Friday, April 19, 2024

‘…तो चुकीचा सिनेमा बनवत आहे’, आर माधवनने सांगितले आमिरच्या ‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाचे कारण

सोशल मीडियावर ‘बॉयकॉट’ हा ट्रेंड हल्ली जोरदार सुरू आहे. या भोवऱ्यात बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान याचा ‘लाल सिंग चड्ढा‘ हा सिनेमा अडकला आहे. त्याच्या सिनेमाला मोठ्या प्रमाणात बॉयकॉट करण्याची मागणी केली जात आहे. इतकेच नाही, तर सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीपासूनच ही मागणी केली जात आहे. यामुळे आमिरचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हवे तसे यश मिळवू शकला नसल्याचे स्पष्ट होत आहे. हे प्रकरण इतके जास्त वाढले आहे की, इंडस्ट्रीतील सुपरस्टार्सही यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. अशात अभिनेता आर माधवन यानेही बॉयकॉटवर त्याचे मत मांडले आहे.

‘आमिरने घेतलीय मेहनत’
आमिर खान (Aamir Khan) याच्या ‘लाल सिंग चड्ढा’ (Laal Singh Chaddha) या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर अपेक्षेप्रमाणे यश आले नाही. अशात आर माधवन (R Madhavan) याने त्याचे मत मांडले आहे. त्याने नुकतेच ‘धोक- राऊंड द कॉर्नर’ या सिनेमाच्या टिझर लाँचवेळी बॉयकॉटबद्दल वक्तव्य केले. त्याला विचारण्यात आले की, आमिरच्या ‘लाल सिंग चड्ढा’सारखा सिनेमा चित्रपटगृहात चालू शकला नाही, यावर काय सांगशील? या प्रश्नाचे उत्तर देताना माधवनने आमिरचे कौतुक केले.

तो म्हणाला की, “जर आम्हाला हे माहिती असते, तर आम्ही सर्वच हिट सिनेमे बनवले असते. कोणीही असा विचार करत नाही की, तो चुकीचा सिनेमा बनवत आहे. या सिनेमासाठी आमिरनेही तितकीच मेहनत घेतली आहे, जितकी मेहनत एका हिट सिनेमाचा अभिनेता घेतो. प्रत्येकाचे एक ध्येय असते की, त्याने चांगले सिनेमे बनवावे. तसेच, त्याचा सिनेमा चाहत्यांना आवडला पाहिजे आणि खूप चांगले यश मिळवले पाहिजे.”

‘कोरोना काळानंतर बदलली लोकांची आवड’
आर माधवन याने पुढे बोलताना असेही सांगितले की, हिंदी सिनेमे सध्या चालत का नाहीयेत. तो म्हणाला की, “कोरोना काळानंतर लोकांची आवड बदलली आहे. आम्हाला असं वाटतं की, लोकांनी आमचे सिनेमे पाहावे. त्यासाठी आम्हाला आमचे सिनेमे दाखवण्यासाठी असे सिनेमे बनवले पाहिजेत, जे अधिक चांगले असतील आणि त्यात लोकांना रस असेल.”

किती बजेट आणि किती कमाई?
आमिर खान आणि करीना कपूर खान अभिनित ‘लाल सिंग चड्ढा’ हा सिनेमा १५० कोटींच्या बजेटमध्ये बनला आहे. मात्र, या सिनेमाने एक आठवड्यानंतर जवळपास फक्त ४९.६३ कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा सिनेमा ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
वाचव रे देवा! मृत्यूशी झुंज देणाऱ्या राजूची तब्येत पुन्हा बिघडली, आठवड्यापासून शुद्ध आलीच नाही
‘मग मी काय ऍबॉर्शन करू का?’ मुलीच्या जन्मानंतर ४ महिन्यातच प्रेग्नेंट राहिल्यावर ट्रॉलर्सला अभिनेत्रीचे उत्तर
गिप्पी ग्रेवालने सांगितली त्याची संघर्षमय कहाणी; म्हणाले, ‘पंजाबमध्ये खंडणी वसूल करणे…’

हे देखील वाचा