आदित्यराजे मराठे प्रॉडक्शनस व साँग सिटी मराठी निर्मित पहिलं गीत ‘डेरिंगबाज’ महाराष्ट्रातील लोकप्रिय चॅनेल संगीत मराठी प्रस्तुत करणार आहे. आदित्यराजे मराठे प्रोडक्शन्स आजपर्यंतच्या यशानंतर प्रथमच साँग सिटी मराठी यांच्या सहयोगाने ‘डेरिंगबाज’ हे नव्या धाटणीचे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत. या गाण्यात प्रमुख भूमिका आदित्यराजे मराठे यांची असून या गीताचे दिग्दर्शन साईनाथ पाटोळे यांनी केले आहे, तर गीतकार राहुल सूर्यवंशी हे आहेत.
सामाजिक विषयावर आधारित असलेल्या या गीताच्या लाँचसाठी शुक्रवारी (१९ फेब्रुवारी) पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी संगीत मराठी वाहिनीचे सर्वेसर्वा दिपक देऊलकर, आदित्यराजे मराठे प्रोडक्शन्सचे अध्यक्ष आदित्यराजे मराठे, दिग्दर्शक साईनाथ पाटोळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री दिपक देऊलकर म्हणाले, “साँग सिटी मराठी बरोबर आदित्यराजे मराठे प्रोडक्शन यांची ही पहिली निर्मिती असून भविष्यात अनेक नवे प्रोजेक्ट्स सोबत करण्याचे योजिले आहे. मराठीत ॲक्शन गीत येत असल्यामुळेंही निर्मिती करणे धाडसाचे काम होते, ते आदित्यराजे आणि त्यांच्या टीमने केले आहे. मराठी गीत, संगीताला मोठी परंपरा लाभलेली आहे, तेव्हा एकाच पद्धतीची व रिदमची गीतं न करता वेगवेगळ्या जॉनरची गाणी केल्यास प्रेक्षकांना तर मेजवानी मिळेलच, पण म्युझिक इंडस्ट्रीला पुन्हा चांगले दिवस येतील.”
तसेच संगीत मराठी चॅनेलवर गाणी लावण्यासाठी कोणत्याही एजंटची किंवा मध्यस्थांची गरज नाही. तसेच निर्माते, दिग्दर्शक, गीतकार, संगीतकार, गायक, कलाकार आणि म्युझिक कंपन्या यांनी थेट संगीत मराठीशी संपर्क साधावा, त्यांचे स्वागत आहे, असेही दिपक देऊलकर म्हणाले.
“ऍक्शन ही केवळ चित्रपटांत बघायला मिळते असं नव्हे, तर डेरिंगबाज या गीतात ऍक्शन, डान्स व रोमान्सही बघायला मिळणार आहे. या गीतातील नायक समाजातील दुष्ट व खल प्रवृत्तींना वटणीवर आणण्यासाठी डेरिंगबाज होऊन जशाच तसे उत्तर देतो, ही या गाण्याची थीम आहे. हे गाणं अतिशय सुंदररीत्या शूट करण्यात आलं असून लोकांच्या पसंतीस उतरेल, अशी आशा आहे,” असे ऍक्शनबद्दल बोलताना देऊलकर म्हणाले.
हे गीत लवकरच संगीत मराठी वाहिनीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या गीताला आदित्यराजे मराठे प्रोडक्शन, साईनाथ पाटोळे आणि त्यांच्या टीमने नावीन्यपूर्ण पद्धतीने प्रत्यक्षात उतरवले आहे. हा अनुभव नक्कीच प्रेक्षकांना भुरळ पाडेल, अशी आशा संगीत मराठीचे सर्वेसर्वा दिपक देऊलकर यांना आहे.
दीपक देउलकर व आदित्यराजे मराठे म्हणाले की, भविष्यात महाराष्ट्रातील नवीन कलाकारांना सोबत घेऊन, साँग सिटी मराठी व आदित्यराजे मराठे प्रोडक्शन तर्फे एकत्र मिळून अनेक चित्रपट, मालिका, लघुचित्रपट, व्हिडियो अल्बम घेऊन येण्याचा मानस आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-शिवजयंती विशेष: शिवाजी महाराजांच्या भूमिका अजरामर करणारे ५ कलाकार तुम्हाला माहित आहेत काय?