अभिनेत्री राजश्री देशपांडे (Rajshri Deshpande) यांनी अलीकडेच सोशल मीडियावर त्यांच्या आरोग्याबाबत महत्त्वाची माहिती शेअर केली आहे. त्यांनी सांगितले की त्यांना ग्रेड १ ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाले होते आणि त्यानंतर त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
इंस्टाग्रामवर फोटो आणि भावनिक पोस्ट शेअर करत राजश्री यांनी हा संपूर्ण प्रवास चाहत्यांसमोर मांडला. नियमित तपासणीदरम्यान कर्करोग लवकर आढळल्यामुळे उपचारासाठी योग्य वेळी पावले उचलता आली, असे त्यांनी नमूद केले. असंख्य चाचण्या, तपासण्या आणि शस्त्रक्रिया हा प्रवास सोपा नव्हता, मात्र कुटुंबीयांच्या आणि जवळच्या व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे त्यांना मानसिक बळ मिळाल्याचे त्यांनी सांगितले. विशेषतः शस्त्रक्रियेनंतर आई-वडिलांना पाहिल्यावर त्यांची भीती कमी झाली, असेही त्यांनी भावनिक शब्दांत लिहिले. सध्या त्यांची प्रकृती सुधारत असून त्या लवकरच रुग्णालयातून घरी परतण्याच्या तयारीत आहेत.
या पोस्टनंतर चाहत्यांसह चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी त्यांच्यावर प्रेम आणि शुभेच्छांचा वर्षाव केला. अभिनेत्री तिलोत्तमा शोम, छाया कदम आणि अभिनेता आदर्श गौरव यांच्यासह अनेकांनी त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
राजश्री देशपांडे यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीत वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी २०१२ मध्ये तलाश या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर किक, मॉम, मंटो, द स्काय इज पिंक आणि जोराम यांसारख्या चित्रपटांत त्यांनी प्रभावी भूमिका साकारल्या.
टेलिव्हिजन क्षेत्रातही त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. कुछ तो लोग कहेंगे आणि २४: इंडिया या मालिकांमध्ये त्या झळकल्या. मात्र त्यांना व्यापक लोकप्रियता नेटफ्लिक्सवरील सेक्रेड गेम्स या गाजलेल्या मालिकेमुळे मिळाली.
राजश्री देशपांडे यांच्या धैर्यपूर्ण भूमिकेमुळे अनेकांना आरोग्याबाबत जागरूक राहण्याचा संदेश मिळाला आहे. नियमित तपासणीचे महत्त्व त्यांनी स्वतःच्या अनुभवातून अधोरेखित केले असून, त्यांच्या लवकर पूर्ण बरे होण्यासाठी सर्वत्र प्रार्थना व्यक्त होत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
राजपाल यादवने सोनू सूदवर केली टीका; म्हणाला, ‘मी म्हटले नव्हते की कामाची गरज आहे’


