Saturday, September 30, 2023

“आपलं उत्तरदायित्व समजून…” अभिनेता हार्दिक जोशीने मुख्यमंत्रांच्या ‘त्या’ कृतीचे केले भरभरून कौतुक

सध्या महाराष्टार्त जोरदार पाऊस सुरु आहे. या पाऊसामुळे अनेक मोठ्या दुर्घटना घडताना दिसत असून, त्यात खूप मोठे नुकसान देखील होत आहे. नुकताच संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी अशी एक घटना घडली, ज्यामुळे नेते, अभिनेते आणि सामान्य लोकांना देखील अतीव दुःख झाले. ती घटना म्हणजे, इर्शाळवाडीवर दरड कोसळून झालेली जीवित हानी.

इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या या इर्शाळवाडीवर रात्रीतून एक दरड कोसळली आणि संपून गाव दबून गेला. पाच दिवस उलटल्यानंतरही अजून तिथे मातीचा ढिगारा बाजूला करत लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. आतापर्यंत या दुर्घटनेत जवळपास २७ लोकांनी त्यांचा जीव गमावला आहे. तर अजून बरेच लोकं इथे अडकल्याची माहिती समोर येत आहे.

ही घटना झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी भरपावसात चिखलातून जात सर्व माहिती घेतली. यावेळी त्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले. मुख्यमंत्री यांच्या या भेटीमुळे त्यांच्यावर अनेकांनी स्तुतीसुमने उधळली. त्यांच्या या कार्यतत्परतेमुळे सोशल मीडियावरून त्यांचे खूपच कौतुक केले गेले आहे. यातच अभिनेता हार्दिक जोशीने देखील सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले आहे.

हार्दिकने या घटनेच्या पाहणीदरम्यानचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक फोटो फोटो इन्स्टाग्राम स्टोरीला शेअर केला आहे. यासोबत त्याने लिहिले, “रायगड जिल्ह्यात इर्शाळवाडी येथे दरड कोसळली. ती बातमी मुख्यमंत्रीसाहेबांना कळताच, ते घटनास्थळी पोहोचले आणि स्वतः सर्व परिस्थिती व व्यवस्थापन बघितले. इतक्या तातडीने काम करणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांची नक्कीच नोंद होईल. खरा नेता तोच, जो तळमळीने संकटकाळी मदतीला धावून जातो. आपुलकीने विचारपूस करतो, धीर देतो. आपलं उत्तरदायित्व समजून ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता, रस्त्यावर उतरलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांना सलाम.”

दरम्यान मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेता असलेल्या हार्दिकने काही दिवसांपूर्वीच अनेक कलाकारांच्या साथीने शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. हार्दिक आता ‘शिव चित्रपटसेना’ यासाठी काम करणार असून, मनोरंजनसृष्टीतील समस्या शासनापर्यंत पोहोचवणार आहे.

अधिक वाचा –
हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज गायक मुकेश यांच्या १०० व्या जयंती दिनी पंतप्रधानांनी ट्विट करत काढले गौरवोद्गार म्हणाले…
लवकरच आई होणाऱ्या स्वरा भास्करने तिचा ‘तो’ व्हिडिओ शेअर करत केले बेबी बंप फ्लॉन्ट, नेटकरी म्हणाले…

हे देखील वाचा