Thursday, March 28, 2024

अभिनेता रणबीर कपूरने सांगितले अनुष्का शर्मासोबतच्या भांडणाचे कारण म्हणाला ‘आमच्या दोघांचा राग…’

अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या त्याच्या आगामी ‘शमशेरा’ आणि ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटांमुळे मीडियाच्या चर्चेत आहे. रणबीर ‘शमशेरा’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अलीकडेच रणबीरने माध्यमांशी संवाद साधताना अनेक रंजक प्रश्नांची उत्तरे दिली. यादरम्यान जेव्हा त्याला त्याच्या आवडत्या को-स्टारचे नाव विचारण्यात आले तेव्हा रणबीरने क्षणाचाही विलंब न लावता अनुष्का शर्माचे (Anushka Sharma) नाव घेतले. काय म्हणाल रणबीर कपूर चला जाणून घेऊ.

अभिनेता रणबीर कपूर हा बॉलिवूडमधील चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जातो. आपल्या दमदार अभिनयाने त्याने सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. चित्रपटांतील अभिनयाइतकाच रणबीर कपूर त्याच्या प्रेमप्रकरणांमुळेही कायमच माध्यमांमध्ये चर्चेचा विषय राहिला आहे. सध्या तो त्याच्या आगामी शमशेरा चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यावेळी रणबीर कपूरने अभिनेत्री अनुष्का शर्माबद्दल महत्वाचा खुलासा केला.

संवादादरम्यान रणबीरला त्याच्या आवडत्या को-स्टारबद्दल विचारण्यात आले. यावर रणबीर कपूरने सर्वप्रथम सौरभ शुक्लाचे नाव घेतले, ज्यांच्यासोबत रणबीरने ‘बर्फी’ आणि ‘जग्गा जासूस’ या चित्रपटात काम केले होते. आगामी ‘शमशेरा’ या चित्रपटातही तो दिसणार आहे. यानंतर रणबीर म्हणाला की, “जर आपण आवडत्या लीडिंग लेडीबद्दल बोललो तर ती अनुष्का शर्मा आहे. आम्ही दोघे खूप चांगले मित्र आहोत. आम्हाला एकमेकांवर खूप राग येतो. खूप भांडतो. आम्हा दोघांमध्ये चांगली सर्जनशीलता आहे.” रणबीर आणि अनुष्काने ‘ऐ दिल है मुश्किल’, ‘बॉम्बे वेल्वेट’ आणि ‘संजू’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे.

रणबीरच्या ‘शमशेरा’ या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर हा चित्रपट 22 जुलैला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटात रणबीर पूर्णपणे वेगळ्या अवतारात दिसणार आहे. या चित्रपटात तो संजय दत्त आणि वाणी कपूरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. याशिवाय तो 09 सप्टेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात दिसणार आहे. यात आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, नागार्जुन, मौनी रॉय यांच्याही भूमिका आहेत.

या आगामी चित्रपटांमधून रणबीर कपूर चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. याआधी तो 2018 मध्ये संजय दत्तच्या बायोपिक ‘संजू’मध्ये दिसला होता. ब्रेकनंतर रणबीरला पाहण्यासाठी चाहतेही आतुर झाले आहेत. रणबीर चाहत्यांवर काय जादू निर्माण करतो हे पाहणे रंजक ठरणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा