Friday, April 19, 2024

बॉलिवूडचा प्रसिद्ध फॅशन डिझायनर स्वप्नील शिंदेचा ‘ट्रान्सवुमन’ असल्याचा खुलासा

नवीन वर्ष म्हटले की येतात ते नवनवीन संकल्प, नवीन सुरुवात, नवीन गोष्टी. प्रत्येक जणं नवीन वर्षात काहीतरी नवीन करण्याचा संकल्प करत असतो. हे संकल्प अगदी सकाळी उठण्यापासून ते फिटनेस पर्यंत अनेक प्रकारचे असतात. मात्र २०२१ च्या या नवीन वर्षात एक नवीन गोष्ट सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. ती गोष्ट म्हणजे बॉलिवूडचा प्रसिद्ध फॅशन डिझायनर स्वप्नील शिंदेची सोशल मीडियावरील एक पोस्ट.

दीपिका पदुकोण, अनुष्का शर्मा, करीना कपूर, कियारा अडवाणी, श्रद्धा कपूर, कैटरीना कैफ यांसारख्या बॉलिवूड दिवांचा फॅशन डिझायनर असलेल्या स्वप्नील शिंदेने आपण ‘ट्रान्सवुमन’ झाल्याचा खुलासा सोशल मीडियावर करत त्यांचे नवीन रूपातील फोटो पोस्ट केले आहे. यासोबतच त्याने त्याचे ‘सायशा शिंदे’ असे नामकरण देखील केले आहे. सायशाने तिच्या या पोस्टसोबत एक मेसेजही लिहिला आहे. तिने तिच्या मेसेजमध्ये लिहिले की,

‘तुम्ही कितीही मोठे झालात तरी तुम्हाला तुमचे बालपण नेहमीच आठवत असते. सर्वांच्या बालपणाच्या आठवणी खूप चांगल्या असतात. माझ्या बालपणाच्या आठवणी फारच वाईट होत्या. शाळा आणि कॉलेजमध्ये जेव्हा सगळी मुले मला माझ्या वागण्यावरून त्रास देत होते, तेव्हा माझ्या मनावर खूप आघात झाले. जे माझे अस्तित्व नाही ते जगताना मला गुदमरल्यासारखे होत होते. मी वयाच्या विसाव्या वर्षी NIFT मध्ये असतांना पहिल्यांदाच स्वतःचे सत्य स्वीकारण्याचे धाडस केले. त्यानंतर मी मुक्त झाले. मी पुरुषांकडे आकर्षित होत असल्याने मला वाटायचे की, मी समलैंगिक आहे. मात्र सहा वर्षांपूर्वी मी स्वत:ला पूर्णपणे जसे आहे तसे स्वीकारले, आणि आता मी समलैंगिक नाही तर एक ट्रान्सवुमन आहे.’

 

स्वप्नीलने सर्जरीचा पर्याय वापरत स्वतःला स्त्री मध्ये रूपांतरित केले आहे. त्याच्यातील हा सर्वात मोठा बदल त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहचवला आहे. सायशाच्या या नव्या निर्णयाबाबत आणि नव्या रूपाबाबत बॉलिवूडमधून स्वागत होत असून तिच्या या नवीन आयुष्यासाठी कलाकार तिला शुभेच्छा देत आहे.

हे देखील वाचा