Saturday, May 2, 2026
Home वेबसिरीज देवदूतच ठरला गुन्हेगार? सोनू सुदवर होतायत गंभीर आरोप, पाहा कोण करत आहे आरोप?

देवदूतच ठरला गुन्हेगार? सोनू सुदवर होतायत गंभीर आरोप, पाहा कोण करत आहे आरोप?

सोनू सूदवर जुहू येथील शक्तिसागर या निवासी इमारतीमध्ये अनधिकृतपणे बांधकाम करून तिथे हॉटेल तयार केल्याचा आरोप मुंबई महानगर पालिकेने केला. त्यासाठी बीएमसीने सोनूला नोटीस बजावली होती. सोनुने या बजावलेल्या नोटीसीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यालाच उत्तर देताना पालिकेने मुंबई उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात सोनूवर तो या प्रकरणात नक्कीच आरोपी असल्याचे सांगितले आहे.

बीएमसीने त्यांच्या प्रतिज्ञापात्रात म्हटले आहे की, सोनू हा एक सराईत गुन्हेगार असून त्याला बेकायदेशीर कामातून पैसा कमवायचा आहे. त्यामुळेच त्याने अतिक्रमण विभागाने तोडलेल्या भागाला पुन्हा विनापरवानगी बांधून त्याचा वापर हॉटेलसाठी केला. सोनुने आवश्यक परवान्याविना आणि परवानगीविना हॉटेल सुरू केल्याचे स्पष्ट असतानाही न्यायालयातील याचिकेच्या माध्यमातून आणि न्यायालयीन प्रक्रियेचा दुरुपयोग करत हे बेकायदा हॉटेल अधिकृत करण्याचा त्याचा प्रयत्न आहे, असा आरोप मुंबई महापालिकेने मुंबई उच्च न्यायालयात आपल्या प्रतिज्ञापत्रात केला आहे.

सोनूने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची नुकतीच भेट घेतली. शरद पवार आणि सोनू सूद यांच्या भेटीबद्दल सविस्तर माहिती समोर आलेली नसली तरी प्राप्त माहितीनुसार या भेटीत सोनूने त्याच्या सध्याच्या सुरु असलेल्या केसबद्दल पवारांना माहिती दिली असून, आपण कोणतेही अनधिकृत आणि बेकायदेशीर काम केले नसल्याचे सांगितले आहे.

सोनूला मागच्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात पहिल्यांदा नोटीस बजावण्यात आली होती. सोनूने त्या नोटीसला दिवाणी न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र तिथे सोनूची याचिका फेटाळण्यात आली. त्यानंतर सोनूने मुंबई उच्च न्यायालयात पुन्हा या नोटीसला आव्हान दिले.

सोनूवर जुहू येथील एका सहा माजली इमारतीचे रूपांतर कोणत्याही परवानगीशिवाय हॉटेलमध्ये केल्याचा आरोप मुंबई महानगर पालिकेने लावला आहे. बीएमसीच्या म्हणण्यानुसार जुहू येथील ‘शक्तिसागर या सहा माजली इमारतीचे रूपांतर कोणत्याही व्यासायिक इमारतीत होऊ शकत नाही. तरी देखील सोनूने विनापरवाना आणि विनापरवानगी या इमारतीच्या बांधकामात काही बदल केले. इमारतीचा काही हिस्सा वाढवून, इमारतीच्या नकाशात बदल करत इथे हॉटेल सुरु केले. बीएमसीच्या तक्रारीनुसार सोनूला याबाबत नोटीस बजावूनही सोनूने अवैध बांधकाम सुरूच ठेवले.

तत्पूर्वी मुंबईसह देशात कोरोनाचा प्रकोप सुरू असताना राज्यातील परप्रांतीय मजूरांसाठी देवदूत म्हणून आलेल्या सोनूने लाखो लोकांना स्वखर्चाने त्यांच्या घरी पाठवले. यासोबतच त्याने अनेक गरजू लोकांसाठी चांगली आणि आवश्यक कामे देखील केली. त्याच्या या कार्याचे कौतुक सर्वच स्तरातून झाले होते, किंबहुना अजूनही होत आहे.

हे देखील वाचा