Thursday, March 28, 2024

कुणी बस कंडक्टर, कुणी सेल्समन तर कुणी होतं आचारी; ‘या’ दिग्गज कलाकारांची ‘संघर्ष गाथा’ एकदा वाचाच

बॉलिवूडमध्ये आज नाव कमावलेले अभिनेते इथपर्यंत त्यांच्या मेहनतीच्या आणि जिद्दीच्या जोरावर पोहोचले आहेत. अमिताभ बच्चन, अक्षय कुमार ते रजनीकांत यांच्यापर्यंत अनेकांनी पहिल्या टप्प्यात कुठे ना कुठे नोकरी केली होती.

पोटाची खळगी भरण्यासाठी काही ना काही काम करावं लागलं होतं. कुणी वेटर बनलं होतं तर कुणी बस कंडक्टर! चला तर मग आज जाणून घेऊयात या अभिनेत्यांच्या संघर्षाबद्दल जो आपल्याला देखील प्रोत्साहित करेल.

अमिताभ बच्चन

बऱ्याच दशकांपासून बॉलिवूडवर राज्य करत असलेले अमिताभ बच्चन यांनी अभिनय कारकीर्दीची सुरूवात करण्यापूर्वी एक्झिक्युटिव्ह म्हणून एका शिपिंग कंपनीत काम केले आहे. त्याच्या भारदस्त आवाजामुळे बर्‍याच वेळा नोकरी देण्यास नकारही देण्यात आला होता. परंतु, आज अमिताभ बच्चन बॉलीवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेते आहेत. जंजीर, शोले, दिवार, मोहब्बते, पिंक, बदला ही त्यांच्या गाजलेल्या सिनेमांपैकी काही सिनेमांची नावं आहेत.

रजनीकांत

भारतीय सिनेसृष्टीतील हे असं नाव आहे ज्याच्या फक्त नावावरच बॉक्स ऑफिस वर करोडोंची कमाई होते. ज्याचा सिनेमा पाहण्यासाठी थिएटरच्या बाहेर तिकिटासाठी लोकांमध्ये हाणामारी होते. असे हे रजनीकांत स्वतः एकेकाळी बस कंडक्टर होते.

सिनेमात येण्या अगोदर रजनीकांत बंगळुरू ट्रान्सपोर्ट सर्व्हिस मध्ये बस कंडक्टर म्हणून काम केलं. १९७३ साली अभिनयात डिप्लोमा करण्यासाठी मद्रास फिल्म इस्टिट्यूट मध्ये ऍडमिशन घेतलं आणि त्यानंतर त्यांना तामिळ सिनेमांमध्ये ब्रेक मिळाला. रजनीकांत यांना भारत सरकारतर्फे आतापर्यंत पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कारांनी गौरविण्यात आलं आहे.

शाहरुख खान

बॉलिवूडचा बादशाह किंवा किंग खान अशी बिरुदावली मिरवणाऱ्या शाहरुख खानने आपल्या अभिनयाने केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगभरातील रसिकांची मने जिंकली आहेत. शाहरुख अवघे १५०० रुपये घेऊन मुंबईत आला होता. इतक्या कमी पैशात आयुष्य घालवण्यासाठी शाहरुखला अनेक वेळा रेल्वे प्लॅटफॉर्मवर रात्र काढावी लागली.

संघर्षाच्या दिवसात, या अभिनेत्याने कॉन्सर्टसमध्ये अटेंडेंट म्हणूनही काम केलं आहे, इथपर्यंत की १९९४ साली आलेल्या ‘कभी हा कभी ना’ या स्वतःच्याच चित्रपटाच्या तिकिटांची विक्री त्याने केली होती. चित्रपटांपूर्वी शाहरुख हा नाटकात काम करत असे. तिथे त्याच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं.

टेलिव्हिजन शो फौजी आणि सर्कसमधूनही त्याला खूप प्रसिद्धी मिळाली, यानंतर मात्र शाहरुखने कधीच मागे वळून पाहिले नाही. आजपर्यंत कभी खुशी कभी गम, डीडीएलजे, चेन्नई एक्स्प्रेस, रईस यांसारखे हिट चित्रपट त्याने दिले आहेत.

बोमन ईराणी

डॉन, मुन्ना भाई एमबीबीएस, हॅपी न्यू इयर आणि थ्री इडियट्स यासारख्या सर्वोत्कृष्ट चित्रपटात आपल्या अभिनयाची जादू दाखवणाऱ्या बमन इराणी यांच्या वडिलांचे लहानपणीच निधन झालं. वडिलांची एक छोटीशी बेकरी होती जी सांभाळण्यात बमन त्यांच्या आईला मदत करत असत. नंतर, आईला मदत करण्यासाठी बमनने मुंबईतील ताजमहाल पॅलेस आणि टॉवर या मोठ्या हॉटेलमध्ये वेटर आणि रूम सर्व्हिस अटेंडंट म्हणून काम करण्यास सुरवात केली.

आपल्या पगारातून वाचलेल्या पैशातून त्यांनी फोटोग्राफीचा कोर्स केला आणि थिएटरमध्ये प्रवेश मिळवला. आणि इथुनच त्यांनी हळू हळू आपल्या अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली. बमन आज इंडस्ट्रीमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे.

अक्षय कुमार

बॉलिवूडचा खिलाडी म्हणून ओळखला जाणाऱ्या अक्षय कुमार ने एकेकाळी हॉटेलमध्ये वेटर आणि शेफचं देखील काम केलं आहे. शिवाय अक्षय हा मार्शल आर्टस चा प्रशिक्षक देखील आहे. कधी काळी लहान मुलांना तो याचं प्रशिक्षण देखील देत असे. १९९० साली करियरच्या सुरुवातीच्या काळात अक्षय ने खूप साऱ्या ऍक्शन फिल्म्स मध्ये काम केलं. ज्यामध्ये तो स्वतः धाडसी स्टंटस करत असे.

अक्षय च्या गाजलेल्या सिनेमांची नावे ही प्रत्येकाला पाठच आहेत ती वेगळी काही सांगायची गरज नाही. आजच्या घडीला एका वर्षात सर्वात जास्त सिनेमे करणारा तसंच सर्वात जास्त कमाई करणारा म्हणून अक्षय कुमारची ओळख आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकी

बॉलिवूडच्या सर्वोत्तम नटांच्या यादीत गणती होणाऱ्या या अभिनेत्याचा संघर्ष फार मोठा आहे. स्ट्रगलच्या काळात दीड वर्ष नवाज ने वॉचमन आणि केमिस्ट म्हणून काम केलं. घरात आठ भावंडांमधे सर्वात मोठा असलेला नवाज हा नोकरी धंद्यासाठी दिल्लीला गेला. तिथे त्याने नाटकात काम करायला सुरुवात केली.

नवाज ने १९९०साली आलेल्या आमिर खानच्या सरफरोश सिनेमामध्ये एक छोटीशी भूमिका साकारली होती. यानंतर शूल, जंगल, मुन्नाभाई एमबीबीएस या सिनेमांमधून देखील लहान सहन भूमिका नवाज करत राहिला. फार मोठ्या संघर्षानंतर नवाजला काही उत्तम भूमिका मिळायला लागल्या. गॅंग्ज ऑफ वासेपुर, माझी द माऊंटन मॅन, मंटो, ठाकरे, बजरंगी भाईजान, मॉम, किक, लंचबॉक्स यासारख्या सिनेमांमध्ये नवाजने साकारलेल्या भूमिकांचं खूप कौतुक झालं आहे.

जॅकी श्रॉफ

बॉलिवूडमध्ये जग्गु दादा म्हणून ओळखला जाणारा जॅकी श्रॉफ हा खरंच जग्गु दादाच होता. लोक त्याला याच नावाने ओळखायचे. जॅकी त्याच्या कुटुंबासह मुंबईतील तीन बत्ती चाळीत वास्तव्यास होता. जॅकी जेवण देखील उत्तम बनवत असे. याच कौशल्याच्या आधारावर तो मुंबईतील ताजमहल पॅलेस या हॉटेलमध्ये शेफ ची नोकरी मागण्यासाठी गेला. परंतु कमी शिकलेला असल्याने त्याला तिघून नकार मिळाला.

यानंतर त्याने फ्लाईट अटेंडरसाठी देखील इंटरव्ह्यू दिला परंतु तिथे देखील त्याला नकारघंटा मिळाली. असंच एकदा बेस्ट बस मधून प्रवास करताना एकाने जॅकी ला मॉडेलिंग करणार का असा प्रश्न विचारला. जॅकी ने पैसे मिळणार का असं उलट विचारलं. जेव्हा उत्तर हो असं आलं तेव्हा त्याने ते काम करायला सुरुवात केली. मॉडेलिंग करता करता जॅकी ची एन्ट्री बॉलिवूड मध्ये झाली. आणि आज बॉलिवूडमध्ये जॅकीची एक वेगळी ओळख आहे.

अर्षद वारसी

मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटामध्ये सर्किट आणि गोलमाल, धमाल यासारख्या चित्रपटातुन सर्वांना हास्याच्या मनमुराद आनंद देणारा अर्शद वारसी हा एकेकाळी सेल्समन म्हणून दारोदारी हिंडत असे. यानंतर त्याने बर्‍याच चित्रपटांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका केल्या आणि नंतर तेरे मेरे सपने या चित्रपटामधून त्याला मोठा ब्रेक मिळाला.

आज जॉली एलएलबी, धमाल सिरीज, मुन्नाभाई सिरीज, गोलमाल सिरीज या सारख्या महत्त्वाच्या सिनेमांच्या सिरीज मध्ये आपण त्याला विनोदी भूमिका साकारताना पाहिलंच आहे. परंतु आपल्याला त्याचं उत्तम आणि सिरीयस काम पाहायचं असेल तर काही काळापूर्वी आलेली असुर ही वेबसिरीज आपण नक्कीच पाहायला हवी.

धर्मेंद्र

बॉलिवूडचे ही-मॅन म्हणून ओळखले जाणारे अभिनेते धर्मेंद्र यांचा पंजाब ते मुंबई हा प्रवास काही सोपा नव्हता. मुंबईत आल्यानंतर धर्मेंद्र यांनी अनेक दिवस ड्रीलिंग फर्म मध्ये काम केलं. त्यावेळी त्यांना त्याचे २०० रुपये महिन्याला मिळायचे. राहण्यासाठी जागा नसल्याने धर्मेंद्र हे त्याचं गॅरेजमध्ये रात्र काढत असत. दरम्यानच्या काळात फिल्मफेअरच्या न्यु टॅलेंट हंट या स्पर्धेचा विजेता म्हणून धर्मेंद्र यांचं नाव पुढे आलं.

त्यांना एका सिनेमाची ऑफर या स्पर्धेतून आली होती. परंतु दुर्दैवाने हा सिनेमा कधी बनलाच नाही. यानंतर कालांतराने १९६० मध्ये आलेल्या दिल भी तेरा हम भी तेरा या सिनेमामधून त्यांनी बॉलिवूड मध्ये पदार्पण केलं. आज धर्मेंद्र यांचं बॉलिवूड मधील स्थान हे बिग बी अमिताभ यांच्या देखील वरचं आहे.

हे देखील वाचा