Friday, March 29, 2024

अशी अभिनेत्री होणे नाही! अडीच वर्षात २१ हिट सिनेमे; अठराव्या वर्षी लग्न तर एकोणिसाव्या वर्षी मृत्यू, तरीही आजही आहे स्मरणात

दिव्या भारती हिंदी सिनेसृष्टीतील सर्वात सुंदर अभिनेत्री. वयाच्या १५ व्या वर्षी मोठ्या पडद्यावर एन्ट्री घेणाऱ्या दिव्याने खूपच कमी काळात तिची मोठी आणि मजबूत ओळख निर्माण केली. दिव्याचे करियर खूप मोठे नव्हते, मात्र तिने या छोट्या करियर मधेच तिचे स्थळ स्थान या इंडस्ट्रीमध्ये आणि प्रेक्षकांच्या मनामध्ये तयार केले. ज्या ९० च्या दशकात माधुरी दीक्षित, श्रीदेवी, जुही चावला, रविना टंडन आदी मोठ्या अभिनेत्रीचा बोलबाला होता, त्याच काळात दिव्याने तिची वेगळी ओळख तयार केली. आज दिव्याची ४८ वी जयंती. २५ फेब्रुवारी १९७४ साली दिव्याचा जन्म मुंबईमध्ये  झाला. दिव्याने १९९० साली ‘बॉबली राजा’ या तेलगू सिनेमातून अभिनयात पदार्पण केले. आज तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया तिच्या छोट्या मात्र अविस्मरणीय कारकिर्दीबद्दल.

१९९०-१९९१ या एका वर्षात दिव्याने ५ तामिळ आणि तेलगू चित्रपटांमध्ये काम केले. तिने १९९२ साली ‘विश्वात्मा’ सिनेमातून हिंदीमध्ये पदार्पण केले. या सिनेमात तिने सनी देओलच्या नायिकेची भूमिका साकारली होती. या सिनेमात तिची दखल घेतली गेली, सोबतच तिचे ‘सात समंदर पार’ हे गाणे तुफान गाजले. तिचा या सिनेमातील अभिनय पाहून तिला अनेक हिंदी सिनेमांच्या ऑफर आल्या. १९९२ साली दिव्याने गोविंदासोबत ‘शोला और शबनम’ हा सुपरडुपर हिट सिनेमा दिला. त्यानंतर तिने लागोपाठ अनेक हिट सिनेमे दिले, त्यात दिवाना, दुश्मन जमाना, गीत, दिल ही तोह हैं, जान से प्यारा, बलवान आदी हिट सिनेमे दिले.

दिव्या ज्या वेगात पुढे जात होती आणि सिनेमे साईन करत होती त्या वेगामुळे अनेक अभिनेत्री चक्रावून गेल्या होत्या. १९९२ या एका वर्षात तिचे १० सिनेमे प्रदर्शित झाले. दिव्याने चित्रपट फक्त साईन करायचे म्हणून केले असे नाही तर तिने या सिनेमांमध्ये दमदार अभिनय करत प्रेक्षक आणि समीक्षक यांना देखील कौतुक करायला भाग पाडले. हिंदीमध्ये ती काम करत असतानाच साऊथ इंडस्ट्रीमध्ये देखील काम करतच होती.

असे असताना १९९३ साल उजाडले, या वर्षाची तिची सुरुवात अतिशय धमाकेदार झाली. नवीन वर्षाच्या सुरुवातीला तिचा ‘थोली मुदधु’ सिनेमा प्रदर्शित झाला आणि हिट झाला. याच वर्षी तिचे हिंदीमध्ये ३ सिनेमे प्रदर्शनासाठी सज्ज होते. यातला क्षत्रिय सिनेमा २६ मार्चला प्रदर्शित झाला, आणि पुढच्या आठच दिवसात दिव्याच्या मृत्यूची बातमी समोर आली. या बातमीने सर्वांनाच जबरदस्त शॉक बसला. वयाच्या १९ वा वर्षी दिव्या बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये गणली गेली. तिच्या निधनांनंतर ९ महिन्यांनी शतरंज आणि रंग सिनेमे प्रदर्शित झाले.

वयाच्या १९ व्या वर्षीच या जगाचा निरोप घेणाऱ्या दिव्याने तसे पाहिले तर एवढ्याश्या वयातच संपूर्ण आयुष्य जगून घेतले होते. कारण याच वयात ती एक यशस्वी अभिनेत्री म्हणून समोर आली, याच वयात तिने नाव कमावले, पैसे कमावले, प्रसिद्धी कमावली आणि मुख्य म्हणजे तिने लग्न करून वैवाहिक आयुष्य देखील जगली. अनेक अभिनेत्री एवढे सगळे मिळवायला संपूर्ण आयुष्य खर्च करतात. मात्र दिव्या सर्वात वेगळी होती. तिच्या मृत्यूपूर्वी ती अनेक सिनेमांवर काम करत होती, तिच्या निधनानंतर तिचे सिनेमे दुसऱ्या अभिनेत्रींना घेऊन पूर्ण करण्यात आले. याच दिव्याचा अंत देखील इमारतीवरून पडून अचानक आणि रहस्यमयी पद्धतीने झाला. आजही तिच्या मृत्यूचे कोडे उलगडलेले नाही.

हे देखील वाचा