Friday, February 3, 2023

रवी जाधव म्हणजे मराठी सिनेसृष्टीत दणक्यात ‘टाईमपास’ करणारा ‘पक्का लिंबू’

आज मराठी सिनेसृष्टीमधे अनेक दर्जेदार आणि आशयसंपन्न सिनेमे तयार होतात. सुरुवातीच्या काळात मराठी चित्रपटांची खूप चालती होती. जस काळ पुढे सरकला तशी मराठी चित्रपटाची अवस्था खूपच बिकट झाली. तेच तेच विषय असणाऱ्या मराठी सिनेमांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. मात्र पुन्हा काळ बदलला आणि मराठी सिनेमांनी कात टाकली. आज मराठी चित्रपटांचे इतर अनेक प्रादेशिक भाषांमध्ये रिमेक होत आहे. मराठी चित्रपटांना ही नवी उभारी देण्यामध्ये त्यांचे रुपडे बदलण्यामध्ये काही दिग्दर्शकांचा मोठा वाटा आहे. याच दिग्दर्शकांमधील महत्वाचे नाव म्हणजे रवी जाधव.

रवी जाधव हे नाव उच्चारताच डोळ्यासमोरून नटरंग, बालगंधर्व, टाईमपास अशी हिट आणि दर्जेदार चित्रपटांची झलक सरकन जाते. या प्रवाहाबाहेर विचार करून आपला सिनेमा साकारणार रवी जाधव आज मराठीमधील हिट चित्रपटांच्या निर्मितीसाठी ओळखले जातात. आज (२२ सप्टेंबर) रवी जाधव त्यांचा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याबद्दल अधिक माहिती.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांचा जन्म २२ सप्टेंबर १९६६ रोजी मुंबईतील एका अतिशय सामान्य कुटुंबात झाला. त्यांनी जे. जे. स्कुल ऑफ आर्टमधून ग्राफिक डिझाइनमध्ये पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी एका मोठ्या जाहिरात एजेन्सीमध्ये क्रिएटिव्ह दिग्दर्शक आणि कॉपी रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर नशिबाने त्यांना चित्रपटाची वाट दाखवली आणि त्यांनी २००९ साली सुपरहिट अशा ‘नटरंग’ सिनेमातून दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले.

डॉ आनंद यादव यांच्या कथेवरून रवी जाधव यांनी ‘नटरंग’ चित्रपटाची निर्मिती केली. हा सिनेमा एका म्युझिकल सिनेमा म्हणून देखील ओळखला जातो. जेवढे प्रेम प्रेक्षकांनी या चित्रपटावर केले तेवढेच प्रेम या सिनेमातील गाण्यांवर केले. या सिनेमातील लावण्यांनी तर लोकप्रियेचे शिखर गाठले. आज चित्रपटाच्या इतक्या वर्षांनी देखील या सिनेमातील गाणी तेवढीच लोकप्रिय आहे. या सिनेमाला प्रेक्षक आणि समीक्षक दोघांनीही भरभरून दाद दिली. सोबतच सिनेमांवर अनेक लहान मोठ्या पुरस्कारांचा वर्षाव झाला. या चित्रपटात त्यांनी तमाशावर प्रेम असलेल्या ग्रामीण भागातील एका रांगड्या गड्याचा तमाशातील चढ-उतारांनी भरलेला प्रवास दाखवला आहे. या सिनेमानंतर त्यांच्या यशाची घोडदौड सुरू झाली.

रवी जाधव यांचा २०११ साली नारायण श्रीपाद राजहंस उर्फ बालगंधर्व यांच्यावर आधारित एका बायोपिक सिनेमा आला ‘बालगंधर्व.’ नटरंग प्रमाणे या सिनेमाने देखील यशाचे आणि लोकप्रियतेची उंची गाठली. या सिनेमातून त्यांनी अक्षरशः बालगंधर्व यांचे जीवन चरित्र उभेउभ प्रेक्षकांपुढे सादर केले. या सिनेमाला अनेक राष्ट्रीय आणि आंतराराष्ट्रीय पुरस्करांनी सन्मानित करण्यात आले.

बालक-पालक या सिनेमानंतर तर रवी जाधव यांना हुकुमाचा इक्का देखील संबोधले जाऊ लागले. हिट सिनेमांची हॅट्ट्रिक देणाऱ्या रवी जाधव यांच्या प्रत्येक सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कारने सन्मानित केले गेले. बालक-पालक या सिनेमातून रवी जाधव यांनी लैंगिक प्रबोधन हा नाजूक विषय अतिशय उत्तम पद्धतीने मांडला. त्यानंतर त्यांनी ‘रेगे’, कॉफी आणि बरेच काही’, ‘रंपाट’, ‘टाइमपास’, ‘टाइमपास २’, ‘न्यूड’ आदी अनेक सिनेमांचे दिग्दर्शन केले. त्यांनी २०१६ साली ‘बँजो’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण केले. एका उत्कृष्ट दिग्दर्शक असण्यासोबतच ते निर्माते, पटकथा लेखक आणि अभिनेते देखील आहे. २०१७ साली प्रसाद ओकच्या ‘कच्चा लिंबू’ सिनेमात मुख्य भूमिका साकारून त्यांनी सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला. त्यांचा या सिनेमातील अभिनय अतिशय वाखाण्याजोगा होता.

रवी जाधव यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर, तर त्यांनी मेघना जाधव यांच्याशी लग्न केले आहे. मेघना ह्या रवी यांच्या मित्राची बहीण. मित्राला भेटायला नेहमी त्याच्या घरी जाणारे रवी यांचे मित्राच्या बहिणीसोबत मेघनासोबत प्रेमसंबंध जुळले आणि त्यांनी १४ फेब्रुवारीला रवी जाधव यांनी मेघना यांना प्रपोज केले होते. त्यानंतर एक महिन्याने मेघना यांनी होकार दिला.

रवी जाधव यांना मेघना यांच्याशी लग्न करायचे होते, मात्र त्यासाठी मेघना यांच्या वडिलांना रवी जाधव यांच्यासमोर मेघनाशी लग्न करण्यासाठी स्वतःचे घर घेण्याची अट ठेवली. ही अट मान्य करत रवी जाधव यांनी खूपच कष्टाने आणि काटकसर करून स्वतःचे घर तयार केले आणि मेघना यांच्याशी लग्न केले. आज मेघना या रवी जाधव यांच्या प्रोडक्शन कंपनीमध्ये फिल्म प्रोडक्शन, मीडियाची जबाबदारी सांभाळतात. आज रवी जाधव यांना दोन मुले आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा- ‘मला तुमचं ऐकायचं आहे…’, मुख्यमंत्र्यांनी मराठी कलाकारांशी साधला संवाद, ‘हे’ होते खास कारण
राजू श्रीवास्तव यांच्या मुलीला मनमोहन सिंग यांच्या हस्ते मिळालेला शौर्य पुरस्कार, वाचा नक्की काय झालेलं?
शाहरूख खानच्या मुलीची भूमिका साकारलेली अंजली झालीये खूपच ग्लॅमरस, एकदा पाहाच

 

हे देखील वाचा