Friday, March 29, 2024

लैंगिक अत्याचार प्रकरणात गणेश आचार्यबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय, महिला डान्सरने लावलेले गंभीर आरोप

बॉलिवूडमधून मोठी बातमी समोर येत आहे. बॉलिवूड अभिनेत्यांना आपल्या इशाऱ्यांवर नाचवणारा प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य याला दिलासा मिळाला आहे. त्याला लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात जामीन मिळाला आहे. मुंबईच्या एका न्यायालयाने त्याला गुरुवारी (दि. २३ जून) जामीन दिल्यानंतर त्याने सुटकेचा निश्वास सोडला आहे.

खरं तर हे प्रकरण सन २०२० दरम्यानचं आहे. एका डान्सर महिलेने कोरिओग्राफर गणेश आचार्य (Choreographer Ganesh Acharya) याच्याविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा (Sexual Harassment Case) दाखल केला होता. यानंतर पोलिसांनी आचार्यविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. कोरिओग्राफर गणेश आचार्य गुरुवारी न्यायालयासमोर हजर झाला, यानंतर त्याला न्यायालयाने जामीन देत दिलासा दिला.

काय होता महिलेचा आरोप
महिलेने असाही आरोप लावला होता की, सन २००९-१०मध्ये जेव्हाही ती आचार्यच्या ऑफिसमध्ये गेली, तेव्हा तिला तिथे अश्लील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रवृत्त केले गेले. तसेच, याला नकार दिला असता, तिला त्रास देण्यास सुरुवात केली गेली. यासोबतच महिलेने सांगितले की, यामुळेच सहा महिन्यांनंतर भारतीय फिल्म आणि टेलिव्हिजन कोरिओग्राफर असोसिएशनमार्फत तिचे सदस्यत्वही काढण्यात आले. महिलेने असाही आरोप लावला की, आचार्यने इतर महिलांचेही लैंगिक शोषण केले आहे. तसेच, तिने आरोप लावला होता की, २६ जानेवारी, २०२० रोजी अंधेरीच्या कोरिओग्राफर्स असोसिएशनच्या एका कार्यक्रमादरम्यान तिला इतर दोन लोकांसोबत मिळून मारहाणही करण्यात आली होती.

आचार्यला झाली नाही अटक
यावर्षी एप्रिल महिन्यात मुंबई पोलिसांनी आचार्यवर इतर आरोपांसोबतच लैंगिक अत्याचाराचा आरोप लावला होता. या प्रकरणात आचार्यला कधीही अटक झाली नाही. गुरुवारी (दि. २३ जून) तो न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर झाल्यानंतर त्याला जामीन मंजूर करण्यात आला.

या कलमांतर्गत पोलिसांनी दाखल केला होता गुन्हा
पोलिसांनी महिलेच्या तक्रारीनंतर आचार्यविरुद्ध ३५४-ए, ३५४-सी, ३५४-डी आणि ५०६, ५०९ या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. मात्र, आचार्यने त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळले.

आचार्यची कारकीर्द
गणेश आचार्य ५१ वर्षांचा असून त्याने नव्वदच्या दशकात कोरिओग्राफर कमलजी यांचा सहाय्यक म्हणून काम सुरू केले होते. त्याने १९९२मध्ये ‘अनाम’ या आपल्या पहिल्या सिनेमात काम केले होते. मात्र, २००१मध्ये आलेल्या ‘लज्जा’ या सिनेमातील ‘बडी मुश्किल’ या गाण्यामुळे त्याला प्रसिद्धी मिळाली. त्याने कोरिओग्राफीसोबतच अनेक सिनेमातही आपल्या अभिनयाची जादू दाखवली. त्यात ‘एबीसीडी’, ‘एबीसीडी २’, ‘देहाती डिस्को’, ‘भिकारी’, ‘स्वामी’ यांसारख्या सिनेमांचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा