मराठी मनोरंजनविश्वातील अतिशय दिग्गज आणि प्रभावी अभिनेते म्हणून अतुल परचुरेला ओळखले जते. विनोदी अभिनेत्याची ओळख कमावलेल्या अतुलने सर्वच प्रकारच्या भूमिका अगदी दमदार पद्धतीने साकारल्या. मागील अनेक दशकांपासून इंडस्ट्रीमध्ये काम करणारा अतुल सध्या अचानक प्रकाशझोतात आला आहे. मात्र यामागचे कारण खूपच धक्कादायक आहे. मधल्या काही काळापासून मनोरंजनविश्वातून गायब झालेला अतुल परचुरे कॅन्सरने ग्रस्त होता. आता तो यातून बरा होत असून, नुकतेच एका मुलाखतीदरम्यान त्याने याबद्दल खुलासा केला आहे.
अतुल परचुरेने सांगितले, “माझ्या लग्नाला २५ वर्ष पूर्ण झाली, आणि मी, सोनिया आम्ही ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडला फिरायला गेलो होतो. मात्र तिथे गेल्यानंतर मला जाणवले की मला जेवावेसे वाटत नाहीये. मी काही औषध घेतली. पण त्याचा उपयोग झाला नाही. माझी प्रकृती अधिक खालावत होती. मला वाटले कावीळ झाली असेल.”
Instagram पर यह पोस्ट देखें
पुढे अतुल म्हणाला, “मी डॉक्टरांकडे गेलो. तेव्हा डॉक्टरांनी मला अस्ट्रासोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. ते चालू असताना डॉक्टरांच्या चेहऱ्यावरील भाव मला खूप काही सांगून जात होते. ही कावीळ नसून काहीतरी अधिक गंभीर असल्याचे मला जाणवले. तेव्हा डॉक्टरांच्या डोळ्यांमध्ये मला भीती दिसत होती. डॉक्टरांनी मला लिव्हरमध्ये ट्युमर असल्याचे सांगितले. मी डॉक्टरांना बरा होईल ना विचारले त्यांनी देखील मला दिलासा दिला आणि ठिक होईल असा विश्वास दाखवला.”
मात्र अतुल परचुरेने सांगितले की, सुरुवातीला त्याच्यावर चुकीचे उपचार झाले आणि तो अधिक खालावला. हे सांगताना तो म्हणाला, “माझ्यावर उपचार सुरु झाले मात्र उपचाराच्या सुरुवातीला चुकीच्या उपचारांमुळे माझी प्रकृती आणखी बिघडली. चालताही येत नव्हते. पुढे डॉक्टरांनी काही महिने थांबण्याचा सल्ला दिला. आम्ही डॉक्टर बदलले आणि मग पुन्हा नव्याने माझ्यावर उपचार चालू झाले. किमोथेरपी, सर्जरी सर्व चालू होत्या. या दरम्यान माझे कुटुंब, मित्र सर्वच माझ्या सोबत अगदी सावली सारखे उभे होते.”
पुढे अतुल म्हणाला, “मला माझ्या या संकटकाळी इंडस्ट्री आणि इंडस्ट्रीबाहेरच्या मित्र-मैत्रिणींनी खूप मदत केली सतत धीर दिला. “आमचा नंबर तुझ्याकडे आहे तू फक्त मेसेजमध्ये अमाउंट टाक फक्त…दहाव्या मिनिटाला २५ काय.. ५० लाख उभे करू आर्थिक मदतीबद्दल तर अनेकांनी न सांगता मदत केली मात्र सुदैवाने मला याची गरज पडली नाही.”
अतुल परचुरेने या मुलाखतीमध्ये त्याच्या या मोठ्या लढाईबद्दल अतिशय विस्तृत माहिती दिली. या प्रवासात अनेक चढ उतार आले, मात्र सर्वांच्या साथीने त्याने ही लढाई जिंकली आहे. या दरम्यान त्याने नाना पाटेकरसोबत आयपीएलचा सामना देखील पहिला होता.