Friday, March 29, 2024

असे कलाकार ज्यांनी गाठलं होतं श्रीमंतीचं शिखर, परंतु अखेरच्या दिवसात जगणं देखील झालं होतं जटिल…

बॉलिवूड म्हटलं की आपल्याला चंदेरी दुनिया दिसू लागते. त्यातले मोठं मोठाले नट, नट्या! त्यांच्या महागड्या गाड्या , त्यांचे महागडे कपडे, अफाट पैसा! यामुळे आपल्याला आयुष्यात एकदा तरी बॉलिवूडच्या सिनेमात काम करायला मिळावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. आणि लाखो जण रोज मुंबईत याचसाठी येतात. संघर्ष करतात, मेहनत करतात आणि एक दिवस आपलं नाव या चंदेरी दुनियेत उंचावतात. पण आपल्याला ठाऊक आहे का की भरपूर नाव कमावलेले तसेच श्रीमंत असलेले नट त्यांच्या शेवटच्या काळात इतके गरीब झाले होते की काहींकडे तर स्वतःच्या उपचाराचे पैसे देखील नव्हते आणि काही तर बेवारश्यासारखे या जगातून निघून गेले. अशाच काही प्रसिद्ध पण नंतर अगदीच वाईट अवस्था झालेल्या नटांबद्दल जाणून घेणार आहोत.

भारत भूषण

१९५२ साली रिलीज झालेल्या बैजू बावरा या चित्रपटाने भारत भूषण यांना बरीच प्रसिद्धी मिळाली. ते एक उदात्त कुटुंबात जन्माला आले. भारत भूषण हे त्याकाळी एक अभिनेते, लेखक आणि निर्माते देखील होते. त्याच्याकडे मुंबईत बरेच बंगले असायचे. परंतु काळामुळे भारत भूषण सर्व काही गमावून बसले. त्यांना त्यांच्या महागड्या गाड्या विकाव्या लागल्या. त्यांचे अनेक चित्रपट फ्लॉप ठरले आणि भूषण यांना त्यांच्या सर्व संपत्तीचा लिलाव करावा लागला. १९९२ मध्ये भयंकर आर्थिक संकटाचा सामना करत त्यांचे निधन झालं. भारत भूषण यांना १९५५ साली चैतन्य महाप्रभु तर १९५६ साली मिर्झा गालिब या सिनेमांसाठी सलग दोन वर्षे फिल्मफेअर चा बेस्ट ऍक्टर पुरस्कार मिळाला.

 

विमी

बीआर चोप्रा यांच्या ‘हमराज’ चित्रपटापासून करिअरची सुरुवात करणारी विमी एक स्वतंत्र अभिनेत्री असल्याचे म्हटले जायचं. हमराजनंतर तिचा पुढील चित्रपट पतंगा फ्लॉप ठरला. येथूनच विमीच्या जीवनाची वाईट अवस्था सुरू झाली. विवाहित विमीने पतीवर अत्याचाराचा आरोप केला. जो व्यवसाय केला तो ठप्प झाला. यानंतर, विमीला मद्यपान करण्याची इतकी सवय लागली की तिने सर्व काही विकून टाकलं. २२ ऑगस्ट १९७७ रोजी नानावटी रुग्णालयाच्या जनरल वॉर्डात त्यांचे निधन झाले. विमीचा अंत इतका हृदयद्रावक होता की मृत्यूनंतर स्मशानभूमीत नेण्यासाठी चार खांदे देखील लाभले नाहीत. एका हातगाडीवर विमीचा मृतदेह अंत्यसंस्कारांसाठी नेण्यात आला.

 

भगवान दादा

३०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेले भगवान दादा अजूनही त्यांच्या उत्कृष्ट कामासाठी चिरकाल स्मृतीत राहतील. त्यांनी दिग्दर्शित केलेला अल्बेला हा चित्रपट केवळ भारतातच नव्हे तर पूर्व आफ्रिकेतही खूप लोकप्रिय ठरला होता. पण ‘हसते रेहना’ हा चित्रपट बनवताना भगवान दादांनी आपली सर्व संपत्ती पणाला लावली. जुहूमध्ये समुद्रासमोर त्यांच्याकडे २५ खोल्यांचा आलिशान बंगला होता. त्यांच्याकडे सात महागड्या गाड्यादेखील होत्या. हे सर्व त्यांना या सिनेमाच्या फ्लॉप जाण्याने विकावं लागलं. अमरावतीत जन्मलेल्या एक मराठी कलाकारांनं त्याकाळच्या बड्या बड्या सुपरस्टार्सना देखील श्रीमंतीत टक्कर दिली होती परंतु म्हणतात ना सगळं काही कायम राहत नाही आणि तेच झालं.शेवटच्या दिवसात त्यांची परिस्थिती इतकी हलाखीची झाली की त्यांना चाळीमध्ये राहावं लागलं होतं. भगवान दादा यांनी २००२ मध्ये आपल्या सगळ्यांचा निरोप घेतला.

 

ए.के. हंगल

शोले मधील ए के. हंगल यांचा प्रसिद्ध संवाद ‘इतना सन्नाटा क्यूँ है भाई?’ लोकांना अजूनही तोंडपाठ आहे. अनेक जुने सिनेमे पाहिल्यावर आज देखील ए.के.हंगल यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. हंगल साहेबांनी कधी काळी खूप श्रीमंती अनुभवली होती परंतु अखेरच्या क्षणात त्यांच्याकडे उपचाराखातरही पैसे नव्हते. त्यांनी अखेरपर्यंत चित्रपटांमध्ये काम करणं चालूच ठेवलं परंतु त्यांच्या उपचारासाठी लागणाली रक्कम ते जमा करू शकले नाहीत. बिग बी अमिताभ बच्चन यांना हे कळताच त्यांनी त्वरित २० लाखांची मदत पाठविली. पण हंगल साहेब काळापुढे फार काळ टिकू शकले नाहीत.

 

महेश आनंद

नव्वदीच्या काळातले हिंदी चित्रपटांचे प्रसिद्ध खलनायक महेश आनंद यांनी विश्वात्मा आणि शहेनशहा सारख्या चित्रपटांमध्ये जबरदस्त काम केलं. फक्त हिंदीतच नाही तर त्यांनी तामिळ आणि तेलगू सिनेमांमध्येही कामं केली. परंतु कोट्यावधींची कमाई करुनही महेश आनंद हे अखेरच्या काळात दारिद्र्याने वेढलेले होते. त्यांचा मृत्यू हा मती सुन्न करणारा होता. त्यांच्याच घरात त्यांचा मृतदेह हा विचित्र अवस्थेत सापडला होता.

हे देखील वाचा