ज्या शोमध्ये स्पर्धक म्हणून झाली सहभागी, त्याच शोमध्ये आहे परीक्षक; कधीकाळी आई- वडिलांना नव्हते घालायचे जन्माला


बॉलिवूड म्हणजेच स्वप्ननगरी. इथे सर्वानाच त्यांच्या हुशारीच्या जोरावर काम मिळेल आणि मिळालेल्या कामातून त्यांना प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळेल असे नाही. कारण या क्षेत्रात हुशारीसोबतच गरज आहे लकची, नशिबाची. शिवाय जर सुरुवातीला अपयश मिळाले, तरीही आपली चिकाटी न सोडता प्रयत्न करत नशीबही बदलवण्याची ताकद मनुष्यात आहे. या इंडस्ट्रीमध्ये अशी अनेक उदाहरणे आहेत, ज्यांना सुरुवातीला जरी अपयश मिळाले, तरीही त्यांनी त्यांच्या प्रयत्नांनी इंडस्ट्री गाजवली आहे, गाजवत आहेत.

सध्याच्या घडीला हिंदी सिनेसृष्टीमधील आघाडीची गायिका म्हणजे नेहा कक्कर. नेहाने तिच्या दमदार आवाजाने प्रेक्षकांना वेड लावले. वर म्हटल्याप्रमाणे नेहाने संगीताच्या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र, ती कधी अपयशाने खचून गेली नाही. तिच्या चिकाटीने आणि जिद्दीने तिने यश मिळवले. आज नेहा बॉलिवूडच्या टॉप गायिकांमध्ये गणली जाते. रविवारी (६ जून) नेहा तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे. ६ जून, १९८८ रोजी उत्तराखंडच्या ऋषिकेशमध्ये नेहाचा जन्म झाला होता.

नेहाने तिच्या एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, तिच्या घरची परिस्थिती इतकी बेताची होती की, तिच्या आई-वडिलांनी तिला जन्माला न घालण्याचे ठरवले होते. कारण आर्थिक चणचण असतांना तिच्या आई- वडिलांना ३ मुलं सांभाळणे कठीण होते. त्यामुळे त्यांनी नेहाला जन्म न देण्याचे ठरवले होते. मात्र, नेहाच्या वेळेस तिच्या आईला ८ आठवडे पूर्ण झाल्याने तिची आई गर्भपात करू शकली नाही. नेहाचा जन्म झाला आणि तिने तिच्या मेहनतीने तिच्यासोबतच आई- वडिलांचे देखील नशीब आणि परिस्थिती बदलली.

अगदी सुरुवातीच्या काळात नेहाचे वडील ऋषिकेशमध्ये कॉलेजच्या बाहेर समोसे विकायचे, तर आई गृहिणी होती. एका भाड्याच्या खोलीमध्ये ते ५ जणं राहायचे. ९० च्या दशकाच्या सुरुवातीला नेहाचे कुटुंब दिल्लीला आले.

दिल्लीला गेल्यानंतर वयाच्या चौथ्या वर्षापासूनच नेहाने देवीच्या जगरात्यामध्ये भजनं गायला सुरुवात केली. नेहा तिच्या बहिणीसोबत भजन गायची. एका दिवसात ती आणि तिची बहीण ४/५ जगरातामध्ये भजनं गायला जायच्या. नेहाने संगीताचे कोणतेही शिक्षण घेतले नाही. जगरातामध्ये गाणे गातानाच ती संगीताबद्दल माहिती जाणून घेत होती. नेहाला ‘जय माता दी गर्ल’ म्हणून ओळखले जायचे.

संगीतामध्ये करिअर करण्याच्या दृष्टीने नेहा २००४ साली तिचा भाऊ टोनी कक्करसोबत मुंबईमध्ये आली. इथे आल्यावर तिने इंडियन आयडलच्या दुसऱ्या पर्वात हजेरी लावली. मात्र, कमी वोट मिळाल्यामुळे ती या शोमधून लवकरच बाहेर पडली. २००८ मध्ये तिने तिचा ‘नेहा द रॉकस्टार’ नावाचा अल्बम प्रदर्शित केला. या अल्बममुळे तिला थोडीफार ओळख मिलाली. पुढे पाच वर्ष ती मुंबईमध्ये राहिली आणि पार्श्वगायनासाठी प्रयत्न करत होती. मात्र, या पाच वर्षात तिला काम मिळाले नाही. असे असले तरीही हार न मानता तिने प्रयत्न सुरूच ठेवले. यादरम्यान तिने अनेक गाणी गायली. मात्र, त्यामुळे तिला पाहिजे तेवढी ओळख मिळाली नाही.

तिच्या या प्रयत्नांना अखेर यश आले आणि तिला संगीतकार प्रितम यांनी सैफ अली खान, दीपिका पदुकोणच्या ‘कॉकटेल’ सिनेमात ‘सेकंड हॅन्ड जवानी’ हे गाणे गाण्याची संधी दिली. हे गाणे तुफान गाजले. पुढे तिने यारियां सिनेमासाठी ‘सनी सनी’ गाणे गायले. हे गाणे पण गाजले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही.

आज नेहाचे सितारे इतके बुलंद आहेत, जे गाणे ती गाते ते गाणे हिट होणारंच, याची आधीच खात्री दिली जाते. नेहाने आतापर्यंत ‘लंडन ठुमकदा’, ‘आंख मारे’, ‘आयो राजा’, ‘धतिंग नाच’, ‘मनाली ट्रान्स’, ‘कर गयी चूल’, ‘काला चश्मा’ अनेक हिट गाणी दिली आहेत. सोबतच तिचे अनेक अल्बम्स देखील प्रदर्शित झाले असून ते सर्व अल्बम हिट आहेत.

नेहाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले, तर तिने ऑक्टोबर २०२० मध्ये रोहनप्रीत सिंगसोबत लग्न केले. रोहनप्रीत आणि नेहाच्या वयामध्ये मोठा फरक असला, तरीही त्यांचे एकमेकांवर असलेले प्रेम खूप आहे. ‘नेहू दा ब्याह’ गाण्याच्या वेळेस नेहाची रोहनप्रीत सोबत पहिली भेट झाली. या शूट दरम्यान त्यांची चांगली ओळख झाली. पुढे काही दिवस गेल्यानंतर रोहनप्रीतने नेहाला आपण लग्न करू असा मेसेज केला. मात्र, तेव्हा रोहनप्रीत नशेत असल्याने नेहाला हे काही खरे वाटले नाही. दुसऱ्यादिवशी नेहाला भेटायला रोहनप्रीत तिच्या हॉटेलवर पोहचला आणि तिला त्याच्या प्रश्नाचे उत्तर विचारले, तेव्हा नेहाला रोहनप्रीत या नात्याबाबद्दल गंभीर असल्याचे वाटले आणि तिने त्याला त्याच्या आईला भेटवले. पुढे काही महिन्यांनी त्यांनी लग्न केले.

नेहाबद्दल सांगायचे झाले, तर ती एकमेव अशी भारतीय गायिका आहे, जिच्याकडे यूट्यूबचा डायमंड अवॉर्ड आहे. कारण तिचे यूटुबवर १ कोटीपेक्षा अधिक सब्सक्रायबर्स आहेत. ‘सत्यमेव जयते’ सिनेमातील ‘दिलबर’ हे गाणे बिलबोर्ड यूट्यूब म्यूझिक चार्टवर तिसऱ्या क्रमांकावर आहे.

नेहाच्या संपत्तीबद्दल बोलायचे झाले, तर माध्यमातील वृत्तानुसार, नेहाकडे ३६ कोटी रुपयांची संपत्ती आहे. ती दर महिन्याला ३० लाख रुपयांची कमाई करते. यानुसार वर्षाला ३.५ कोटी रुपयांची कमाई करते. नेहा मुंबईच्या प्राईम लोकेशनवर राहत असून, तिच्या घराची किंमत १.२ कोटी आहे. ती एका शो साठी २५/३० लाख रुपये घेते, तर एका गाण्यासाठी १०/१५ लाख रुपये घेते. तिच्याकडे Audi Q7, BMW अशा अनेक महागड्या गाड्या देखील आहेत.

नेहाला फिल्मफेअरसोबतच मिरची म्युझिक अवॉर्ड, ब्रिट आशिया अवॉर्ड अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. मुख्य म्हणजे ज्या शोमध्ये नेहाने स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता, आज त्याच इंडियन आयडलमध्ये ती परीक्षक म्हणून काम पाहते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.