Friday, April 19, 2024

खऱ्या प्रेमाच्या शोधात ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीने केली चार लग्न, आता आयुष्यात आलंय…

बॉलिवूड सेलिब्रिटीजना आपण एकाहून अधिक लग्न करताना पाहतो. तर काही सेलिब्रिटी हे एकदाच लग्नबंधनात अडकतात ते कायमचे! आयुष्यभर सुखी संसार करतात. पहिल्याच प्रयत्नात त्यांना त्यांचा जीवनसाथी भेटलेला असतो. परंतु काहींचं नशीब इतकं चांगलं नसतं. त्यांना खऱ्या प्रेमाच्या शोधात दुसरं लग्न करावं लागतं. यामध्ये बऱ्याचदा आपल्याला असंही पाहायला मिळतं जेव्हा एका सेलिब्रिटिची पत्नी त्याला घटस्फोट देऊन दुसऱ्या सेलिब्रिटीबरोबर संसार थाटते आणि हेच अगदी उलट सुद्धा होतं. अशीच एक बॉलिवूड अभिनेत्री आहे जिला तिचं खरं प्रेम मिळवण्यासाठी चक्क चार लग्न करावी लागली. तेव्हा कुठे जाऊन ती आता सुखी सांसारिक आयुष्य जगत आहे. कोण आहे ही अभिनेत्री यावर एक नजर टाकूयात.

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून जेबा बख्तियार आहे… जिच्यासाठी प्रेमाचा मार्ग कधीच सोपा नव्हता. त्यासाठी तिला अनेक कठीण प्रश्नांना सामोरं जावं लागलं होतं. जेबा हिचा जन्म हा पाकिस्तानातील क्वेट्टा येथे ५ नोव्हेंबर १९६२ मध्ये झाला. जेबा बख्तियार ही एक पाकिस्तानी राजकारणी आणि माजी अ‍ॅटर्नी जनरल याह्या बख्तियार यांची मुलगी. तिची आई इवा बख्तियार या हंगेरीच्या होत्या. तिचे पालक एकमेकांना इंग्लंडमध्ये भेटले. क्वेट्टा येथेच ती लहानाची मोठी झाली. यानंतर तिचं संपूर्ण कुटुंब कराची येथे शिफ्ट झालं.

जेबा बख्तियार हिला राज कपूर यांनी इंडस्ट्रीत आणलं असं म्हटलं जातं, जे की तंतोतंत खरं आहे. दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्या सोबत जेबाने १९९१ मध्ये चित्रपट हिना मार्फत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. राज कपूर तिचं सौंदर्य पाहून इतके प्रभावित झाले होते कि त्यांनी जेबाला चित्रपट हिना ऑफर केला. पहिल्याच चित्रपटात तिला ऋषी कपूर यांच्या नायिकेची भूमिका मिळाली. या चित्रपटाचं गाणं मैं हूं खुशरंग हिना त्या वेळी खूपच गाजलं होतं. या चित्रपटाद्वारे जेबाला बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी मिळाली. हिना नंतर, जेबा काही मोजक्याच चित्रपटांमध्ये दिसली परंतु एकही हिट चित्रपट देण्यात तीला यश आलं नाही. जेबाच्या अपयशामुळे हळू हळू तिला बॉलिवूडमध्ये काम मिळणं बंद झालं. आणि मग प्रेक्षकही सरत्या काळाप्रमाणे तिला विसरून गेले.

जेबाने तिच्या आयुष्यात चार लग्न केली आहेत. तिने पहिल्यांदा सलमान वालियानीशी लग्न केले आणि त्यांना एक मुलगी झाली पण लवकरच दोघांचा घटस्फोट झाला. १९८९ मध्ये जेबाने अभिनेता जावेद जाफरीशी लग्न केले. जेव्हा या दोघांची बातमी माध्यमात आली तेव्हा जेबाने ही अफवा असल्याचं सांगितलं होती आणि लग्न नाकारलं होतं. परंतु, जावेद जाफरीनं दोघांच्या लग्नाची बातमी सार्वजनिक केली. परंतु एका वर्षातच दोघांचाही घटस्फोट झाला.

१९९३मध्ये जेबाने तिसरं लग्न गायक, संगीतकार अदनान सामीशी केलं. त्यावेळी अदनान २२ वर्षांचा होता. त्यांना अजान सामी नावाचा मुलगा झाला. लग्नाच्या चार वर्षानंतर जेबा आणि अदनान विभक्त झाले. मुलाला ताब्यात घेण्यावरून दोघांमध्ये कायदेशीर लढाईदेखील झाली. अखेर जेबाला मुलाचा ताबा मिळाला. जेबाचं चौथं लग्न पाकिस्तानच्या सोहेल खान लेगडीशी झालं. जेबा सध्या पाकिस्तानात सुखी सांसारिक आयुष्य जगतेय आणि बर्‍याच पाकिस्तानी कार्यक्रमांमध्येही दिसत असते. जेबा सध्या पाकिस्तानी टीव्ही मालिकांचं दिग्दर्शन करतेय.

हे देखील वाचा