हे नवीन वर्ष सर्वांसाठी खासकरून कलाकारांसाठी खूप आनंदायी दिसत आहे. अनेक कलाकार विवाहबंधनात अडकत असताना, दुसरीकडे काही कलाकार आई- बाबा होत आहे. असेच एक मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचे नाव असणारा अभिनेता दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी नुकताच बाबा झाला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याने ही आनंदाची माहिती सर्वाना दिली आहे. निपुणच्या बायकोने एका सुंदर मुलीला जन्म दिला आहे.
निपुण धर्माधिकारी आणि संचिता चांदोरकर यांचे पाच वर्षांपूर्वी लग्न झाले होते. आता त्यांच्या आयुष्यात आलेल्या या नवीन आणि गोड बाळामुळे दोघेही प्रचंड खूश आहेत. निपुणने सोशल मीडियावर त्याच्या मुलीचे दोन फोटो पोस्ट केले आहेत. एका फोटोत त्याच्या पत्नीच्या संचिताचा कुशीत त्यांची परी पाहायला मिळत असून दुसऱ्या फोटोत त्याच्या खांद्यावर ती शांत झोपली आहे.
निपुण धर्माधिकारी हे नाव आज सर्वश्रुत आहे. भाडीपा या तुफान लोकप्रिय असलेल्या यूट्यूब चॅनेलवरच्या ‘ मराठी कास्टिंग काऊच’ कार्यक्रमामुळे निपुण चांगलाच प्रकाशझोतात आला. भाडिपा म्हणजेच भारतीय डिजिटल पार्टीमुळे तो प्रचंड हिट झाला. सोबतच त्याने संगीत मानापमान, संगीत सौभद्र या संगीत नाटकांचे दिग्दर्शन केले आहे. तर एमएक्स प्लेअरवरील ‘वन्स अ इयर’ नावाच्या वेब सीरिजमध्येही तो मृण्मयी गोडबोलेसोबत मुख्य भूमिका साकारताना दिसला होती.
निपुणने सचिन खेडेकर यांची मुख्य भूमिका असलेल्या बापजन्म या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील केले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. भविष्याचा वेध घेणारा दिग्दर्शक म्हणून निपुणची ख्याती आहे. पण त्याचबरोबर त्यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये कलाकार आणि लेखक म्हणूनही आपला ठसा उमटवला आहे. त्यात ‘नौटंकी साला’ आणि ‘हरीश्चंद्राची फॅक्टरी’ यांचा समावेश आहे.
निपुण धर्माधिकारीने २००९ साली पुण्यात ‘नाटक कंपनी’ नावाची नाट्यसंस्था काढली. ही कंपनी मराठीतली जुनी पाच-अंकी संगीत नाटके त्याच पारंपारिक पद्धतीत सादर करते. ही कंपनी निपुण स्वतःच्या खर्चाने स्वतःच चालवतो.










