मागील अनेक दिवसांपासून शिल्पा शेट्टी तिचा पती राज कुंद्राला अश्लील चित्रपट निर्मितीच्या आरोपाखाली अटक झाल्यापासून चांगलीच चर्चेत आली आहे. राज कुंद्राला अटक झाल्यानंतर शिल्पाला आणि राजला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले गेले. तिच्यावर आणि राजवर अनेक आरोप देखील करण्यात आले. राजला अटक झाल्यानंतर अपवाद वगळता शिल्पा सोशल मीडियापासून दूर होती. मात्र, आज स्वातंत्रदिनाच्या निमित्ताने शिल्पाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
शिल्पाने आज भारताच्या ७५ व्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सोशल मीडियावरून सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. शिल्पाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, “जगातील सर्व भारतीय नागरिकांना ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.” या शुभेच्छांसोबत तिने एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. शिल्पाच्या या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या असून, काहींनी तिला पुन्हा ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. काहींनी तिला “सुपर से उपर,” तर काहींनी “राज कुंद्रा घरी कधी येणार?” असा प्रश्न विचारला आहे. (shilpa shetty wishes independence day)
मागच्या महिन्यात ११ जुलैला राज कुंद्राला पॉर्न चित्रपटांच्या निर्मिती आणि वितरणाच्या आरोपांखाली अटक झाली होती. यानंतर सिनेविश्वात आणि उद्योगजगतात एकच खळबळ माजली. त्यानंतर चौकशी दरम्यान अनेक धक्कादायक खुलासे या प्रकरणामध्ये झाले. शिवाय अनेक लोकांनी पुढे येत राजने त्यांना असे चित्रपट बनवण्यासाठी भरीस पडून आणि पैशाचे लालच देऊन शूट करून घेतल्याचे सांगितले. या सर्व प्रकरणामध्ये शिल्पा शेट्टीवर देखील अनेक आरोप केले गेले. तिची देखील चौकशी झाली.
हे चालू असतानाच लखनऊमध्ये तिच्यावर आणि तिच्या आईवर करोडो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप देखील लावला गेला. त्यांच्या दोघींच्या विरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आली.
शिल्पाने मीडियावर बदनामी करत असल्याचा दावा देखील उच्च न्यायालयामध्ये ठोकला होता. मात्र, कोर्टाने हा दावा हाणून पाडला. शिल्पाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सर्वांना कोणत्याही खोटी किंवा चुकीच्या गोष्टींवर पडताळणी न करता कमेंट्स न करण्याचे आवाहन केले होते. सोबतच तिच्या आणि तिच्या मुलांच्या खासगी आयुष्याचा सन्मान करण्याचे देखील सांगितले होते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-









