Tuesday, April 16, 2024

वाढदिवस विशेषः अवघ्या महाराष्ट्राला ‘याड’ लावणाऱ्या नागराज मंजुळेंचा थक्क करणारा प्रवास

आज मराठी सिनेमे साता समुद्रापार झेंडे गाडत आहे. मराठी सिनेमांनी कात टाकली हे तर आपल्याला माहीतच आहे. मात्र मराठी चित्रपटांना नवीन अर्थ, नवीन रूप देण्यामध्ये अनेक मोठ्या दिग्दर्शनाचा वाटा आहे. पूर्वीच्या चित्रपटांपेक्षा वेगळे आशयसंपन्न, पठडीबाहेरील आणि सत्य परिस्थितीवर आधारित सिनेमे हे आजच्या चित्रपटांचे वैशिष्ट्य आहे. मराठी चित्रपटांना नवीन आणि मोठी ओळख देण्यामध्ये त्यांचे रुपडे पालटण्यामध्ये सर्वात मोठे योगदान आहे ते दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचे. सैराट चित्रपटामुळे घराघरामध्ये हे नाव पोहचले. संपूर्ण महाराष्ट्रासोबतच देशाला याड लावणाऱ्या या दिग्दर्शकाचा आज वाढदिवस.

नागराज यांचा जन्म 24 ऑगस्ट 1977 रोजी सोलापूर जिल्ह्यातल्या जेऊर या छोट्या गावात झाला. त्यांना शाळेत जायचा खूप कंटाळा यायचा. ते शाळेत जायच्या नावाखाली घरातून निघायचे आणि व्हिडिओ सेंटरमध्ये जायचे. तिथे त्यांनी असंख्य सिनेमे बघून काढले. ते कॅरम, क्रिकेट, बास्केटबॉल, बुद्धिबळ या खेळात खूप हुशार होते. 10वी मध्ये नापास झाल्यानंतर त्यांना वाचनाची गोडी लागली. या वाचनात त्यांनी एकात एक असे मराठी, हिंदी, इंग्लिश अशा अनेक लेखकांची पुस्तकं त्यांनी वाचली. त्यानंतर त्यांनी पुन्हा दहावी देण्याचे ठरवले, आणि भाषा विषयांच्या उत्तरांसोबत त्याने गणितं देखील पाठ केले आणि परीक्षा देत कसेबसे ते पास झाले. पुढे त्यांनी आर्ट्समध्ये पदवी आणि पदव्युत्तर पदवी संपादन केली. त्यांनी पत्राकरितांमध्ये देखील पदवी घेतली. त्यावेळेस खरा त्यांच्या थेट संबंध चित्रपटांशी आला.

नागराज स्वतः दलित असल्याने त्यांनी या लोकांना खूप जवळून पाहिले, त्यांच्या समस्या त्यांचे गुण आदी गोष्टी समाजापुढे आणायच्या दृष्टीने त्यांनी ‘पिस्तुल्या’ हा लघुपट तयार केला आणि या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. या चित्रपटामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी ‘फेंड्री’ सिनेमा लिहिला. या चित्रपटाची कथा सर्वांना खूपच आवडली मराठीसोबतच बॉलिवूडमधील अनेक मोठे निर्माते देखील या सिनेमासाठी तयार झाले होते. 2014 साली हा सिनेमा तयार झाला आणि तुफान हिट झाला. देशात नाही तर परदेशातही या चित्रपटाने खूप वाहवा मिळवली. त्यांच्या मताने हा सिनेमा किंवा अशाप्रकारचे सिनेमे खरा भारताच्या चित्रपटांचा चेहरा होता.

या सिनेमानंतर तर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. त्याच्यात एक असा गुण होता की, ते जगाला वेगळ्या नजरेतून बघतात. किंबहुना सामान्य माणसाची जगाला बघण्याची नजर जिथे थांबते तिथून नागराज जगाला बघयला सुरुवात करतात. त्यामुळेच त्यांनी प्रवाहाच्या विरुद्ध त्यांच्या कलाकृती तयार केल्या. मराठीसाठी नेहमी अशक्य असणारे सर्वात मोठे आव्हान नागराज मंजुळेंच्या ‘सैराट’ने अगदी लीलया करून दाखवले. ते म्हणजे मराठी चित्रपटाची 100 कोटीची कमाई. त्यांचे सिनेमे तर नक्कीच वेगळे राहिले, सोबतच त्यांच्या चित्रपटातील कलाकार देखील वेगळेच होते. त्यांना सामान्य लोकांमधून कलाकार निवडण्याची अचूक नजर आहे. अनेक सामान्य लोकांना त्यांनी चित्रपटांमध्ये आणले आणि सेलेब्रिटी केले. रिंकू राजगुरू, आकाश ठोसर, श्रीनिवास पोकळे आदी अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. अतिशय हुशार दिग्दर्शक असणाऱ्या नागराज मंजुळे यांनी ‘नाळ’ या सिनेमातून त्यांच्यातल्या प्रतिभावान अभिनेत्याचे देखील दर्शन सर्वांना घडवले.

नागराज यांच्या मते सिनेमातील गाणी कथेला किंवा प्रेक्षकांच्या सिनेमा बघताना लागलेल्या लिंकला मधेच तोडतात. मात्र सिनेमात गाणी नसतील तर लोकांना ते देखील आवडत नाही. त्यांनी असच एक अनुभव फॅन्ड्री सिनेमाबद्दलच सांगितला की, “माझ्या या सिनेमात पिरतीचा विंचू हे गाणे अजय अतुल यांनी फक्त प्रमोशनसाठी तयार केले होते. आम्ही आमच्या अनेक मुलाखतीमध्ये या गाण्याबाबद्दल सांगितले की हे गाणे सिनेमात नसून ते फक्त प्रमोशनल सॉन्ग आहे. मात्र सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर या गाण्यावरून अशा काही घटना घडल्या जे ऐकून आम्ही स्तब्ध झालो. लोकांनी चित्रपटगृहाच्या मालकांना सिनेमात गाणे दाखवले नाही म्हणून मारहाण केली, चित्रपटगृहांवर दगडफेक केली. तेव्हा मला जाणवले की, सिनेमात गाणी प्रेक्षकांच्या दृष्टीने खूप महत्वाची आहेत. सैराटच्या वेळी मग मी सिनेमात गाणी अशी ऍड केली की, ज्यामुळे सिनेमाच्या कथेला धक्का लागणार नाही.”

नागराज जितके उत्तम दिग्दर्शक, अभिनेते आहेत तितकेच ते प्रभावी कवी देखील आहे. त्यांचा ‘उन्हाच्या कटाविरुद्ध’ हा कवितासंग्रह प्रकाशित केला गेला. त्यांच्या ‘उन्हाच्या कटाविरुद्ध’ या कवितासंग्रहाला दमाणी साहित्य पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय २०१४ मध्ये नारायण सुर्वे काव्य प्रतिभा पुरस्कार आणि दया पवार स्मृती पुरस्कार मिळाले आहेत. याबद्दल त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते, ”कविता करताना मला माझ्याच जगण्याच्या त-हा, माझ्या अवतीभोवतीची माझीच माणसे यांबद्दल मला शब्दांमध्ये मांडता यायला लागले. मी दैनंदिनी लिहायचो. मला व्यक्त होण्याची खूप गरज आहे. लोकांनी वाचलं, नाही वाचलं, यापेक्षा माझ्यासाठी माझे अभिव्यक्ती स्वातंत्र्य महत्त्वाचे. हेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य मला जगण्यासाठी ताकद देते. गालिब, मर्ढेकर, कुसुमाग्रज, नामदेव ढसाळ, अरुण कोलटकर, दुष्यंतकुमार आदी अनेक कवी मला खूप आवडतात. नामदेव ढसाळांचे बंडखोर लिखाण जसे मला आवडते तसे गालिब सुद्धा मला अंतर्मुख करायला आणि माझ्या मनाला भावतात. लहानपणापासून मी मिळतील ती पुस्तके वाचली वृत्तपत्र जाहिरातींसह वाचले. माझ्यात कविता आपोआप मुरत गेली. मला माझ्या कवितांमध्ये कोणाचेही अनुकरण करायचे नव्हते. माझ्याकडे माझेच सांगायला खूप काही होते. दत्ता हलसगीकर, नागनाथ कोत्तापल्ले यांसारख्या दिग्गजांनी माझ्या कवितांचे आणि लिखाणाचे कौतुक करत माझ्या कवितेला प्रोत्साहन दिले. उन्हातान्हात रापलेले माझे जगणे, मला मांडता येत होते. उपेक्षितांच्या गर्दीतून या अभिव्यक्तीमुळेच मी तरून वर आलो. ‘उन्हाच्या कटाविरुद्ध’ हा कवितासंग्रह याच ऊर्मीतून तयार झाला. मी माझ्या कवितांमध्ये कारण नसताना अलंकारिकता, प्रतिमा, उपमा वापरली नाही. जे काही आहे जसे आहे ते थेट व्यक्त केले.”

आम्ही दोघे मित्र
एकमेकांचे जिवलग
एकच ध्येय एकच स्वप्न घेऊन जगणारे
पुढे त्याने आत्महत्या केली
आणि मी कविता लिहिली

नागराज यांच्या कविता वाचताना मनाला पोखरून काढतात विचार करायाला लावतात. आजच्या परिस्थितीशी अतिशय साधर्म्य असलेल्या त्यांच्या कविता देखील खूप प्रसिद्ध आहे.

त्यांना त्यांच्या भाषेवरून अनेकदा लोकांच्या हास्याचा सामना करावा लागला. मात्र ते नेहमी म्हणतात गावाकडची भाषा हीच आपली खरी भाषा आहे. ती भाषा आपल्याला जास्त समृद्ध करते. आपले शब्द भांडार वाढवते. आज नागराज यांची ख्याती संपूर्ण जगात त्यांनी पसरवली आहे. सर्व मोठमोठे दिग्दर्शक, निर्माते त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे. लवकरच नागराज महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘झुंड’ सिनेमात दिसणार आहे.

एकटेपणाचे हे जीवघेने तट…
तू आता भराभर ढासळून टाक
पुन्हा कधीच न बांधण्यासाठी
फाटलेल्या आभाळाला
टाके घालून सांधण्यासाठी
कारण मी आता माझ्याकडचा रस्ता
झाडून पुसून साफ केलाय
तुझ्या पायातल्या
मुक्या पैंजणाला
मुक्त गाणी गाण्यासाठी

नागराज मंजुळे यांना दैनिक बोंबाबोंबकडूनही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

हेही नक्की वाचा-
 हलाखीच्या परिस्थितीवर मात करत यश मिळवणारे विजय चव्हाण; ‘मोरूची मावशी’ नाटकाने मिळवून दिली ओळख
जय हो! ‘चंद्रयान-3’ मोहीम यशस्वी झाल्यानंतर ‘या’ अभिनेत्रींनी केला कौतुकाचा वर्षाव

हे देखील वाचा