Thursday, April 2, 2026
Home कॅलेंडर अवघड आहे! फक्त खलनायकी रोल केला म्हणून बाप त्याच्याशी सहा महिने बोलला नव्हता

अवघड आहे! फक्त खलनायकी रोल केला म्हणून बाप त्याच्याशी सहा महिने बोलला नव्हता

आज बॉलिवूडचा हँडसम हंक नील नितीन मुकेशचा आज वाढदिवस. १५ जानेवारी १९८२ ला मुंबईमध्ये नीलचा जन्म झाला. घरात सुरुवातीपासूनच फिल्मी वातावरण असल्याने नीलला अभिनयात रुची येणे स्वाभाविकच होते, म्हणूनच नीलने अभिनय करण्याचे ठरवले. नीलला त्याचे नाव गानकोकिळा लता मंगेशकर यांनी दिले आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक मुकेश हे नीलचे आजोबा तर गायक नितीन हे वडील आहेत. नीलचे खरे नाव नील नितीन मुकेश चंद माथूर असे आहे.

नीलने २००७ साली जॉनी गद्दार चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. मात्र यापूर्वी त्याने बालकलाकार म्हणून ‘विजय’ आणि ‘जैसी करणी वैसी भरणी’ या सिनेमात काम केले होते. नीलने बहुतकरून नकारात्मक भूमिका खूप केल्या. यात गोलमाल अगेन, वजीर, प्रेम रतन धन पायो, साहो, प्लेयर्स अशा काही चित्रपटांचा समावेश आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार नीलने त्याच्या पहिल्याच चित्रपटात खलनायकी भूमिका साकरल्याने त्याचे वडील त्याच्यावर खूप नाराज झाले होते. त्याच्या म्हणण्यानुसार नीलने खलनायकी भूमिका साकारल्यामुळे त्यांच्या परिवाराचे नाव खराब होऊ शकले असते. त्यामुळेच त्यांनी नीलशी जवळपास सहा महिने बोलणे बंद केले होते.

नीलचा मधुर भांडारकर दिग्दर्शित २००९ मध्ये आलेला ‘जेल’ हा सिनेमा खूप चर्चेत आला होता. या सिनेमात त्याने न्यूड सीन केला असल्याने त्यावेळी खूप वाद झाले होते. हा सिनेमा पुढे फ्लॉप ठरला. नीलने अनेक चांगल्या आणि मोठ्या चित्रपटात काम केले. मात्र तरीही नीलला पाहिजे तसे यश मिळाले नाही.

नीलच्या खाजगी आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर नीलचे फॅशन डिझायनर प्रियांका भाटियासोबत अनेक वर्ष अफेयर होते. नीलच्या पदार्पणानंतरही त्यांचे नाते टिकून होते. अनेक कार्यक्रमांना ही जोडी सोबत दिसायची. २०१० साली आलेला लफंगे परिंदे चित्रपटादरम्यान नील आणि दीपिकाच्या अफेयरच्या बातम्या यायला लागल्या, तेव्हा नील आणि प्रियांका यांचे नाते संपुष्टात आले.

नीलने २०१७ साली रुक्मिणी सहायसोबत लग्न केले. नील आणि रुक्मिणी यांचे लग्न अरेंज मॅरेज असून दोन्ही कुटुंबिय एकमेकांना खूप चांगल्या प्रकारे ओळखतात. याच ओळखीमुळे या दोघांचे लग्न जमले. २०१५ साली दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर या दोघांनी साखरपुडा करत २०१७ मध्ये उदयपूरमधील रेडिसन ब्‍लू हॉटेलमध्‍ये रजवाडापध्‍दतीने मोठ्या थाटामाटात हा विवाहसमांरभ पार पडला होता.

रुक्मिणी नॉन फिल्मी बॅकग्राऊंडमधून असून ती एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये काम करते. तिने तिचे शिक्षण मुंबईतील लीलावती बाई पोद्दार हायस्कूलमधून घेतले आहे. या दोघांना खूप सुंदर अशी नुर्वी नावाची मुलगी आहे. नील नेहमीच तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो.

हे देखील वाचा