×

पेढे वाटा पेढे! अभिनेत्री हेजल कीचने दिला गोंडस मुलाला जन्म; माजी क्रिकेटर युवराज सिंग बनला ‘बाप’माणूस

कलाविश्वातून एक आनंदाची बातमी समोर येत आहे. अभिनेत्री हेजल कीचच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. हेजल आणि तिचा पती तसेच माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग आई-बाबा बनले आहेत. हेजलने मंगळवारी (२६ जानेवारी) गोंडस मुलाला जन्म दिला आहे. ही आनंदाची बातमी दोघांनाही त्यांच्या सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांना दिली आहे. यावेळी त्यांनी माध्यमांना त्यांच्या गोपनीयतेचा आदर करण्याचे आवाहन केले आहे.

हेजलने (Hazel Keech) अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून ही आनंदाची बातमी देत पोस्ट शेअर केली आहे. तिने आपल्या या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “आमच्या सर्व चाहत्यांना, कुटुंबीयांना आणि मित्रांना, आम्हाला हे सांगताना आनंद होत आहे की, आज देवाने आम्हांला मुलाच्या रूपात आशीर्वाद दिला आहे. या आशीर्वादासाठी आम्ही देवाचे आभार मानतो आणि आम्ही चिमुकल्याचे जगात स्वागत करताना विनंती करतो की, तुम्ही आमच्या गोपनीयतेचा आदर करावा.”अशीच पोस्ट युवराज सिंगनेही (Yuvraj Singh) शेअर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Hazel Keech Singh (@hazelkeechofficial)

तिच्या या पोस्टला आतापर्यंत २३ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच शेकडो कमेंट्सचा वर्षावही होत आहे. हेजलच्या या पोस्टवर बॉलिवूड कलाकार शुभेच्छा देत आहेत. अभिनेता आयुष्मान खुरानाने कमेंट बॉक्समध्ये लव्ह इमोजीचा समावेश केला आहे. तसेच अभिनेत्री बिपाशा बासूने या पोस्टवर “अभिनंदन” अशी कमेंट केली आहे. तिने यामध्ये लव्ह इमोजीचाही समावेश केला आहे. अभिनेत्री रिचा चड्ढाने “ओएमजी अभिनंदन” अशी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

हेजलने २००७ साली आलेल्या ‘बिल्ला’ या सिनेमातून भारतीय सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले होते. त्यानंतर ती सुपरस्टार सलमान खानच्या २०११ सालच्या ‘बॉडीगार्ड’ या हिट सिनेमात झळकली होती. यामध्ये तिने करीना कपूरच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. या सिनेमातून तिला चांगली प्रसिद्धी मिळाली.

याव्यतिरिक्त आमिर खानची (Aamir Khan) मुलगी इरा खानने (Ira Khan) दिग्दर्शित केलेल्या ‘युरिपीड्स मेडिया’ या नाटकातही ती दिसली होती. २०१३ मध्ये, ती लोकप्रिय रियॅलिटी शो ‘बिग बॉस ७’ मध्ये देखील सहभागी झाली होती.

तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं, तर तिने ३० नोव्हेंबर, २०१६ रोजी युवराज सिंगसोबत लग्न केले होते.

हेही वाचा-

Latest Post