहे. नाट्यरसिकांसाठी हे नाटक नक्कीच ‘मिस न करण्यासारखा’ अनुभव ठरणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

अक्षय कुमार अभिनीत ‘भूत बंगला’ चित्रपटाच्या एडवांस बुकिंगला झाली सुरूवात