मंडळी टीव्हीवर आपण अनेकदा सौंदर्य प्रसाधनं, आरोग्यविषयक औषधांच्या जाहिराती आणि इतर गोष्टींबद्दलच्या जाहिराती पाहतो. खरं तर बऱ्याचदा आपल्याला ती वस्तू खरेदी करण्यात रस नसतो. परंतु आपल्या आवडत्या नटाने त्या वस्तूची जाहिरात केलेली असते.
जाहिरातीत अभिनेत्याने ती वस्तू किती चांगली आहे, हे समजावून सांगितलेले असते. त्यानंतर ती गोष्ट खरेदी केली जाते. जाहिरातीत सांगितल्याप्रमाणे आपण ती वस्तू वापरतो, परंतु नंतर त्या जाहिरातीप्रमाणे वस्तूचे परिणाम, फायदे सहसा झालेले दिसत नाहीत.
परंतू, ही सामान्य बाब आहे. आपण त्या जाहिरातीतील कलाकाराविरुद्ध कधी ग्राहक मंचाकडे जाऊन तक्रार करतो का? तर असा विचारही तुम्ही कधी केला नसेल. सध्या जगण्याच्या स्पर्धेत टिकून राहण्याच्या नादात इतर कोणत्याही गोष्टींसाठी वेळच मिळत नाही. परंतू, एका ग्राहकाने मात्र हे पाऊल उचलले आहे. त्याने चक्क एका प्रसिद्ध दाक्षिणात्य कलाकाराविरोधात अशाच प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
केरळमधील ग्राहक कोर्टाने एका मल्याळम अभिनेत्याला हेअरक्रीम उत्पादनासाठी दिलेल्या जाहिरातीमध्ये खोटे दावे केल्याचा ठपका ठेवला आहे. वास्तविक या अभिनेत्याने या केसांच्या उत्पादनाचा परिणाम जाणून घेतल्याशिवाय त्याची जाहिरात केली होती. या अभिनेत्याचं नाव अनूप मेनन असं सांगितलं जात आहे. ज्याला या प्रकरणात दंड ठोठावण्यात आला आहे.

त्रिसुरमधील जिल्हा ग्राहक मंचाने धात्री हेअरक्रीम निर्माता आणि चित्रपट अभिनेता अनूप मेनन यांना दहा हजार रुपये दंड ठोठावला आहे. खरं तर, फ्रान्सिस वडक्कन नावाच्या व्यक्तीने २०१२ मध्ये ए-वन मेडिकल, धात्री आयुर्वेद प्रायव्हेट लिमिटेड आणि अनूप मेनन यांच्याविरूद्ध तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीत वडक्कन या ग्राहकाने सांगितले की, त्याने हे हेअरक्रीम जानेवारी २०१२ मध्ये प्रथमच ३७६ रुपये किंमतीला विकत घेतलं होतं. त्याने ही हेअर क्रीम एक जाहिरात पाहिल्यानंतर विकत घेतली. ज्यात अनूप मेनन वचन देतो की, जर हे उत्पादन ६ आठवड्यांसाठी वापरलं तर केस वाढू लागतील. परंतू, ही क्रीम वापरल्यानंतरही त्यांना काही फायदा झाला नाही. त्यानंतर त्यांनी फोरममध्ये तक्रार दाखल केली आणि ५ लाख रुपयांची भरपाई मागितली.
ग्राहक मांचाला दिलेल्या उत्तरात अनूप मेनन म्हणतो की त्याने हे उत्पादन कधीही वापरलेलं नाही. तो त्याच्या आईने तयार केलेलं तेलच वापरतो. तो म्हणाला की जाहिरातीत काय बोललं जातं याची त्याला कल्पना नाही, कारण ती निर्मात्याची ‘कथा’ होती. त्याला मात्र असं वाटलं की हे उत्पादन केसांच्या वाढीसाठी नाही तर केसांची निगा राखण्यासाठी आहे.










