Tuesday, September 26, 2023

वर्षाकाठी 25 कोटी छापते कॅटरिना, ‘इतक्या’ कोटींची आहे मालकीणबाई; चार वर्षे ठरलीये आशियाची मादक अभिनेत्री

बॉलिवूड किंबहुना संपूर्ण भारतीय सिनेसृष्टी सर्वांसाठीच खुली आहे. या इंडस्ट्रीने कधीच आपले आणि परके असा भेदभाव केला नाही. फक्त आणि फक्त प्रतिभेला महत्व दिले. भारतीय मनोरंजनाच्या क्षेत्रात असे अनेक कलाकार आहेत, जे परदेशातून भारतात फक्त सिनेसृष्टीमध्ये करियर करण्यासाठी आले. यातले काही यशस्वी झाले तर काहींना संघर्ष, प्रयत्न करूनही अपयशच मिळाले. अशा या कलाकारांच्या यादीतले एक नाव म्हणजे कॅटरिना कैफ. आज हिंदी चित्रपटसृष्टीतील कॅटरिना कैफ हे नाव एक ब्रँड म्हणून ओळखले जाते. मात्र कॅटरिनाचा हा प्रवास आपल्याला वाटतो तितका सोपा आणि साधा नव्हता. मोठ्या संघर्षाने कॅटरिनाने सुपरहिट अभिनेत्रीचा किताब मिळवला आहे. रविवारी (दि. 16 जुलै) ती तिचा 39वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्या संदर्भातील काही महत्वाच्या गोष्टी.

कॅटरिना कैफचा जन्म 16 जुलै, 1983 साली हॉंगकॉंगमध्ये झाला होता. तिची आई सुजैन ब्रिटिश, तर वडील मोहम्‍मद कैफ काश्मीरचे आहेत. कॅटरिनाचे मूळ नाव कॅटरिना टरकोटे होते. मात्र, ‘बुम’ चित्रपटाच्यावेळी आयेशा श्रॉफ यांनी तिचे नाव बदलून कॅटरिना कैफ केले. तिचे कुटुंब खूप मोठे असून, तिला तीन मोठ्या, तर तीन लहान बहिणी आणि एक मोठा भाऊ आहे. कॅटरिनाने खूपच कमी वयात मॉडेलिंगच्या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. केवळ 14 वर्षांची असताना तिने हवाईमध्ये एका सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला व ती जिंकली. त्यानंतर तिने काही फ्रीलान्सिंगच्या प्रोजेक्टसाठी देखील काम केले.

अभिनयाच्या क्षेत्रात करियर करण्याच्या दृष्टीने कॅटरिना भारतात आली. सुरुवातीला अनेक प्रयत्न करूनही तिला काम मिळत नव्हते. तिने हळूहळू मॉडलिंगमध्ये काम सुरू केले. मात्र, असे असूनही तिने चित्रपटांसाठी तिचे प्रयत्न सोडले नाही. 2003 साली तिला ‘बूम’ या सिनेमासाठी साईन केले गेले. या सिनेमात ती खूप बोल्ड अवतारात दिसली. मात्र, याचा सिनेमाला हिट करण्यासाठी कोणताही फायदा झाला नाही. हा सिनेमा सपशेल आपटला.

पुढे तिला दाक्षिणात्य चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. तिने तेलुगू सिनेमा ‘मल्‍लीस्‍वरी’मध्ये काम केले. 2005 साली तिला मल्याळम सिनेमा ‘अलारी पेडगू’ सिनेमात काम मिळाले. त्यानंतर ती ‘सरकार’ सिनेमात अगदी छोट्या भूमिकेत दिसली. तेव्हाच तिला डेव्हिड धवन यांच्या ‘मैने प्यार क्यों किया’ चित्रपटात दुसरा महत्वाचा रोल मिळाला. या चित्रपटात ती सलमान खानसोबत झळकली. सुदैवाने हा सिनेमा तुफान गाजला आणि कॅटरिनाला देखील मोठी ओळख आणि प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही.

या चित्रपटानंतर ती ‘नमस्ते लंडन’, ‘राजनीती’, ‘जब तक हैं जान’, ‘अजब प्रेम की गजब कहाणी’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’, ‘मेरे ब्रदर की दुल्हन’, ‘पार्टनर’, ‘सिंग इज किंग’,’रेस’ आदी चित्रपटांमध्ये झळकली. सुरुवातीला कॅटरिना कैफवर प्रचंड टीका झाली. तिला हिंदी येत नसल्याने तिला खूप ट्रोल केले गेले. सुरुवातीच्या काही सिनेमात तिचा आवाज डब केला गेला. मात्र, तिने देखील चिकाटीने हिंदी शिकण्यास सुरुवात केली आणि आज ती खूप चांगली हिंदी बोलते. कॅटरिना तिच्या सौंदर्यासोबतच डान्ससाठी देखील ओळखली जाते. तिने तिच्या डान्सने अनेक हिट आयटम नंबर्स दिले आहेत.

कॅटरिना कैफने अक्षय कुमार आणि सलमान खानसोबत सर्वाधिक सिनेमे केले. कॅटरिना ही पहिली अशी अभिनेत्री आहे जिच्यावर ‘बार्बी डॉल’ बनवण्यात आली आहे. कॅटरिनाला सर्वाधिक चार वेळा आशियातील सर्वात मादक अभिनेत्रीचा किताब मिळाला आहे. सुरुवातीच्या काळात अती संघर्ष करणारी कॅटरिना आज जवळपास 217 कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकीण आहे. एका रिपोर्टनुसार ती वर्षाला 25 कोटींपेक्षा अधिक रुपये कमावते.

चित्रपटांसोबतच कॅटरिना जाहिरातींमधूनही भरपूर पैसे कमावते. कॅटरिनाच्या संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर, कॅटरिना एक आलिशान जीवन जगते. तिच्याकडे बांद्रामध्ये 8 कोटींचे एक अपार्टमेंट आहे, एक पेंटहाऊस, लोखंडवाला मध्ये 17 कोटीचे अपार्टमेंट आणि ७ कोटी रुपयांचा लंडनमध्ये एक बंगला आहे. सोबतच तिच्याकडे अनेक मोठ्या गाड्या देखील आहे. ज्यात 42 लाख ऑडी क्यू 3,50 लाख रुपयांची मर्सिडीज बेंज आणि 80 लाख रुपयांची ऑडी क्यू 7 गाड्यांचा समावेश आहे. एका वेबसाईटनुसार कॅटरिनाकडे 224 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

कॅटरिना कैफ तिच्या लव्हलाइफमुळे देखील खूप चर्चेत आली आहे. तिचे नाव सलमान खानसोबत खूप गाजले होते. ते दोघं लवकरच लग्न करतील, अशा देखील बातम्या येत होत्या. मात्र, असे काहीच घडले नाही. कॅटरिनाचे नाव रणबीर कपूरसोबत देखील घेतले गेले, पण त्यांचे देखील पुढे ब्रेकअप झाले. कॅटरिनाने नंतर अभिनेता विकी कौशल याच्यासोबत 9 डिसेंबर, 2021 रोजी संसार थाटला होता.

अधिक वाचा- 
– धक्कदायक! मराठी इंडस्ट्रीमधील ‘हा’ प्रतिभावान होता कॅन्सरग्रस्त, चुकीच्या उपचारांमुळे अधिक बळावला होता आजार
“कित्येक रात्री डोळ्यात पाणी…” बाईपण…च्या यशानंतर केदार शिंदेची ‘त्या’ खास दोन व्यक्तींसाठी केलेली पोस्ट व्हायरल

हे देखील वाचा